अमेरिकेचे भावी राष्ट्राध्यक्ष बायडेन यांच्याकडून इराण अणुकरारासाठी गोपनीय चर्चा सुरू झाल्याचा दावा

गोपनीय चर्चावॉशिंग्टन/तेहरान – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प व इस्रायलने इराणविरोधात लष्करी हल्ल्याची तयारी ठेवल्याचे दावे समोर येत असतानाच, भावी राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी इराणबरोबर अणुकरारासाठी चर्चा सुरू केल्याची माहिती समोर आली आहे. इस्रायलच्या ‘चॅनल १२’ या वृत्तवाहिनीने यासंदर्भातील बातमी प्रसिद्ध केली. ओबामा प्रशासनात इराणबरोबरील अणुकराराच्या वाटाघाटींसाठी महत्त्वाची भूमिका बजावलेल्या ‘वेंडी शर्मन’ यांची बायडेन यांनी उपपरराष्ट्रमंत्री म्हणून नेमणूक केल्याचे जाहीर होत असतानाच हे वृत्त समोर आले आहे. गेल्या दोन महिन्यात बायडेन यांनी इराणसंदर्भात बोलताना सातत्याने अणुकराराला प्राधान्य देण्याची भूमिका मांडली होती.

अमेरिकेचे भावी राष्ट्राध्यक्ष बायडेन इराणबरोबर नव्याने अणुकरार करण्यासाठी उत्सुक आहेत. आपल्या प्रचारादरम्यान तसेच गेल्या महिन्यात अमेरिकी माध्यमांना दिलेल्या मुलाखतीच्या माध्यमातून बायडेन यांनी तसे स्पष्ट केले होते. पुन्हा एकदा युरोपिय देशांना एकत्र घेऊन इराणबरोबरच्या अणुकरारासाठी प्रयत्न करणार असल्याचे बायडेन यांनी म्हटले होते. त्याचवेळी इराणनेदेखील बायडेन यांच्याकडून आपल्याला अपेक्षा असल्याचे जाहीर केले आहे. या पार्श्‍वभूमीवर इस्रायली वृत्तवाहिनीने दिलेली बातमी लक्ष वेधून घेणारी ठरते. ‘चॅनल १२’ने आपल्या वृत्तात कोणत्याही नावांचा अथवा मुद्यांचा उल्लेख केलेला नाही.

गोपनीय चर्चा

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या कारकिर्दीत २०१५ साली इराणबरोबर अणुकरारावर स्वाक्षर्‍या करण्यात आल्या होत्या. त्यावेळी उपराष्ट्राध्यक्ष असणार्‍या ज्यो बायडेन यांनीही कराराचे जोरदार समर्थन केले होते. करारासाठी झालेल्या वाटाघाटींमध्ये अमेरिकेच्या वतीने वेंडी शर्मन, विल्यम बर्न्स व जेक सुलिव्हन या अधिकार्‍यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली होती. २०१३ पासून ओमान व इतर ठिकाणी इराणबरोबर झालेल्या गोपनीय चर्चांमध्ये या अधिकार्‍यांचा समावेश होता.

नव्या बायडेन प्रशासनात हे तिन्ही अधिकारी अत्यंत महत्त्वाच्या व वरिष्ठ पदांवर नियुक्त करण्यात आले आहेत. विल्यम बर्न्स यांना अमेरिकी गुप्तचर यंत्रणा ‘सीआयए’चे संचालक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. जेक सुलिव्हन यांना अमेरिकेचे नवे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. तर वेंडी शर्मन यांची उपपरराष्ट्रमंत्री म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. बायडेन यांनी इराणच्या अणुकराराबाबत मांडलेली भूमिका व यापूर्वीच्या वाटाघाटींमध्ये सहभाग असलेल्या अधिकार्‍यांची महत्त्वाच्या पदावर असलेली नियुक्ती लक्षात घेता, इस्रायली वृत्तवाहिनीचा दावा महत्त्वाचा ठरतो.

इस्रायल, सौदी अरेबिया तसेच रिपब्लिकन पक्षातील वरिष्ठ नेते व अधिकार्‍यांनी बायडेन यांना अणुकराराच्या मुद्यावरून गंभीर इशारे दिले आहेत. बायडेन यांनी इराणच्या अणुकार्यक्रमाबाबत जुन्या चुकांची पुनरावृत्ती करू नये, असे अमेरिकेतील इस्रायलचे राजदूत रॉन डर्मर यांनी बजावले होते. तर इराणबरोबरचा अणुकरार पुन्हा सक्रीय केला तर ती विनाशकारी बाब ठरेल, असा इशारा संयुक्त राष्ट्रसंघातील अमेरिकेच्या माजी राजदूत निक्की हॅले यांनी दिला आहे. तर सौदी अरेबियाने इराणच्या अणुकार्यक्रमावर चर्चा सुरू करायची असेल तर त्यात अरब देशांनाही सहभागी करून घ्यावे, असे आवाहन केले होते.

leave a reply