इराणने अमेरिकेची ’थाड’ नष्ट करण्याचा सराव केला

‘आयआरजीसी’च्या अधिकाऱ्यांची माहिती

तेहरान – अमेरिकेने आखातातील हितसंबंधितांच्या सुरक्षेसाठी तैनात केलेली ‘थाड’ क्षेपणास्त्रभेदी यंत्रणा नष्ट करण्याचा सराव यशस्वीरित्या पार पडल्याची घोषणा इराणच्या ‘आयआरजीसी’च्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी केली. त्याचबरोबर ‘आयआरजीसी’ने कतारमधील अमेरिकेच्या हवाई तळाचे सॅटेलाईट फोटो प्रसिद्ध केले आहेत. इराणची ही कारवाई म्हणजे आखातातील अमेरिकेच्या हितसंबंधांबरोबरच मित्रदेशांना इशारा असल्याचे बोलले जाते. काही तासांपूर्वी इराणने अमेरिकेच्या विमानवाहू युद्धनौकेची प्रतिकृती नष्ट केली होती.

इराणच्या होर्मुझच्या आखातात रिव्होल्युशनरी गार्ड्‍सचा (आयआरजीसी) मोठा सराव नुकताच पार पडला. या युद्धसरावात ‘आयआरजीसी’च्या गस्तीनौका आणि हेलिकॉप्टर्सनी अमेरिकेच्या ‘युएसएस निमित्झ’ या विमानवाहू युद्धनौकेच्या प्रतिकृतीवर क्षेपणास्त्रांचे हल्ले चढवून सदर प्रतिकृती नष्ट केली होती. आखातात गस्त घालणार्‍या अमेरिका आणि मित्रदेशांच्या युद्धनौका आपल्या हल्ल्यांपासून सुरक्षित नसल्याचा अप्रत्यक्ष इशारा इराणने या युद्धसरावातून दिला होता. इराणची ही कारवाई बेजबाबदार आणि आखातात तणाव वाढविणारी असल्याची टीका अमेरिकेने केली होती. इराणच्या या युद्धसरावानंतर अमेरिकेने आपल्या हवाई तळांवर हायअलर्ट जारी केला होता. इराणच्या या युद्धसरावाबाबत अधिक माहिती इराणने जाहीर केली आहे.

‘आयआरजीसी’च्या एअरोस्पेस फोर्सचे ब्रिगेडिअर जनरल अमिर अली हाजिदेह यांनी दिलेल्या माहितीनुसार, या युद्धसरावात शत्रूची हवाई सुरक्षा यंत्रणा नष्ट करण्याचा तसेच क्षेपणास्त्रभेदी यंत्रणा अपयशी करण्याचा सराव केला. यावेळी अमेरिकेच्या ‘थिएटर हाय अल्टिट्युड एरिया डिफेन्स’ (थाड) या क्षेपणास्त्रभेदी यंत्रणेची नक्कल मारलेली यंत्रणा उभारून रडारला गुंगारा देणार्‍या क्षेपणास्त्रांनी सदर यंत्रणा भेदल्याची माहिती हाजिदेह यांनी दिली. यासाठी इराणने विकसित केलेले ड्रोन्स तसेच सुखोई-२२ या लढाऊ विमानांचा वापर करण्यात आला होता. यापुढे इराण पर्शियन आखाताबरोबरच ओमानचे आखात आणि हिंदी महासागर क्षेत्रातील आपल्या शत्रू देशांच्या हितसंबंधांना लक्ष्य करू शकतो, असा दावा हाजिदेह यांनी केला.

तर या युद्धसरावाच्या निमित्ताने ‘आयआरजीसी’ने कतारमधील हवाई तळाचे सॅटेलाईट फोटोग्राफ्सही प्रसिद्ध केले. इराणच्या “नूर-१” या सॅटेलाईटने कतारमधील १३ हजार सैनिकांची तैनाती असलेल्या ‘अल-उदैद’ या हवाई तळाचे फोटो टिपले आहेत. अल-उदैद हा अमेरिकेचा आखातातील सर्वात मोठा हवाईतळ म्हणून ओळखला जातो. त्याचे फोटो प्रसिद्ध करुन इराणने अमेरिकेचे तळ देखील आपल्या निशाण्यावर असल्याचे संकेत इराणने दिल्याचे दिसते. त्याचबरोबर या युद्धसरावात ’अंडरग्राऊंड सिटीज्’मधून बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांचे प्रक्षेपण केल्याची माहिती समोर येत आहे. काही आठवड्यांपूर्वीच ’आयआरजीसी’ने या छुप्या शहरातील बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांची माहिती उघड केली होती. इराणची ही घोषणा आखातातील शांती व स्थैर्य संकटात टाकणारी असल्याची टीका अमेरिका, सौदी अरेबियाने केली होती.

दरम्यान, जगभरातील एकूण इंधन निर्यातीपैकी २५ टक्के इंधनाची वाहतूक होर्मुझच्या आखातातून केली जाते. त्यामुळे हा युद्धसराव घेऊन इराणने या क्षेत्रातील तणाव वाढविल्याचे बोलले जाते. त्याचबरोबर या युद्धसरावातून इराणने अमेरिकेला मोठा इशारा दिल्याचे दिसत आहे.

leave a reply