इराणसंलग्न दहशतवादी गटांनी इराकी पंतप्रधानांच्या कार्यालयाला घेरले

बगदाद – दोन दिवसांपूर्वी इराकच्या सुरक्षा यंत्रणेने दहशतवादविरोधी कारवाई अंतर्गत ‘पीएमएफ’ या इराणसंलग्न दहशतवादी गटाच्या प्रमुखाला अटक केली. यामुळे संतापलेल्या पीएमएफच्या दहशतवाद्यांनी इराकी पंतप्रधानांच्या कार्यालयाला घेराव टाकला. यानंतर इराकी लष्कराचे विशेष पथक पंतप्रधानांच्या सुरक्षेसाठी तैनात झाल्याने राजधानी बगदादमध्ये अराजक निर्माण झाल्याचा दावा स्थानिक करीत आहेत. दरम्यान, दहशतवादविरोधी कारवाईसाठी इराकी लष्कर आणि इराकमधील कुर्दांच्या पेशमर्गा लष्करी गटात एकजूट झाली आहे.

इराणसंलग्न दहशतवादी गटांनी इराकी पंतप्रधानांच्या कार्यालयाला घेरलेइराकी लष्कराने दोन दिवसांपूर्वी भल्या पहाटे ‘अल-हश्द अल-शबी’ (पॉप्युलर मोबिलायझेशन फोर्सेस-पीएमफ) या इराणसंलग्न दहशतवादी गटाचा नेता ‘कासिम महमूद मुस्लेह’ याला अटक केली. दहशतवादी कारवाया, खून आणि भ्रष्टाचार असे आरोप मुस्लेह याच्यावर ठेवण्यात आले आहेत. इराकच्या तपास यंत्रणा मुस्लेह याची चौकशी करणार असल्याचे जाहीर करण्यात आले. मुस्लेहच्या अटकेबरोबर पीएमएफच्या दहशतवाद्यांनी राजधानी बगदादमधील ग्रीन झोन या अतिसंरक्षित क्षेत्रात असलेल्या इराकी पंतप्रधानांच्या कार्यालयाला घेरले.

ग्रीन झोनमध्ये सरकारी कार्यालयांबरोबर परदेशी दूतावासांचाही समावेश आहे. त्यामुळे रायफल्स, बंदूका घेतलेल्या पीएमएफच्या दहशतवाद्यांनी इराकी पंतप्रधानांच्या कार्यालयाला घेरल्यानंतर राजधानी बगदादमध्ये अस्थैर्य माजले आहे. इराकचे पंतप्रधान मुस्तफा अल-काधीमी यांनी पीएमएफच्या दहशतवाद्यांच्या या कारवाईवर ताशेरे ओढले. शस्त्राद्वारे सरकारवर दबाव टाकण्याचा हा प्रकार इराकी संविधानाचे गंभीर उल्लंघन ठरते, अशी टीका पंतप्रधान काधीमी यांनी केली.इराणसंलग्न दहशतवादी गटांनी इराकी पंतप्रधानांच्या कार्यालयाला घेरले

पंतप्रधानांच्या कार्यालयाच्या सुरक्षेसाठी इराकी लष्कराबरोबर दहशतवादविरोधी पथकही दाखल झाले असून ग्रीन झोनमध्ये परिस्थिती भयावह बनल्याचे स्थानिक सांगत आहेत. काही दिवसांपूर्वी इराकच्या करबला येथे निदर्शनांचे आयोजन करणार्‍या एहाब अल-वझ्नी या नेत्याच्या हत्येचा आरोप पीएमएफचा प्रमुख मुस्लेहवर ठेवण्यात आला आहे. याशिवाय या आठवड्याच्या सुरुवातीला इराकमधील ‘अल-असाद’ हवाईतळावर झालेल्या रॉकेट हल्ल्याचे आदेशही मुस्लेह यानेच दिले होते.

इराणसंलग्न दहशतवादी गटांनी इराकी पंतप्रधानांच्या कार्यालयाला घेरलेराजधानी बगदादजवळ असलेल्या ‘अल-असाद’ हवाईतळावर अमेरिकेचे जवान तैनात आहेत. गेल्या महिन्याभरात या हवाईतळावर चार वेळा रॉकेट तसेच ड्रोनचे हल्ले झाले आहेत. या हल्ल्यांमागे इराणसंलग्न पीएमएफ ही दहशतवादी संघटना असल्याचा आरोप झाला होता. अमेरिकी हवाईतळावरील या हल्ल्यासाठी मुस्लेहला ताब्यात घेण्यात आल्याचा दावा आंतरराष्ट्रीय माध्यमे करीत आहेत.

मुस्लेहवर केलेल्या या कारवाईमुळे इराकचे पंतप्रधान मुस्तफा अल-काधीमी आणि पीएमएफ व या संघटनेचा पाठिराखा इराण यांच्यात तणाव निर्माण झाल्याचा दावा केला जातो. त्यातच पंतप्रधान काधीमी यांनी देशातील दहशतवादविरोधी कारवाईसाठी कुर्दांच्या पेशमर्गा या सशस्त्र दलाचे सहाय्य घेण्याचा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान काधीमी यांच्या या निर्णयावर इराण तसेच तुर्कीतूनही प्रतिक्रिया येऊ शकते.

leave a reply