इराणने २००३ सालीच अणुबॉम्ब चाचणीची तयारी केली होती

- अमेरिकेतील प्रसिद्ध विश्‍लेषकांचा दावा

वॉशिंग्टन – ‘२००३ सालच्या अखेरीपर्यंत इराणने अणुबॉम्बच्या मुख्य घटकांची ‘कोल्ड टेस्ट’ घेण्याची तयारी केली होती. आता इराण फक्त संवर्धित युरेनियमची पर्याप्त मात्रा किंवा प्लुटोनियम मिळविण्याची प्रतिक्षा करीत आहे. हे मिळविण्यात इराण यशस्वी ठरला, तर हा देश जलदगतीने अणुबॉम्बची निर्मिती करील. असे झाले तर इराण विनाशिकेवरुनही अणुबॉम्ब प्रक्षेपित करू शकतो’, असा इशारा अमेरिकेतील प्रसिद्ध अभ्यासगटाचे संस्थापक डेव्हिड अल्ब्राईट आणि संशोधिका साराह बर्कहार्ड यांनी दिला.

इराणने २००३ सालीच अणुबॉम्ब चाचणीची तयारी केली होती - अमेरिकेतील प्रसिद्ध विश्‍लेषकांचा दावाअमेरिकेचे बायडेन प्रशासन इराणबरोबर अणुकरार करण्यासाठी वेगाने हालचाली करीत आहेत. अशा परिस्थितीत, अमेरिकी विश्‍लेषकांनी दिलेला इशारा बायडेन प्रशासनावर दबाव टाकणारा ठरू शकतो, असा दावा अमेरिकी माध्यमे करीत आहेत. ‘इन्स्टिट्युट फॉर सायन्स अँड इंटरनॅशनल सिक्युरिटी’ (आयएसआयएस) या अमेरिकी अभ्यासगटाचे अध्यक्ष डेव्हिड अल्ब्राईट आणि संशोधिक रासाह बर्कहार्ड यांचे पुस्तक लवकरच प्रकाशित होत आहे. ‘इरान्स पेरिलस पर्स्यू ऑफ न्यूक्लिअर वेपन्स’ अर्थात ‘इराणचा अण्वस्त्रांचा धोकादायक पाठलाग’ असे या पुस्तकाचे नाव आहे.

२०१८ साली इस्रायली गुप्तचर यंत्रणा मोसादच्या प्रमुखांनी इराणमध्ये घुसून या देशाचे अणुकार्यक्रमाशी संबंधित हजारो कागदपत्रे, दस्तावेज, व्हिडिओ हस्तगत केले. त्यानंतर इस्रायलच्या पंतप्रधानांनी ही सर्व माहिती माध्यमांसमोर उघड केली होती. गेल्या महिन्यात मोसादच्या प्रमुखांनी अमेरिकेचा दौरा करून राष्ट्राध्यक्ष बायडेन यांची भेट घेतली व हे पुरावे हवाली केले होते. याच दस्तावेजांच्या आधारावर अल्ब्राईट आणि बर्कहार्ड यांनी आपल्या पुस्तकात इराणच्या अणुकार्यक्रमापासून असलेला धोका मांडला आहे.

इराण दावा करीत असला तरी, या देशाने अणुबॉम्बच्या निर्मितीसाठी आवश्यक असलेले तंत्रज्ञान व इतर साहित्य २००३ सालीच मिळविले होते, असे अमेरिकी विश्‍लेषकांनी म्हटले आहे. सतरा वर्षांपूर्वीच इराणने अणुबॉम्बमधील घटकांची कोल्ड टेस्ट अर्थात अणुइंधनाशिवाय चाचणी घेण्याची तयारी केली होती. इराण खर्‍या अर्थाने अणुचाचणीत यशस्वीही ठरला असता. कारण इराणच्या शास्त्रज्ञांनी अणुबॉम्बच्या निर्मितीसाठी आवश्यक तंत्रज्ञानविषयक कौशल्य संपादन केले होते. मात्र यासाठी इराणला आवश्यक अणुइंधन अर्थात संवर्धित युरेनियम किंवा प्लुटोनियमची आवश्यकता होती, असे अल्ब्राईट व बर्कहार्ड यांनी लिहिले आहे.

इराणने २००३ सालीच अणुबॉम्ब चाचणीची तयारी केली होती - अमेरिकेतील प्रसिद्ध विश्‍लेषकांचा दावाइराण संवर्धित युरेनियम किंवा प्लुटोनियमची आवश्यक प्रमाणात मिळविण्यात यशस्वी ठरला, तर अणुबॉम्बची निर्मिती करण्यासाठी इराणला जास्त अवधी लागणार नाही, असा दावा अमेरिकी विश्‍लेषकांनी आपल्या पुस्तकात केला आहे. असे झाले तर या अणुबॉम्बच्या वापरासाठी इराण मोबाईल लॉंचर्स अर्थात जमिनीवरून मारा करणार्‍या बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांवर अवलंबून राहणार नाही. तर विनाशिकेवरुन क्रूझ् क्षेपणास्त्रांच्या सहाय्याने देखील अणुबॉम्बचे हल्ले चढवू शकतो, असे अल्ब्राईट व बर्कहार्ड यांनी बजावले आहे.

अशा परिस्थितीत इराणच्या बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांची निर्मिती रोखणे व्यर्थ आहे. कारण, अणुबॉम्ब प्रक्षेपित करण्यासाठी इराणकडे इतरही पर्याय उपलब्ध आहेत. त्यामुळे आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा आयोगाने इराण अणुबॉम्बची निर्मिती करू शकणार नाही, यावर अधिक लक्ष केंद्रीत करावे, असा सल्ला अमेरिकी विश्‍लेषकांनी दिला आहे. त्याचबरोबर गेल्या काही वर्षांमध्ये पाश्‍चिमात्य देशांनी इराणच्या अणुकार्यक्रमाबाबत दाखविलेल्या ढिलाईवरही अल्ब्राईट आणि बर्कहार्ड यांनी टीका केली.

गेल्या महिन्याभरापासून अमेरिकेचे बायडेन प्रशासन आणि इराण यांच्यात व्हिएन्ना येथे अणुकरारावर वाटाघाटी सुरू आहेत. २०१५ सालचा अणुकरार पुनरुज्जीवित करण्यासाठी बायडेन प्रशासन इराणला निर्बंधातून सवलती देण्यासाठी तयार असल्याच्या बातम्या आल्या आहेत. याची पूर्ण तयारी बायडेन प्रशासनाने केली आहे. मात्र आपल्यावरील निर्बंध पूर्णपणे मागे घेतल्याखेरीज इराण अणुकार्यक्रमावर वाटाघाटी करायला तयार नाही.

राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी इराणबाबत स्वीकारलेल्या या मवाळ भूमिकेवर अमेरिकन लोकप्रतिनिधी व इस्रायल तसेच सौदीसारखे देशही नाराज आहे. अशा काळात अमेरिकी विश्‍लेषकांनी आपल्या पुस्तकाद्वारे दिलेला इशारा बायडेन प्रशासनावरील दबाव वाढविणारा ठरेल, असे अमेरिकेतील आघाडीच्या वर्तमानपत्राचे म्हणणे आहे.

leave a reply