अफगाणिस्तानातील पाकिस्तानच्या हस्तक्षेपावर इराणचा सज्जड इशारा

तेहरान – ‘अफगाणिस्तानच्या कारभारात हस्तक्षेपाची धोरणात्मक चूक इतर देशांनी करता कामा नये. कारण आपल्या भूमीवर शत्रू किंवा आक्रमकांचे पाऊल अफगाणिस्तान अजिबात खपवून घेणार नाही’, असा सज्जड इशारा इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिला. पंजशीरमधील संघर्षात पाकिस्तानने हस्तक्षेप केल्याच्या बातम्या समोर आल्यानंतर इराणकडून ही प्रतिक्रिया उमटली आहे.

सोमवारी सकाळी तालिबानने पंजशीर ताब्यात घेतल्याची घोषणा केली. यावर इराणने तीव्र संताप व्यक्त केला. ‘पंजशीरमधून येत असलेल्या बातम्या खरोखरच व्यथित करणार्‍या आहेत. पंजशीरमधील या कारवाईचा इराण जोरदार निषेध करतो’, असे इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते सईद खातिबझादेह यांनी म्हणाले. अफगाणिस्तानातील कारभारात पाकिस्तानच्या हस्तक्षेपावर खातिबझादेह यांनी सणसणीत चपराक लगावली.

‘चुकीचा हेतू ठेवून अफगाणिस्तानात घुसखोरी करण्याची धोरणात्मक चूक अफगाणिस्तानच्या मित्रदेशांनी करू नये’, असे सांगून खातिबझादेह यांनी पाकिस्तानला इशारा दिला. अफगाणिस्तानची जनता इतर घुसखोरांप्रमाणे हस्तक्षेप करणार्‍यांचाही बंदोबस्त करील, असे खातिबझादेह यांनी बजावले.

पाकिस्तानच्या ‘आयएसआय’चे प्रमुख फैझ हमीद यांनी काबुलला भेट दिली होती. यानंतर सोमवारी पंजशीरमधील संघर्षात पाकिस्तानच्या हवाईदलाचा सहभाग असल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या. त्यानंतर इराणने पाकिस्तानला धमकावले. दरम्यान, पंजशीरचा तिढा अफगाणिस्तानच्या वरिष्ठ नेत्यांच्या चर्चेतून सोडवायला हवा. तसेच तालिबानने आंतरराष्ट्रीय नियमांचा आदर करावा, असे आवाहन इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाने केले आहे.

leave a reply