इराणने अमेरिकेसह आखाती व युरोपिय देशांनाही धमकावले

तेहरान – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लष्करी हल्ला आणि ‘स्‍नॅपबॅक’ निर्बंधांचा इशारा दिल्यानंतर इराणने अमेरिका, अमेरिकेचे आखातातील मित्रदेश तसेच युरोपिय देशांना धमकावले आहे. जनरल कासेम सुलेमानी यांच्या हत्येसाठी अमेरिका व अमेरिकेला सहाय्य करणार्‍या प्रत्येकावर हल्ले चढविले जातील, अशी धमकी इराणच्या रिव्होल्युशनरी गार्डसच्या वरिष्ठ अधिकार्‍याने दिली. त्याचबरोबर इराणवर निर्बंध लादण्याच्या अमेरिकेच्या प्रयत्‍नांना युरोपिय देशांनी कडाडून विरोध करावा. अन्यथा युरोपिय देशांना या निर्बंधांचे परिणाम सोसावे लागतील, असा इशारा इराणचे परराष्ट्रमंत्री जावेद झरिफ यांनी दिला.

इराणने अमेरिकेसह आखाती व युरोपिय देशांनाही धमकावलेअमेरिकेने इराणवरील राजकीय, आर्थिक आणि लष्करी दबाव वाढविण्यास सुरुवात केली आहे. संयुक्त अरब अमिरात (युएई) व बहारिन या देशांनी इस्रायलबरोबर केलेले सहकार्य इराणची बेचैनी वाढविणारे ठरत आहे. त्यातच शनिवारी अमेरिकेने इराणवर ‘स्‍नॅपबॅक’ निर्बंध लादल्याची घोषणा केली. अमेरिकेने इराणवर सर्वच्या सर्व निर्बंध लादले असून संयुक्त राष्ट्रसंघाच्या सर्व स्थायी सदस्यांनी या निर्बंधांचे पालन करावे, असे आवाहन अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ यांनी केली. यामध्ये इराणवरील शस्त्रास्त्रबंदीचाही समावेश असून यामुळे आखातातील शांतीसाठी ही मोठी घडामोड असल्याचे पॉम्पिओ म्हणाले. इराणवरील अमेरिकेच्या या निर्बंधांना रशिया आणि चीनने याआधीच विरोध केला असून ब्रिटन, फ्रान्स व जर्मनीने आक्षेप घेतला होता.

पण अमेरिकेच्या निर्बंधांमुळे अर्थव्यवस्थेवर ताण पडत असलेल्या इराणने या नव्या निर्बंधांवरुन युरोपिय देशांना धमकावले आहे. आंतरराष्ट्रीय समुदायाने अमेरिकेच्या या निर्बंधांचा विरोध करावा, असे आवाहन इराणचे परराष्ट्रमंत्री जावेद झरिफ यांनी केले. अमेरिकेच्या या निर्बंधांना विरोध करण्यास कुचराई केली तर भविष्यात आंतरराष्ट्रीय समुदायाला देखील अशाच निर्बंधांचा सामना करावा लागेल, अशी धमकी झरिफ यांनी दिली. या ठिकाणी इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांनी आंतरराष्ट्रीय समुदाय म्हटले असले तरी त्यांनी युरोपिय देशांना हा इशारा दिल्याचा दावा आंतरराष्ट्रीय माध्यमे करीत आहेत. यानंतर इराणच्या रिव्होल्युशनरी गार्डसचे वरिष्ठ कमांडर हुसेन सलामी यांनी अमेरिका तसेच आखातातील मित्रदेशांना धमकावले.

इराणने अमेरिकेसह आखाती व युरोपिय देशांनाही धमकावले‘आम्ही जनरल सुलेमानी यांच्या हत्येचा सूड घेणार असून इराण याबाबत अतिशय गंभीर आहे. जनरल सुलेमानी यांच्या हत्येत प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या सहभागी असलेल्या प्रत्येकावर, प्रत्येक देशावर इराण कारवाई करील. इराण लवकरच आपला हा इशारा सत्यात उतरवून दाखवेल’, असे जनरल सलामी यांनी शनिवारी जाहीर केले. त्याचबरोबर आखातातील अमेरिकेच्या सर्व लष्करी तळांवर कारवाई केली जाईल, असा इशाराही जनरल सलामी यांनी दिला.

या वर्षाच्या सुरुवातीला अमेरिकेने इराकमध्ये ड्रोन कारवाई करुन इराणच्या ‘कुद्स फोर्सेस’चे प्रमुख व इराणमधील दुसर्‍या क्रमांकाचे नेते जनरल कासेम सुलेमानी यांना ठार केले होते. जनरल सुलेमानी यांच्या हत्येमुळे संतापलेल्या इराणने गेल्या आठवड्यात दक्षिण आफ्रिकेतील अमेरिकेच्या राजदूत लाना मार्क्स यांची हत्या घडविण्याची योजना आखल्याची माहिती समोर आली. यावर अमेरिकेवरील इराणच्या कुठल्याही स्वरुपाच्या हल्ल्याला हजार पट तीव्रतेने प्रत्युत्तर मिळेल, असा इशारा राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी दिला. अमेरिकी राष्ट्राध्यक्षांच्या या इशार्‍यानंतर जनरल सलामी यांनी ही धमकी दिली. दरम्यान, इराणकडून अमेरिका व आखाती देशांना ही धमकी दिली जात असताना, अमेरिकेची ‘युएसएस निमित्झ’ ही अजस्त्र विमानवाहू युद्धनौका होर्मुझच्या आखातात दाखल झाली आहे.

leave a reply