इराणच्या सर्वोच्च नेत्यांच्या नातेवाईकांचे इस्रायलशी संबंध – इराणच्या माजी राष्ट्राध्यक्षांचा गंभीर आरोप

तेहरान/लंडन – इराणी गुप्तचर यंत्रणेच्या वरिष्ठ अधिकार्‍यांमध्ये इस्रायलचे एजंट असल्याचा खळबळ उडविणारा दावा इराणचे माजी राष्ट्राध्यक्ष महमूद अहमदीनेजाद यांनी काही दिवसांपूर्वी केला होता. त्यानंतर अहमदीनेजाद यांनी इराणचे सर्वोच्च धार्मिक नेते आयातुल्ला खामेनी यांच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप केले आहेत. खामेनी यांच्या मेव्हण्याचे इस्रायलबरोबर संबंध होते आणि त्यांनी इस्रायल भेटीची योजनाही आखली होती, असा हादरवून सोडणारा दावा अहमदीनेजाद यांनी केला. लंडनस्थित पर्शियन भाषेतील इराणी वृत्तवाहिनीने एका संकेतस्थळाच्या हवाल्याने ही माहिती दिली.

इस्रायलशी संबंधइराणचे माजी राष्ट्राध्यक्ष महमूद अहमदीनेजाद यांच्याशी संलग्न असलेल्या ‘दोलत-ए बहार’ या संकेतस्थळावर काही दिवसांपूर्वी ही माहिती प्रसिद्ध झाली होती. यामध्ये अहमदीनेजाद यांनी आयातुल्ला खामेनी यांचे मेव्हणे हसन खोजास्तेह यांच्यावर हा ठपका ठेवला. 2008 ते 2014 या कालावधीत खोजास्तेह इराणच्या राष्ट्रीय माहिती व प्रसारण कंपनीचे उपप्रमुख होते. साधारण 12 वर्षांपूर्वी खोजास्तेह आपल्या परिवारासह भारताच्या दौर्‍यावर गेले होते. खोजास्तेह यांचा हा दौरा इस्रायली कंपनीने प्रायोजित केला होता, असा दावा अहमदीनेजाद यांनी केला.

भारताच्या भेटीनंतर खोजास्तेह आपल्या परिवारासह तुर्कीमार्गे इस्रायलची आर्थिक राजधानी तेल अविवमध्ये रवाना होणार होते, असा आरोप अहमदीनेजाद यांनी केला. 2005 ते 2013 सालापर्यंत इराणचे राष्ट्राध्यक्ष असलेल्या अहमदीनेजाद यांना खोजास्तेह यांच्या या इस्रायल लिंकची माहिती मिळाली. यानंतर राष्ट्राध्यक्ष या नात्याने आपण खोजास्तेह यांच्या पुढील हालचाली रोखल्या आणि त्यांना माहिती व प्रसारण कंपनीच्या उपप्रमुखपदावरुन काढून टाकल्याचे अहमदीनेजाद यांनी सांगितले. पण इराणच्या सर्वोच्च धार्मिक नेत्यांचे मेव्हणे असलेल्या खोजास्तेह यांची चौकशी झाली नाही, असे अहमदीनेजाद म्हणाले.

त्याचबरोबर खोजास्तेह यांनी आपल्या पदाचा गैरफायदा घेऊन माध्यमांद्वारे राष्ट्राध्यक्ष म्हणून माझी बदनामी, अपप्रचार करण्याचा प्रयत्न केला होता, असे अहमदीनेजाद यांनी आपल्या आरोपांमध्ये म्हटले आहे. याशिवाय खोजास्तेह यांचा मुलगा व इतर नातेवाईक इराणच्या महत्त्वाच्या माध्यमक्षेत्रात काम करणार्‍या कंपन्यांमध्ये मोठ्या पदावर असल्याचे अहमदीनेजाद यांच्याशी संलग्न संकेतस्थळाने लक्षात आणून दिले. इराणच्या माजी राष्ट्राध्यक्षांनी केलेल्या आरोपांवर इराणमधून मोठी प्रतिक्रिया अपेक्षित आहे. काही आठवड्यांपूर्वी अहमदीनेजाद आणि खोजास्तेह यांच्यात सोशल मीडियावर वाद पेटला होता.

दरम्यान, महमूद अहमदीनेजाद हे इराणमधील जहालमतवादी नेते म्हणून ओळखले जातात. पण राष्ट्राध्यक्षपदावर असताना राष्ट्राध्यक्ष अहमदीनेजाद आणि सर्वोच्च धार्मिक नेते आयातुल्ला खामेनी यांचे संबंध ताणलेले होते. इराणचे अणुशास्त्रज्ञ फखरिझादेह यांची हत्या व इराणच्या अणुप्रकल्पातून महत्त्वाचे दस्तावेज मिळविण्यात इस्रायलला यश आले, त्यामागे इराणमधील इस्रायलचे एजंट असल्याचे समोर येत आहे. त्यानंतर इराणमधील इस्रायलच्या हस्तकांवर चर्चा सुरू झाली होती. या पार्श्‍वभूमीवर, माजी राष्ट्राध्यक्ष अहमदीनेजाद यांनी उघड केलेली ही माहिती इराणमध्ये नवा राजकीय वाद पेटविणारी ठरू शकते.

leave a reply