इराणच्या जहाजावर हल्ला चढविणार्‍यांना प्रत्युत्तर मिळेल

- इराणच्या लष्कराचा इस्रायल, अमेरिकेला इशारा

तेहरान – ‘‘इराणच्या ‘एमव्ही साविझ’ जहाजावर झालेल्या हल्ल्यासाठी इस्रायल आणि अमेरिकाच जबाबदार आहेत, यात शंकाच नाही. तरीही प्रकरणाची चौकशी पूर्ण होत नाही, तोपर्यंत इराण कुठलीही कारवाई करणार नाही. मात्र जेव्हा कधी हल्ल्याचे सूत्रधार समोर येतील, त्यावेळी इराणकडून या हल्लेखोरांवर कारवाई केली जाईल’, असा इशारा इराणच्या लष्कराने दिला आहे. त्याचबरोबर आखाती देशांचा या घटनेशी संबंध नसल्याचेही इराणच्या लष्कराने स्पष्ट केले आहे.

गेल्या चार वर्षांहून अधिक काळ ‘रेड सी’च्या क्षेत्रात तळ ठोकून असलेल्या इराणच्या ‘साविझ’ या मालवाहू जहाजावर हल्ला झाला. इराणचे रिव्होल्युशनरी गार्ड्स हेरगिरीसाठी वापरत असलेल्या या जहाजाच्या तळाशी लिम्पेट माईन बसवून हा स्फोट घडवून आणल्याचा दावा केला जातो. या हल्ल्यामध्ये साविझचे नुकसान झाले असून इंजिन रूममध्ये पाणी शिरल्याचे फोटोग्राफ्स समोर आले होते.

तसेच या हल्ल्याच्या एक दिवस आधी सदर जहाजावरुन एका हेलिकॉप्टरने गस्त घातली होती, अशी माहिती जहाजाच्या खलाशाने इराणी वृत्तवाहिनीशी बोलताना दिली. त्यामुळे या नियोजित हल्ला होता, असा दावा इराणी माध्यमे करीत आहेत.

इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाने देखील आपल्या जहाजावर हल्ला झाल्याचे म्हटले होते. दोन दिवसांपूर्वी झालेल्या या हल्ल्यासाठी इराणने कुणावरही संशय व्यक्त केला नव्हता. पण अमेरिकेच्या आघाडीच्या वर्तमानपत्राने अमेरिकी अधिकार्‍याच्या हवाल्याने सदर हल्ल्यासाठी इस्रायल जबाबदार असल्याची बातमी प्रसिद्ध केली होती.

यानंतर गुरुवारी इराणच्या लष्कराचे प्रवक्ते ब्रिगेडिअर जनरल अबोलफझल शेकारची यांनी साविझवरील हल्ल्यासाठी इस्रायल आणि अमेरिका जबाबदार असल्याचा आरोप केला. याबाबत इराणला कुठलीही शंका नसल्याचे ब्रिगेडिअर जनरल शेकारची यांनी सांगितले.

पण या हल्ल्याची चौकशी सुरू असून कुठल्याही पुराव्याशिवाय इराण हल्लेखोरांवर कारवाई करणार नसल्याचेही शेकारची यांनी स्पष्ट केले. मात्र चौकशीनंतर संबंधितांवर इराण नक्की कारवाई करील, असे शेकारची पुढे म्हणाले. सदर हल्ला सौदी अरेबियाच्या सागरी क्षेत्राजवळ झाल्यामुळे, या हल्ल्यासाठी आखाती देश जबाबदार नाहीत का, असा प्रश्‍न शेकारची यांना पत्रकारांनी विचारला. त्यावर बोलताना शेकारची यांनी आखाती देशांचा या हल्ल्याशी संबंध नसल्याचे स्पष्ट केले.

दरम्यान, इराणच्या जहाजावरील हल्ल्यासंबंधी इस्रायलने प्रतिक्रिया देण्याचे टाळले आहे. पण जिथे गरज असेल तिथे आम्ही नक्की कारवाई करू, असे सूचक उद्गार इस्रायलचे संरक्षणमंत्री बेनी गांत्झ यांनी काढले होते.

leave a reply