इराणी नौदलाच्या मोठ्या जहाजाला जलसमाधी – 400 जवानांना वाचविण्यात यश

तेहरान – इराणच्या नौदलातील सर्वात मोठ्या जहाजांपैकी एक मानल्या जाणार्‍या ‘आयआरआयएस खर्ग’ला बुधवारी आग लागून जलसमाधी मिळाली. इराणच्या तपास यंत्रणा या आगीचे कारण शोधत असून अद्याप कारण उघड होऊ शकलेले नाही. मोठ्या प्रमाणात इंधन वाहतूक होणार्‍या होर्मुझच्या आखाताजवळ ही घटना घडली. यामुळे बुधवारी सकाळी या क्षेत्रात तणाव निर्माण झाला होता. इराणच्या नौदलातील 679 फूट लांबीची सपोर्ट शिप म्हणून ओळखल्या जाणार्‍या ‘खर्ग’ जहाजावर मंगळवारी मध्यरात्रीनंतर 2.25 मिनिटांनी आगीने पेट घेतला. ओमानच्या आखातात असलेल्या इराणच्या जस्क बंदराजवळ ही घटना घडली. जहाजाला आग लागली तेव्हा जहाजावर जवानांबरोबर नौदलाचे प्रशिक्षणार्थी असे एकूण 400 जण होते. खर्ग जहाज ओमानच्या आखातात या जवानांना प्रशिक्षण देण्याच्या मोहिमेवर होते, अशी माहिती इराणच्या नौदलाने दिली.

जलसमाधीजहाजावर आगीचा भडका उडाल्यानंतर जवानांनी या आगीवर नियंत्रण मिळविण्याचा आटोकाट प्रयत्न केला. याचे फोटोग्राफ्स आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. पण कित्येक तासांच्या प्रयत्नानंतरही जहाजावरील आग विझविण्यात अपयश आल्याचे इराणच्या नौदलाने सांगितले. यानंतर बुधवारी सकाळी जहाजाला ओमानच्या आखातात जलसमाधी मिळाली. त्याआधी जहाजावरील 400 जणांना वाचविण्यात यश मिळाले. या सर्व प्रकारात किमान 20 जवान जखमी झाले आहेत.

1977 साली ब्रिटनने तयार केलेले सदर जहाज 1984 साली इराणच्या नौदलात सामील झाले होते. इराणी नौदलाच्या जहाजांना इंधन पुरविणे तसेच लष्करासाठी अवजड मालवाहतूक करण्यासाठी या जहाजाचा वापर केला जात होता. याशिवाय खर्ग जहाजावर हेलिकॉप्टर्स तैनात करण्याचीही सोय होती. त्यामुळे खर्ग जहाजाला मिळालेली समाधी इराणच्या नौदलासाठी मोठा धक्का ठरते.

जलसमाधीखर्ग जहाजाला लागलेल्या आगीचे नेमके कारण स्पष्ट होऊ शकलेले नाही. पण जहाजाच्या इंजिन रूममध्ये आगीने पेट घेतल्याचे इराणच्या लष्कराने स्थानिक वृत्तसंस्थेला सांगितले.

या आगीमध्ये जहाजाचे पोलाद वितळून समुद्रात कोसळल्याची माहिती इराणी लष्कराने दिली. ही दुर्घटना होती की घातपात, यावर इराणच्या लष्कराने कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही. पण गेल्या काही महिन्यांपासून इराण आणि इस्रायलमध्ये वाढत असलेल्या तणावाच्या पार्श्‍वभूमीवर, या घटनेकडे पाहिले जाते.

गेल्या काही महिन्यांमध्ये पर्शियन आखातपासून रेड सी ते भूमध्य समुद्रापर्यंत इराण आणि इस्रायलमध्ये अघोषित युद्ध पेटल्याचा दावा केला जातो. या दोन्ही देशांच्या नौदलाच्या तसेच मालवाहू जहाजांवर संशयास्पद स्फोट होऊन आगी भडकल्याच्या घटना घडत आहेत. पर्शियन आखातात तैनात असलेल्या आपल्या मालवाहू जहाजात दोन वेळा सागरी सुरूंगाने स्फोट घडविल्याचा आरोप इस्रायल करीत आहे. त्याचबरोबर भारतासाठी प्रवास करणार्‍या इस्रायली जहाजाच्या दिशेने रॉकेट हल्ले झाले होते. तर रेड सी आणि सिरियाच्या सागरी हद्दीत इराणच्या जहाजावर संशयास्पदरित्या आग भडकल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. यामागे इस्रायल असल्याचे आरोप करण्यात येत होते.

leave a reply