उत्तर अफगाणिस्तानात ‘आयएस’चे तळ उभे राहत आहेत – रशियाच्या परराष्ट्रमंत्र्यांची चिंता

मॉस्को – अमेरिका आणि नाटोची सैन्यमाघार पूर्ण होत असताना, रशियाने अफगाणिस्तानातील परिस्थितीवर चिंता व्यक्त केली. नाटोच्या या माघारीबरोबर ‘आयएस’च्या दहशतवाद्यांनी अफगाणिस्तानच्या उत्तरेकडील भागात आपले तळ उभारण्याची सुरुवात केली आहे, अशी चिंता रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्जेई लॅव्हरोव्ह यांनी व्यक्त केली. अफगाणिस्तानच्या उत्तरेकडची सीमा ताजिकिस्तान, उझबेकिस्तान आणि तुर्कमेनिस्तान या माजी सोव्हिएत रशियन देशांशी जोडलेली आहे. या पार्श्वभूमीवर रशियन परराष्ट्रमंत्र्यांनी ही चिंता व्यक्त केल्याचे दिसते.

अमेरिका व पाश्चिमात्य देशांच्या अफगाणिस्तानातील माघारीबरोबर तालिबान, अल-कायदा यांच्याप्रमाणे आयएसची अफगाणिस्तानातील ताकद वाढेल, असा इशारा संयुक्त राष्ट्रसंघाने महिन्याभरापूर्वी दिला होता. अफगाणिस्तानची राजधानी काबुलमधील काही हल्ल्यांमागे आयएस असल्याचेही उघड झाले होते. तर तालिबानचे दहशतवादी अफगाणिस्तानच्या पूर्व, पश्चिम आणि दक्षिणेकडील भागांवर हल्ले चढवित असताना, आयएसचे दहशतवादी उत्तरेकडील भागात हालचाली वाढवित असल्याच्या बातम्या आल्या होत्या.

रशियाचे परराष्ट्रमंत्री लॅव्हरोव्ह यांनी शुक्रवारी आयएसच्या दहशतवाद्यांच्या या धोकादायक हालचालींवर चिंता व्यक्त केली. तसेच आयएसच्या या वाढत्या हालचालींना अफगाणी अधिकार्‍यांची बेजबाबदार भूमिका कारणीभूत असल्याचा ठपका रशियन परराष्ट्रमंत्र्यांनी ठेवला आहे.

दरम्यान, रशियाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार निकोलाय पत्रुशेव्ह यांनी अफगाणिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार हमदुल्ला मोहिब यांच्याबरोबर शुक्रवारी चर्चा केल्याच्या बातम्या आहेत. गेल्या आठवड्यात ताजिकिस्तानची राजधानी दुशान्बे येथे पार पडलेल्या ‘शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन-एससीओ’च्या बैठकीत रशियन राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांनी अफगाणिस्तानच्या मुद्यावर भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्याबरोबर सखोल चर्चा केल्याच्या बातम्या आल्या आहेत.

leave a reply