इराणवर कोणत्याही क्षणी कारवाई करण्याचा इस्रायलला पूर्ण अधिकार आहे

- इस्रायलच्या परराष्ट्रमंत्र्यांची घोषणा

वॉशिंग्टन – ‘इराणने जाहीरपणे इस्रायलला जगाच्या नकाशावरुन पुसून टाकण्याची घोषणा केली होती. इस्रायल तसे होऊ देणार नाही. इराणवर कोणत्याही क्षणी आणि कोणत्याही प्रकारे कारवाई करण्याचा अधिकार इस्रायलला आहे. फक्त अधिकारच नाही तर तो इस्रायलच्या कर्तव्याचा भाग ठरतो’, अशी घोषणा इस्रायलचे परराष्ट्रमंत्री येर लॅपिड यांनी केली. इस्रायलच्या या इशार्‍याला काही तास उलटत नाही तोच इराणने क्षेपणास्त्रभेदी यंत्रणेची चाचणी घेतली. इराणच्या संवेदनशील प्रकल्पांच्या सुरक्षेसाठी सदर यंत्रणा काम करील, असा दावा इराणने केला.

इराणवर कोणत्याही क्षणी कारवाई करण्याचा इस्रायलला पूर्ण अधिकार आहे - इस्रायलच्या परराष्ट्रमंत्र्यांची घोषणाअमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँथनी ब्लिंकन आणि युएईचे परराष्ट्रमंत्री अब्दुल्ला बिन झाएद यांच्याबरोबर झालेल्या बैठकीनंतर इस्रायलच्या परराष्ट्रमंत्र्यांनी इराणवरुन इशारा दिला. कोणत्याही परिस्थितीत इराणला अणुबॉम्बची निर्मिती करू द्यायची नाही, हाच आपल्या अमेरिका भेटीचा मुळ मुद्दा असल्याचे लॅपिड यांनी माध्यमांसमोर बोलताना स्पष्ट केले. कितीही दावा केला तरी इराण अणुबॉम्बनिर्मितीच्या दिशेने वेगाने पावले टाकत असल्याचे परराष्ट्रमंत्री लॅपिड म्हणाले.

‘असे काही क्षण येतात, जेव्हा जगाला वाईटापासून वाचविण्यासाठी ताकदीचा वापर करावा लागतो. जर दहशतवादी राजवट अणुबॉम्ब संपादन करण्याची तयारी करीत असेल तर तेव्हा सुसंस्कृत जगात तसे करता येणार नाही, हा संदेश देण्यासाठी आपल्याला कारवाई करावीच लागेल. आपल्याला अण्वस्त्रसज्जतेपासून रोखण्यासाठी जग गंभीर नाही, याची इराणला खात्री पटली तर ते अधिक वेगाने अण्वस्त्रनिर्मिती करतील’, असा इशारा इस्रायलच्या परराष्ट्रमंत्र्यांनी दिला.

‘इराण हा अणुबॉम्बनिर्मितीच्या अगदी जवळ पोहोचला आहे. आण्विक वाटाघाटींमध्ये होणारा प्रत्येक दिवसाचा विलंब इराणला अणुबॉम्ब निर्मितीच्य जवळ नेत आहे. इराण उघडपणे जगाची फसवणूक करून युरेनियमचे संवर्धन, बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची निर्मिती करीत आहे’, असा आरोप लॅपिड यांनी केला. त्याचबरोबर, इराणच्या या प्रयत्नांना रोखण्यासाठी युएईच्या परराष्ट्रमंत्र्यांबरोबर ही भेट घेतल्याचे लॅपिड म्हणाले.

अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री ब्लिंकन यांनी इस्रायलच्या भूमिकेचे स्वागत केले. तसेच इराणला रोखण्यासाठी अमेरिका प्रत्येक पर्यायाचा विचार करीत असल्याचे ब्लिंकन म्हणाले. राजनैतिक स्तरावरील वाटाघाटी या कुठलाही वाद सोडविण्यासाठी उत्तम पर्याय असल्याचे ब्लिंकन यांनी माध्यमांसमोर बोलताना सांगितले. पण इराण वाटाघाटींद्वारे वेळ काढत असल्याचा आरोप इस्रायल करीत आहे.

इस्रायलने दिलेल्या इशार्‍यावर इराणची प्रतिक्रिया आलेली नाही. पण इराणने क्षेपणास्त्रभेदी यंत्रणेची चाचणी घेतल्याचे इराणच्या वरिष्ठ लष्करी अधिकार्‍याने जाहीर केले. शत्रूची क्रूझ क्षेपणास्त्रे गारद करण्यासाठी ही यंत्रणा सहाय्यक ठरेल, असे इराणने म्हटले आहे. सदर यंत्रणा म्हणजे इराणची आयर्न डोम असल्याचा दावा काही माध्यमे करीत आहेत.

leave a reply