इराणबरोबरच्या अणुकराराबाबत इस्रायलला गंभीर आक्षेप आहेत

- इस्रायलच्या परराष्ट्रमंत्र्याचा इशारा

रोम – गेल्या काही आठवड्यांपासून व्हिएन्ना येथे इराणच्या अणुकरारावर सुरू असलेल्या वाटाघाटींवर इस्रायलला गंभीर आक्षेप आहेत व अमेरिकेने याची दखल घ्यावी, असे आवाहन इस्रायलचे परराष्ट्रमंत्री येर लैपीड यांनी केले. इटलीच्या रोम येथे अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अ‍ॅन्थनी ब्लिंकन यांच्याबरोबर झालेल्या भेटीत इस्रायलच्या परराष्ट्रमंत्र्यांनी आपल्या देशाची भूमिका मांडली. इराण, गाझापट्टीच्या मुद्यावर चर्चा करण्यासाठी इस्रायलचे राष्ट्राध्यक्ष रीवेन रिव्हलिन सोमवारी अमेरिकेत दाखल झाले असून ते राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांची भेट घेतील.

इराणबरोबरच्या अणुकराराबाबत इस्रायलला गंभीर आक्षेप आहेत - इस्रायलच्या परराष्ट्रमंत्र्याचा इशाराअमेरिका आणि इस्रायलच्या परराष्ट्र मंत्र्यांमध्ये पार पडलेली ही भेट ‘हुश-हुश डिप्लोमसी’चा भाग असल्याचा दावा केला जातो. या बैठकीतील सर्वच तपशील उघड करण्यात आलेले नाहीत. पण इराणच्या अणुकरारावर व्हिएन्ना येथे सुरू असलेल्या चर्चेवर इस्रायलच्या परराष्ट्रमंत्र्यांनी चिंता व्यक्त केली. ‘या मुद्यावरुन इस्रायल आणि अमेरिकेमध्ये निर्माण झालेल्या मतभेदांवर चर्चा करण्याचा मार्ग माध्यमांबरोबरील चर्चेतून सापडणार नाही. तर इस्रायल व अमेरिकेतील थेट आणि व्यावसायिक चर्चेतून यावर तोडगा काढला जाऊ शकतो’, असे लैपीड यांनी सुचविले.

तसेच गेल्या काही वर्षांपासून अमेरिकेबरोबरचे बिघडलेले संबंध सुधारण्यासाठी इस्रायल प्रयत्न करणार असल्याचे परराष्ट्रमंत्री लैपीड यांनी जाहीर केले. अमेरिकी परराष्ट्रमंत्र्यांबरोबरच्या बैठकीनंतर इस्रायलच्या परराष्ट्रमंत्र्यांनी रोम येथेच बाहरिनचे परराष्ट्रमंत्री अब्दुललतीफ अल-झयानी यांची भेट घेतली. येत्या काही तासात इस्रायलचे परराष्ट्रमंत्री लैपीड युएईच्या ऐतिहासिक दौर्‍यावर जाणार आहेत.

leave a reply