इस्रायलने इराणवरील कारवाईसाठी हालचाली वाढविल्या

- इस्रायलचे संरक्षणदलप्रमुख मेजर जनरल कोशावी

जेरूसलेम – ‘इराणमधील कारवाईसाठी इस्रायलने आपल्या हालचाली तीव्र केल्या आहेत. नुकत्याच जाहीर झालेल्या संरक्षणखर्चातील मोठा भाग यासाठी राखून ठेवला आहे. ही कारवाई अतिशय जटील, गुप्तचर यंत्रणेचा कस लावणारी असून यासाठी अधिकाधिक शस्त्रास्त्रांची गरज लागू शकते’, असा दावा इस्रायलचे संरक्षणदलप्रमुख मेजर जनरल अविव कोशावी यांनी केला. याबरोबरच आखातातील इराणचा प्रभाव कमी करणे, हे देखील इस्रायलचे उद्दिष्ट असल्याचे मेजर जनरल कोशावी म्हणाले.

सार्‍या जगाचे लक्ष सध्या अफगाणिस्तानातील घडामोडींकडे लागले आहे. याचा फायदा घेऊन येमेनमधील हौथी तसेच लेबेनॉनमधील हिजबुल्लाह आणि गाझापट्टीतील हमास या इराणसंलग्न दहशतवादी संघटनांनी आपल्या कारवाया वाढविल्या आहेत. हौथींनी सौदीच्या इंधन प्रकल्प आणि लष्करी तळांवर बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांचे हल्ले चढविले. तर हिजबुल्लाह व हमासकडून इस्रायलच्या सीमेवर हल्ले सुरू आहेत. पण इराण व इराणसंलग्न गटांच्या कारवायांकडे इस्रायलने अजिबात दुर्लक्ष केले नसल्याचे संरक्षणदलप्रमुख मेजर जनरल कोशावी यांनी इस्रायली वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.

इराणचा अणुकार्यक्रम रोखणे हे इस्रायलचे मुख्य उद्दिष्ट असल्याचे कोशावी म्हणाले. यासाठी इस्रायलने आपल्या गुप्तचर यंत्रणेच्या हालचाली अधिक व्यापक करून लष्करी सज्जतेचा वेग वाढविल्याची माहिती दिली. ‘इराणला अण्वस्त्रसज्जतेपासून रोखणे हेच इस्रायलसमोरचे एकमेव उद्दिष्ट नाही. तर आखातात ३६० अंशात पसरलेला इराणचा प्रभाव कमी करणे देखील इस्रायलचे उद्दिष्ट आहे’, असे कोशावी म्हणाले.

यासाठी सिरियातील इराण व इराणसंलग्न दहशतवादी संघटनांवरील कारवाईचा उल्लेख इस्रायलच्या संरक्षणदलप्रमुखांनी केला. इस्रायलच्या लष्कराने हवाई हल्ले चढवून सिरियाच्या सीमेतून इस्रायलच्या सुरक्षेसाठी असलेला धोका काही प्रमाणात कमी केला आहे. पण हमास, हिजबुल्लाह यांच्याप्रमाणे आखाताच्या इतर भागातील इराणचा प्रभाव कमी करण्यासाठी इस्रायलचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती मेजर जनरल कोशावी यांनी दिली.

इस्रायलच्या संरक्षणदलप्रमुखांनी इराणला दिलेला हा इशारा महत्त्वाचा ठरतो. काही दिवसांपूर्वी इस्रायलचे संरक्षणमंत्री बेनी गांत्झ यांनी इराणला अण्वस्त्रसज्जतेपासून रोखण्यासाठी इस्रायलला लष्करी कारवाई करावी लागेल, असा इशारा दिला होता. इराण पुढच्या दोन महिन्यात अणुबॉम्बची निर्मिती करील, असा दावा गांत्झ यांनी केला होता. आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा आयोगानेही इराणच्या अणुकार्यक्रमातील हालचालींवर तीव्र चिंता व्यक्त केली होती. अशा परिस्थितीत, इस्रायलच्या संरक्षणदलप्रमुखांनी इराणविरोधात कारवाई तीव्र केल्याबाबत दिलेला इशारा महत्त्वाचा ठरतो.

दरम्यान, गेल्याच आठवड्यात इस्रायल आणि अमेरिकेच्या नौदलाने रेड सीच्या क्षेत्रात सराव केला होता. या ऐतिहासिक सराव असल्याचे दोन्ही देशांच्या नौदलाने प्रसिद्ध केले होते. यामध्ये अमेरिकेच्या पाचव्या आरमारातील युद्धनौकांनी सहभाग घेतला होता.

leave a reply