इस्रायलच्या नव्या सरकारची हमासवर पहिली कारवाई

जेरूसलेम – हमासच्या दहशतवाद्यांनी मंगळवारी इस्रायलच्या सीमाभागात बलून बॉम्बचे हल्ले चढविले. याच्या प्रत्युत्तरादाखल इस्रायलच्या लढाऊ विमानांनी हमासच्या ठिकाणांवर कारवाई केली. दोन दिवसांपूर्वीच इस्रायलची सूत्रे हाती घेणार्‍या नफ्ताली बेनेट आणि येर लॅपीड सरकारची गाझावरील ही पहिली कारवाई ठरते. सत्ताबदल झाला असला तरी इस्रायलच्या दहशतवादविरोधी धोरणात बदल होणार नसल्याचे बेनेट-लॅपीड सरकारने या कारवाईद्वारे दाखवून दिले आहे.

इस्रायलच्या नव्या सरकारची हमासवर पहिली कारवाईइस्रायल आणि शेजारच्या देशांबरोबर झालेल्या १९६७ सालच्या युद्धात मिळालेल्या विजयाचे स्मरण करण्यासाठी इस्रायली जनतेने मंगळवारी जेरूसलेममध्ये विजयी मिरवणूक काढली होती. या मिरवणूकीवर गाझापट्टीतील हमासने आक्षेप घेतला. सदर मिरवणूक पॅलेस्टिनींच्या भावना दुखावणारी असल्याचा ठपका हमासने ठेवला. यानंतर मंगळवारी संध्याकाळी गाझातून हमासचे दहशतवादी आणि समर्थकांनी इस्रायलच्या सीमाभागात बलून बॉम्बचे दहा हल्ले चढविले.

या हल्ल्यांमध्ये इस्रायलच्या सीमेतील शेतजमीन तसेच बागायतींमध्ये आगीने पेट घेतला. यामध्ये स्थानिकांचे मोठे नुकसान झाल्याचा दावा केला जातो. बुधवारी पहाटे इस्रायलच्या लढाऊ विमानांनी गाझातील हमासच्या ठिकाणांवर हल्ले चढवून याला प्रत्युत्तर दिले. हमासच्या दहशतवाद्यांचे प्लॅनिंग सेंटर्स नष्ट केल्याची माहिती इस्रायलच्या लष्कराने दिली. तसेच बलून बॉम्बच्या हल्ल्यांद्वारे हमास नव्या संघर्षासाठी चिथावणी देत असल्याचा आरोप इस्रायलच्या लष्कराने केला.

इस्रायलच्या नव्या सरकारची हमासवर पहिली कारवाईदोन दिवसांपूर्वीच हमासच्या नेत्यांनी इस्रायलला नव्या संघर्षाचा इशारा दिला होता. १० मे प्रमाणे इस्रायलवर रॉकेट्सचा शेकडो वर्षाव करण्याची धमकी हमासने दिली होती. तर हमासच्या काही नेत्यांनी आधीपेक्षाही अधिक भीषण हल्ले चढविण्याची घोषणा केली. हमासच्या या इशार्‍यानंतर इस्रायलच्या लष्कराने जोरदार तयारी केल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. गाझातून हल्ले झाले तर हमासच्या कोणत्या ठिकाणांवर हल्ले चढवायचे, याच्या सूचना संरक्षणमंत्री बेनी गांत्झ यांनी दिलेल्या आहेत. त्यामुळे हमासच्या हल्ल्यांना उत्तर देण्याची इस्रायलने आधीच तयारी केल्याचे समोर येत आहे.

गेल्या रविवारीच इस्रायलमध्ये नफ्ताली बेनेट आणि येर लॅपीड यांचे आठ पक्षांचे आघाडी सरकार सत्तेवर आले आहे. याआधी इस्रायली लष्कराच्या कमांडो पथकात जवान म्हणून कामगिरी बजावलेले पंतप्रधान बेनेट हे कडव्या गटाचे नेते आहेत. दोन वर्षांपूर्वी बेनेट यांनी नेत्यान्याहू यांच्या सरकारमध्ये चीफ ऑफ स्टाफ होते.

इस्रायलच्या नव्या सरकारची हमासवर पहिली कारवाईपंतप्रधान बेनेट हे माजी पंतप्रधान नेत्यान्याहू यांच्यापेक्षाही अधिक कडवे, द्विराष्ट्रवादाचे प्रखर विरोधक आणि वेस्ट बँकमधील इस्रायली निर्वासितांसाठी उभारल्या जाणार्‍या वस्त्यांच्या बांधकामाचे समर्थक मानले जातात. मात्र बेनेट यांच्याबरोबर आघाडी सरकारमध्ये असलेल्या इतर सात पक्षांची भूमिका यापेक्षा वेगळी असल्याचा दावा केला जातो. या आघाडी सरकारमध्ये अरबांच्या पक्षाचाही समावेश आहे.

दरम्यान, इस्रायलमध्ये झालेल्या या सत्ताबदलानंतर नवे आघाडी सरकार गाझातील हमास तसेच इराण, हिजबुल्लाहबाबत नेमके कसे धोरण स्वीकारते, याकडे जगाचे लक्ष लागले आहे. गाझातील हमासच्या ठिकाणांवर हल्ले चढवून बेनेट सरकारने दहशतवादविरोधी धोरण कायम राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

leave a reply