अझरबैजानमधील इस्रायलची उपस्थिती खपवून घेणार नाही

- इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांचा इशारा

इस्रायलची उपस्थितीमॉस्को – ‘कॉकशेसमधील भूराजकीय किंवा नकाशातील बदल इराण कदापि सहन करणार नाही. या क्षेत्रामध्ये दहशतवादी आणि इस्रायलची उपस्थिती इराणसाठी गंभीर चिंतेचा विषय आहे’, असा इशारा इराणचे परराष्ट्रमंत्री हुसेन अमीर-अब्दुल्लाहीया यांनी दिला. इस्रायल व अझरबैजानमधील वाढत्या लष्करी सहकार्याच्या पार्श्‍वभूमीवर, इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांनी हा इशारा दिल्याचे बोलले जाते. आपल्या पहिल्या रशिया दौर्‍यात परराष्ट्रमंत्री अब्दुल्लाहीया यांनी अझरबैजान व इस्रायल यांना हा इशारा देऊन आपल्या देशाची भूमिका स्पष्ट केली.

इराण आणि अझरबैजानमध्ये गेल्या काही आठवड्यांपासून तणाव निर्माण झाला आहे. अझरबैजानची तुर्की, पाकिस्तानबरोबर सहकार्य असून या देशाची इस्रायलबरोबरील जवळीकही वाढते आहे. गेल्या महिन्यात अझरबैजानने तुर्की व पाकिस्तानसह सीमेजवळ युद्धसराव आयोजित केला होता. यावर इराणने संताप व्यक्त करून अझरबैजानला खडसावले होते. प्रत्युत्तरादाखल इराणने देखील अझरबैजानच्या सीमेजवळ युद्धसराव सुरू केला.

अझरबैजानचे राष्ट्राध्यक्ष इल्हाम अलियेव्ह यांनी इराणच्या या सरावावर टीका केली. तसेच तुर्कीसह इराणच्या सीमेजवळ ‘इन्डीस्ट्रक्टेबल ब्रदरहूड’ नामक सराव करून अझरबैजानने इराणला प्रत्युत्तर दिले. यावर भडकलेल्या इराणने अझरबैजानच्या लष्करी विमानांसाठी आपली हवाईसीमा बंद केली. याचे पडसाद अझरबैजानमध्ये उमटले. राष्ट्राध्यक्ष अलियेव्ह यांनी राजधानी बाकूसह प्रमुख शहरांमध्ये इराणविरोधात मोठ्या कारवाईचे आदेश दिले. यानुसार इराणचे सर्वोच्च धार्मिक नेते आयातुल्ला खामेनी यांची कार्यालये व इतर इमारती बंद करण्याची सूचना अझेरी राष्ट्राध्यक्ष अलियेव्ह यांनी केली.

काही दिवसांपूर्वी राजधानी बाकूमध्ये पसरलेली कोरोनाची साथ याच कार्यालय व इमारतीतून पसरल्याचा दावा करून अझरबैजानच्या यंत्रणांनी आपल्या कारवाईचे समर्थन केले. पण इराणने याची गंभीर दखल घेतली असून लवकरच अझरबैजानला उत्तर मिळेल, असे धमकावले. अशा परिस्थितीत, इराणचे परराष्ट्रमंत्री अब्दुल्लाहीयान बुधवारी रशियामध्ये दाखल झाले. त्यांनी रशियन परराष्ट्रमंत्री सर्जेई लॅव्हरोव्ह यांची भेट घेतली.

रशियामध्ये दाखल होताच इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांनी अझरबैजान व इस्रायलमधील वाढत्या लष्करी सहाय्यावर आक्षेप घेतला. इस्रायल हा अझरबैजानला शस्त्रास्त्रांचा पुरवठा करणारा देश आहे. गेल्या वर्षी आर्मेनियाबरोबर झालेल्या संघर्षात अझरबैजानने इस्रायली बनावटीच्या ड्रोन्स तसेच इतर लष्करी तंत्रज्ञानाचा वापर केला होता. सध्या अझरबैजान इस्रायलकडून ऍरो-३ हवाई सुरक्षा यंत्रणा खरेदी करण्याच्या तयारीत असल्याचा दावा केला जातो. या पार्श्‍वभूमीवर, इराणने अझरबैजानला धमकावल्याचे दिसत आहे.

leave a reply