गाझातील रॉकेट हल्ल्याला इस्रायलचे हवाई हल्ल्यांद्वारे प्रत्युत्तर

गाझातीलजेरूसलेम – सलग दुसर्‍या रात्री इस्रायलच्या जेरूसलेममध्ये पॅलेस्टिनी निदर्शक आणि इस्रायली पोलिसांमध्ये संघर्ष झाला. यामध्ये किमान शंभर निदर्शक जखमी झाल्याचा दावा करण्यात येतो. या निदर्शकांच्या समर्थनार्थ शनिवारी रात्री गाझापट्टीतून इस्रायलवर रॉकेट हल्ला झाला. याच्या प्रत्युत्तरादाखल केलेल्या कारवाईत इस्रायली लढाऊ विमानांनी गाझातील हमासच्या ठिकाणांना लक्ष्य केले.

शुक्रवारी झालेल्या संघर्षामुळे इस्रायल, वेस्ट बँक आणि गाझापट्टीतील तणाव वाढला आहे. शनिवारी पॅलेस्टिनी निदर्शकांनी जेरूसलेमच्या रस्त्यावर उतरून इस्रायलविरोधात जोरदार निदर्शने केली. यावेळी काही निदर्शकांनी गाझातील हमास या संघटनेचे झेंडे हातात घेतले होते. इस्रायलने आधीच हमासला दहशतवादी संघटना घोषित केले आहे.

जेरूसलेममधील या संघर्षावर अरब-इस्लामी तसेच पाश्‍चिमात्य देशांमधून प्रतिक्रिया उमटल्या होत्या. या संघर्षावर चर्चा करण्यासाठी अरब लीगने सोमवारी तातडीची बैठक बोलाविली आहे. तर तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष एर्दोगन यांनी इस्रायल हा दहशतवादी देश असल्याची टीका केली आहे. तर लेबेनॉनमधील हिजबुल्लाहने यावर अलर्ट जारी केला आहे.

दरम्यान, शनिवारी मध्यरात्रीनंतर दीडच्या सुमारास इस्रायलच्या सीमेत रॉकेट हल्ला झाला. या हल्ल्यात कोणतीही हानी झाली नसल्याची माहिती इस्रायली लष्कराने दिली. याच्या दोन तासानंतर इस्रायलच्या लढाऊ विमानांनी हमासच्या दहशतवादी तळाला लक्ष्य केल्याचे इस्रायली लष्कराने घोषित केले.

leave a reply