सौदी, इजिप्तवरील टीकेविरोधात इस्रायलने बायडेन प्रशासनाला सावध केले

- इस्रायलच्या दैनिकाचा दावा

बायडेन प्रशासनाला सावधजेरूसलेम – अमेरिकेच्या बायडेन प्रशासनाने मानवाधिकारांच्या मुद्यावरुन सौदी अरेबिया आणि इजिप्तवर अतिरेकी टीका करू नये. यामुळे सौदी व इजिप्त अमेरिकेविरोधात जाऊन इराण, चीन आणि रशियाच्या गटात सामील होतील, असा इशारा इस्रायलने दिला आहे. इस्रायलच्या दैनिकाने सरकारी अधिकार्‍यांच्या हवाल्याने ही बातमी प्रसिद्ध केली. राष्ट्राध्यक्ष बायडेन यांच्या अफगाणिस्तानातील बेजबाबदार माघारीमुळे अमेरिकेने जगभरातील आपल्या मित्रदेशांचा विश्‍वास गमावल्याची चिंता व्यक्त केली जाते. अशा परिस्थितीत, इस्रायलने बायडेन प्रशासनाला दिलेला इशारा महत्त्वाचा ठरतो.

सात महिन्यांपूर्वी अमेरिकेची सत्तासूत्रे हातात घेतल्यानंतर राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी परराष्ट्र धोरणात मानवाधिकारांच्या प्रश्‍नाला महत्त्व देणार असल्याचे स्पष्ट केले होते. बायडेन यांनी उघडपणे सौदी अरेबिया आणि इजिप्तचा उल्लेख करण्याचे टाळले होते. पण अमेरिकेबरोबरचे संबंध टिकवायचे असतील तर मित्र व सहकारी देशांनी मानवाधिकारांवर काम करून आपल्या व्यवस्थेत सुधारणा करण्याची आवश्यकता असल्याचे बायडेन म्हणाले होते. या मुद्यावर अमेरिकेने सौदीचे लष्करी सहाय्य देखील स्थगित केले होते.

बायडेन प्रशासनाला सावधअमेरिकेच्या या भूमिकेवर इस्रायलने चिंता व्यक्त केल्याचा दावा इस्रायली दैनिकाने केला. अमेरिकेने सौदीचे क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान आणि इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अब्देल फताह अल-सिसी यांना टीकेचे लक्ष्य केले तर हे दोन्ही नेते अमेरिकेपासून दूर जातील. असे झाले तर सौदी व इजिप्त अमेरिकेच्या विरोधात इराण तसेच चीन आणि रशियाच्या गटात सामील होतील. या घडामोडी अमेरिका आणि इस्रायलच्या हितसंबंधांसाठी फारच घातक ठरतील, असा इशारा इस्रायलने बायडेन प्रशासनाला दिला. इस्रायली अधिकार्‍यांनी नाव जाहीर न करण्याच्या अटीवर ही माहिती दिली.

इस्रायलचे पंतप्रधान नफ्ताली बेनेट यांनी आठवड्याभरापूर्वी अमेरिकेचा दौरा केला होता. पंतप्रधान बेनेट यांनी राष्ट्राध्यक्ष बायडेन यांच्याबरोबरच्या भेटीत हा मुद्दा उपस्थित केला होता का, याची माहिती मिळालेली नाही. पण बेनेट सरकारने बायडेन प्रशासनाला सौदी व इजिप्तबाबतची आपली भूमिका याआधीच कळविल्याचे इस्रायली दैनिकाने म्हटले आहे. याबाबत अधिकृत स्तरावर अमेरिका आणि इस्रायलने प्रतिक्रिया दिलेली नाही.

दरम्यान, बायडेन प्रशासनाने इराणबरोबर अणुकराराच्या वाटाघाटी सुरू ठेवण्याचा घेतलेला निर्णय सौदी तसेच युएई, इजिप्त या देशांना मान्य नाही. अशा परिस्थितीत, बायडेन प्रशासनाने मानवाधिकारांच्या मुद्यावरुन सौदी व इजिप्तला दुखावले, तर हे दोन्ही देश अमेरिकेच्या विरोधात जातील. यासाठी दोन्ही अरब देश चीन आणि रशियाच्या गटात सामील होतील, याची जाणीव इस्रायल करून देत आहेत.

बायडेन यांचे प्रशासन अमेरिका व मित्रदेशांच्या हितापेक्षाही बायडेन प्रशासन मानवाधिकारांच्या मुद्यांना फाजिल महत्त्व देत असल्याची टीका अमेरिकेचे विरोधी पक्षनेते करीत आहेत. त्याचवेळी मानवाधिकार पायदळी तुडविणार्‍या चीन व इराणसारख्या देशांच्या कारवायांकडे बायडेन प्रशासन दुर्लक्ष करीत आहेत. ही बाब बायडेन प्रशासनाच्या धोरणातील विसंगती स्पष्ट करण्यासाठी पुरेशी ठरते, अशी खरमरीत टीका अमेरिकेच्या रिपब्लिकन पक्षाच्या नेत्यांनी केली आहे.

leave a reply