सिरियातील शहरांवर इस्रायलचे हवाई हल्ले

-सिरियाच्या सरकारी वृत्तवाहिनीचा दावा

दमास्कस/जेरूसलेम – इस्रायलच्या लढाऊ विमानांनी सिरियाच्या लताकिया आणि हमा प्रांतात हवाई हल्ले चढविले. यामध्ये एका नागरिकाचा बळी गेल्याचा आरोप सिरियाच्या सरकारी वृत्तवाहिनीने केला. सिरियन लष्कराने हवाई यंत्रणेद्वारे इस्रायलचे काही हल्ले यशस्वीरित्या भेदल्याचा दावा या वृत्तवाहिनीने केला. दोन आठवड्यांपूर्वी सिरियन लष्कराने इस्रायलच्या दिमोना अणुप्रकल्पाजवळ क्षेपणास्त्र हल्ला केला होता. सिरियाची विमानभेदी यंत्रणा नष्ट करून इस्रायलने या हल्ल्याला उत्तर दिले होते. त्यानंतर इस्रायलने सिरियामध्ये केलेली पहिली कारवाई असल्याचा दावा केला जातो.

सिरियन वृत्तवाहिनी ‘सना’ने दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री सव्वादोनच्या सुमारास इस्रायली लढाऊ विमानांनी हे हल्ले केले. लताकिया प्रांताच्या ‘अल-हफाह’ तर हमा प्रांताच्या ‘मसयाफ’ या दोन शहरांना इस्रायली लढाऊ विमानांनी लक्ष्य केले. यापैकी अल-हफाह शहरातील हल्ल्यात प्लास्टिक फॅक्टरीचा मोठा स्फोट होऊन एका महिलेचा बळी गेला. तर सहा जण जखमी झाले. मसयाफ शहरातील हल्ल्याचे तपशील सिरियन वृत्तवाहिनीने प्रसिद्ध केले नाही. सावध असलेल्या सिरियन लष्कराने हवाई सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित करून इस्रायलच्या हवाई हल्ल्यांना उत्तर दिले.

इस्रायलच्या लढाऊ विमानांनी नागरी ठिकाणांना लक्ष्य केल्याचा आरोप सिरियन वृत्तवाहिनीने केला. तर परदेशी माध्यमांच्या बातम्यांवर प्रतिक्रिया न देण्याची भूमिका इस्रायलच्या लष्कराने कायम ठेवली आहे. याआधीही इस्रायली लष्कराने सिरियाच्या या दोन्ही प्रांतात हल्ले चढविले होते, याकडे इस्रायली माध्यमे लक्ष वेधत होते.

लताकिया प्रांतातील क्षेपणास्त्र निर्मितीचा कारखाना आणि हमा येथील शस्त्रास्त्रांचे कोठार यांना इस्रायली विमानांनी लक्ष्य केले होते. सिरियातील या दोन्ही ठिकाणांचे नियंत्रण इराण व हिजबुल्लाहकडे असल्याचा आरोप इस्रायली माध्यमांनी त्यावेळी केला होता. त्यामुळे मंगळवारी मध्यरात्रीनंतर झालेल्या हल्ल्यातही इस्रायली लढाऊ विमानांनी याच दोन ठिकाणांना लक्ष्य केल्याची शक्यता आहे, असे इस्रायली माध्यमांचे म्हणणे आहे. त्याचबरोबर इस्रायल आणि सिरियातील तणावाच्या पार्श्‍वभूमीवर, सदर हल्ल्याकडे पाहिले जात आहे.

गेल्या महिन्यात २२ एप्रिल रोजी सिरियन लष्कराने इस्रायलच्या दिमोना अणुप्रकल्पाजवळ क्षेपणास्त्राचा हल्ला चढविला होता. निर्मनुष्य ठिकाणी सदर क्षेपणास्त्र कोसळल्यामुळे मोठी हानी टळली होती. इराणच्या माध्यमांनी सिरियन लष्कराच्या या कारवाईचे स्वागत केले होते. तर इस्रायलने प्रत्युत्तर म्हणून केलेल्या कारवाईत सिरियन लष्कराची हवाई सुरक्षा यंत्रणा उद्ध्वस्त केली होती. पुढच्या दोन दिवसात सिरियाच्या किनारपट्टीजवळ इराणच्या इंधनवाहू टँकरवर ड्रोन हल्ला झाला होता. यामध्ये इराणच्या टँकरचे मोठे नुकसान झाले होते. इस्रायलने हा हल्ला चढविल्याचा आरोप काही इराणी व सिरियन माध्यमांनी केला होता.

तर यानंतर काही दिवसात गाझापट्टीतून हमासच्या दहशतवाद्यांनी इस्रायलच्या सीमाभागात सलग चार दिवस रॉकेट हल्ले केले होते. इस्रायलने हमासच्या ठिकाणांना लक्ष्य करून या रॉकेट हल्ल्यांना उत्तर दिले होते. तसेच गाझापट्टीतील सागरीसीमा काही तासांसाठी बंद केली होती. अवघ्या आठवड्याभरात घडलेल्या या घडामोडींमुळे या क्षेत्रात तणाव निर्माण झाला होता.

दरम्यान, सिरियातील संघर्षाच्या आडून हिजबुल्लाहला शस्त्रसज्ज करणे आणि इराणने सिरियात लष्करी तळ उभे करणे खपवून घेणार नसल्याचा इशारा इस्रायलने दिला होता. यासाठी कुणाचीही पर्वा न करता, सिरियातील इराणच्या ठिकाणांवर हल्ले चढविले जातील, असे इस्रायलच्या नेत्यांनी बजावले होते.

leave a reply