सिरियातील इराणच्या तळावर इस्रायलचे क्षेपणास्त्र हल्ले

- दोन ठार, सहा जखमी

सना – सिरियाच्या होम्स भागात इस्रायलने चढविलेल्या क्षेपणास्त्रांच्या हल्ल्यांमध्ये दोन जण ठार झाले असून सहाजण जखमी झाल्याचा दावा ब्रिटनस्थित मानवाधिकार संघटनेने केला. इस्रायली लष्कराने इराणच्या नियंत्रणाखालील हवाइतळावर हल्ला चढविल्याची माहिती सिरियन वृत्तसंस्थेने दिली. त्याचबरोबर इस्रायलची आठ क्षेपणास्त्रे भेदल्याचा दावा सिरियन लष्कर करीत आहे. दरम्यान, इराणचे परराष्ट्रमंत्री सिरियाच्या दौर्‍यावर दाखल होण्याआधी इस्रायलने इराणच्याच ठिकाणावर क्षेपणास्त्र डागून इशारा दिल्याचे दिसत आहे.

सिरियातील इराणच्या तळावर इस्रायलचे क्षेपणास्त्र हल्ले - दोन ठार, सहा जखमीसिरियाच्या होम्स प्रांतातील टी-४ या प्रसिद्ध हवाईतळावर शुक्रवारी रात्री क्षेपणास्त्र हल्ले झाले. सिरियातील अस्साद राजवटीने फार आधीच या हवाईतळाचे नियंत्रण इराणच्या लष्कराकडे सोपविल्याचा दावा केला जातो. इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सचे जवान तसेच इराणसंलग्न दहशतवादी संघटनांनी या ठिकाणी तळ ठोकला आहे. म्हणूनच टी-४ हवाईतळ नेहमीच इस्रायलच्या हवाई हल्ल्यांचे लक्ष्य ठरते. शुक्रवारी देखील इराणी लष्कराच्या ताब्यातील तळावर इस्रायलने क्षेपणास्त्रे डागल्याचा दावा सिरियन लष्कर, माध्यमे व मानवाधिकार संघटना करीत आहेत.

टी-४ हवाईतळावरील ड्रोन्सच्या डेपोवर क्षेपणास्त्रांचे हल्ले झाल्याचे सिरियन माध्यमांचे म्हणणे आहे. या हल्ल्यांमध्ये दोघांचा बळी गेला असून हे इराणसंलग्न संघटनेचे दहशतवादी होते, असा दावा केला जातो. इस्रायलच्या गोलान टेकड्यांच्या भागातून सदर क्षेपणास्त्रे डागल्याचा आरोप सिरियन सरकारसंलग्न माध्यमे करीत आहेत. तसेच यातल्या १२ पैकी आठ क्षेपणास्त्रे यशस्वीरित्या भेदल्याचे सिरियन माध्यमांचे म्हणणे आहे. रशियन बनावटीच्या हवाई सुरक्षा यंत्रणेने इस्रायलचे हे हल्ले परतावून लावले. यामुळे मोठी जीवित तसेच वित्तहानी टळल्याचा दावा सिरियन लष्कर करीत आहे.

सिरियन लष्कर व माध्यमांच्या या आरोपांवर इस्रायली लष्कराने प्रतिक्रिया देण्याचे टाळले. महिन्याभरापूर्वी देखील सिरियाने इस्रायलवर क्षेपणास्त्रांचे हल्ले चढविल्याचा आरोप केला होता. इस्रायलच्या लढाऊ विमानांनी डागलेल्या २४ पैकी अर्ध्याहून अधिक क्षेपणास्त्रे हाणून पाडल्याचा दावा सिरियन लष्कराने केला होता. पण परदेशी माध्यमांमध्ये प्रसिद्ध होणार्‍या बातम्यांवर प्रतिक्रिया न देण्याची इस्रायली लष्कराची भूमिका आहे.सिरियातील इराणच्या तळावर इस्रायलचे क्षेपणास्त्र हल्ले - दोन ठार, सहा जखमी

याआधीही २०१८ साली इस्रायली लष्कराने होम्स प्रांतातील टी-४ हवाई तळाला लक्ष्य केले होते. या हल्ल्यात इराणचे जवान तसेच हिजबुल्लाहचे दहशतवादी मोठ्या संख्येने मारले गेले होते. त्याचबरोबर इराणचे मोठे नुकसान झाल्याचा दावा आंतरराष्ट्रीय माध्यमांनी केला होता. सिरियातील संघर्षाच्या आडून इराण हिजबुल्लाह व इतर दहशतवादी संघटनांना शस्त्रसज्ज करीत असल्याचा आरोप इस्रायलचे तत्कालिन पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू यांनी केला होता. तसेच कुठल्याही परिस्थितीत सिरियामध्ये इराणला लष्करी तळ प्रस्थापित करू देणार नसल्याचे नेत्यान्याहू यांनी ठणकावले होते.

दरम्यान, इराणचे परराष्ट्रमंत्री हुसेन अमीर अब्दुल्लाहियान यांनी शनिवारी सिरियाचा दौरा करून राष्ट्राध्यक्ष बशर अल अस्साद यांची भेट घेतली. त्याआधी सिरियातील इराणच्याच लष्करी तळावर झालेला हल्ला म्हणजे इराणचे राष्ट्राध्यक्ष रईसी यांच्या सरकारला इस्रायलने दिलेला इशारा असल्याचा दावा इस्रायली माध्यमे करीत आहेत.

leave a reply