इस्रायल-पॅलेस्टिनींमधील संघर्ष वाढला

-चिंता व्यक्त करणार्‍या अमेरिकेला इस्रायलने फटकारले

जेरूसलेम/वॉशिंग्टन – गेल्या दोन दिवसांपासून जेरूसलेममध्ये इस्रायली पोलीस दल आणि पॅलेस्टिनी निदर्शकांमध्ये सुरू असलेला संघर्ष सोमवारी सकाळी अधिकच तीव्र झाला. काही तास सुरू असलेल्या या संघर्षात तीनशेहून अधिक जण जखमी झाले असून २०६ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच गेल्या चोवीस तासात हमासने गाझापट्टीतून इस्रायलवर सात रॉकेट हल्ले चढविले आहेत. इस्रायल आणि पॅलेस्टिनींमधील संघर्षावर जगभरातून प्रतिक्रिया येत असून अमेरिकेनेही यावर चिंता व्यक्त केली आहे. पण यावर चिंता व्यक्त करण्यापेक्षा अमेरिकेने हिंसाचार माजविणार्‍यांच्या मागे उभे राहणार्‍यांवर दबाव टाकला तर ते अधिक उपकारक ठरेल, असे इस्रायलने फटकारले आहे.

इस्रायल-पॅलेस्टिनींमधील संघर्ष वाढला - चिंता व्यक्त करणार्‍या अमेरिकेला इस्रायलने फटकारलेशुक्रवार संध्याकाळपासून इस्रायलच्या जेरूसलेममध्ये जोरदार संघर्ष पेटला आहे. इस्रायली पोलीस आणि पॅलेस्टिनींमधील या संघर्षात आत्तापर्यंत ४०० हून अधिक जण जखमी झाले होते. जेरूसलेमसह शेख जराह या शेजारच्या भागातही हिंसाचार सुरू झाला आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू यांनी हा संघर्ष थांबविण्याचे आवाहन केले होते. तसेच दरवर्षी १० मे रोजी साजर्‍या केल्या जाणआर्‍या ‘जेरूसलेम डे’च्या कार्यक्रमातही इस्रायली पंतप्रधानांनी बदल सुचविले होते.

पण सोमवारी सकाळी ७ वाजल्यानंतर अल अक्सा प्रार्थनास्थळाच्या परिसरात इस्रायली पोलीस आणि पॅलेस्टिनी निदर्शकांमध्ये पुन्हा संघर्ष भडकला. निदर्शकांनी इस्रायली पोलिसांवर जोरदार दगडफेक केली. तर इस्रायली पोलिसांनी निदर्शकांवर अश्रुधूर तसेच रबर बुलेट्सचा मारा केला. या संघर्षात ३०५ पॅलेस्टिनी निदर्शक तर इस्रायलचे १६ पोलीस जवान जण जखमी झाले आहेत. यापैकी २०५ निदर्शकांना आणि एका जवानाला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सात निदर्शकांची प्रकृती चिंताजनक असल्याचा दावा पॅलेस्टिनी संघटना करीत आहे.

जेरूसलेममध्ये हा संघर्ष सुरू असताना गाझापट्टीतून हमासने इस्रायलच्या सीमेवर रॉकेट हल्ले सुरू ठेवले. रविवारी रात्री दोन तर मध्यरात्रीनंतर दोन असे चार रॉकेट्स इस्रायलच्या दक्षिणेकडील अश्केलॉन भागात कोसळले. सीमेवर तैनात आयर्न डोमने यातील दोन रॉकेट्स यशस्वीरित्या भेदले. तर सोमवारी पहाटे गाझातून आणखी तीन रॉकेट हल्ले करण्यात आले. याशिवाय गेल्या दोन दिवसांपासून गाझातून इस्रायलच्या सीमाभागात बलून बॉम्बचे हल्ले सुरू झाले आहेत. प्रत्युत्तरादाखल इस्रायली लष्कराने गाझातील हमासच्या ठिकाणांना लक्ष्य केले.

इस्रायल-पॅलेस्टिनींमधील संघर्ष वाढला - चिंता व्यक्त करणार्‍या अमेरिकेला इस्रायलने फटकारलेजेरूसलेममधील घटनेसाठी हमासने इस्रायलला जबाबदार धरले असून येत्या काळात इस्रायलवरील हल्ले वाढविण्याची धमकी हमासने दिली आहे. या पार्श्‍वभूमीवर, इस्रायलने गाझाच्या सीमेवरील आपल्या जवानांना सज्ज ठेवले आहे. तर उत्तरेकडील लेबेनॉनच्या सीमेजवळ इस्रायलने मोठा सराव सुरू केला आहे. इस्रायलच्या या सरावानंतर लेबेनॉनमधील हिजबुल्लाहने देखील सीमेवरील लष्करी हालचाली वाढविल्याच्या बातम्या येत आहेत.

तुर्कीने जेरूसलेममधील संघर्षावर जहाल प्रतिक्रिया दिली आहे. जेरूसलेममधील हल्ला हा आमच्या सर्वांच्या सन्मानावरील हल्ला ठरतो. या सन्मानाचे रक्षण करणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे’, असे तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष एर्दोगन यांच्या कार्यालयाने नोंदविलेल्या प्रतिक्रियेत नमूद करण्यात आले आहे.

तर अमेरिकेच्या बायडेन प्रशासनाने देखील सदर संघर्षावर चिंता व्यक्त केली. अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॅक सुलिवन यांनी इस्रायलचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मिर बेन शबात यांच्याबरोबर फोनवरुन ही चिंता व्यक्त केल्याचे व्हाईट हाऊसने म्हटले आहे. ‘सातत्याने चिथावण्या मिळूनही इस्रायल दुसर्‍यांच्या सार्वभौमत्वाचा आदर राखून, जबाबदारीने आणि सामाजिक जाणीव ठेवून हे प्रकरण हाताळत आहे. पण ज्यांना इस्रायलवर दबाव आणायचा आहे, ते या प्रकरणात आंतरराष्ट्रीय हस्तक्षेप घडवून दंगलखोरांना सहाय्य करीत आहेत’, अशी टीका यावेळी शबात यांनी केली.

‘या संघर्षावर चिंता व्यक्त करण्यापेक्षा बायडेन प्रशासनाने हा हिंसाचार माजविणार्‍यांचे समर्थन करणार्‍यांवर दबाव टाकला तर ते इस्रायलसाठी उपकारक ठरेल’, असा टोला इस्रायलच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांनी लगावला आहे.

leave a reply