इस्रायलचे पंतप्रधान बेनेट यांची इजिप्तच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा

बेनेटकैरो/जेरुसलेम – इस्रायलचे पंतप्रधान नफ्ताली बेनेट यांनी सोमवारी ‘शर्म अल शेख’मध्ये इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अब्देल फताह अल-सिसी यांची भेट घेतली. इस्रायलच्या प्रमुखांनी इजिप्तच्या राष्ट्राध्यक्षांची अधिकृत भेट घेण्याची गेल्या दशकभरातील ही पहिलीच वेळ आहे. यापूर्वी २०११ साली इस्रायलचे तत्कालिन पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू यांनी इजिप्तचे तत्कालिन राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मोर्सी यांची भेट घेतली होती. गेल्या काही वर्षात इजिप्तने मुस्लिम ब्रदरहूडसह दहशतवादी व कट्टरपंथी गटांविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. त्याचवेळी गाझा पट्टीतील हिंसाचाराच्या मुद्यावर इजिप्त इस्रायलला सहकार्य करीत असून, इराणच्या मुद्यावरही इस्रायलच्या भूमिकेचे समर्थन केल्याचे समोर आले आहे. या पार्श्‍वभूमीवर इस्रायली पंतप्रधानांची इजिप्त भेट लक्ष वेधून घेणारी ठरते.

सोमवारी इस्रायलचे पंतप्रधान नफ्ताली बेनेट इजिप्तच्या सिनाई प्रांतातील शर्म अल शेखमध्ये दाखल झाले. यावेळी त्यांनी इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष सिसी यांची भेट घेऊन महत्त्वाच्या मुद्यांवर चर्चा केल्याची माहिती दोन्ही बाजूंनी दिली आहे. चर्चेत गाझातील संघर्ष, हमासला होणारे शस्त्रसहाय्य रोखणे, इराणचा अणुकार्यक्रम, लिबियन संघर्षात तुर्कीचा हस्तक्षेप यासारख्या मुद्यांचा समावेश होता, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

बेनेटराष्ट्राध्यक्ष सिसी यांच्याबरोबरील भेटीनंतर इस्रायलचे पंतप्रधान बेनेट यांच्याकडून निवेदन जारी करण्यात आले. ‘इजिप्तच्या राष्ट्राध्यक्षांबरोबरील भेट महत्त्वाची होती व चांगल्या वातावरणात पार पडली. इस्रायल व इजिप्तदरम्यान दूरगामी सहकार्याच्या दृष्टिने पाया रचण्यात आला आहे. दोन्ही नेत्यांदरम्यान राजनैतिक, सुरक्षाविषयक तसेच आर्थिक मुद्यांवर चर्चा झाली. त्याचवेळी संबंध अधिक मजबूत करण्यासाठी तसेच दोन्ही देशांचे हितसंबंध जपण्यासाठी विविध मार्गांबाबत बोलणी झाली’, असे निवेदनात सांगण्यात आले.

इजिप्तकडून राष्ट्राध्यक्ष सिसी यांच्या प्रवक्त्यांनी इस्रायली पंतप्रधानांबरोबरील भेटीनंतर प्रतिक्रिया दिली आहे. राष्ट्राध्यक्ष सिसी यांनी आखातातील शांतीसाठी सुरू असलेल्या सर्व प्रकारच्या प्रयत्नांना समर्थन देण्याचे आश्‍वासन दिले आहे, असे प्रवक्त्यांनी म्हंटले आहे. सिसी यांनी इजिप्तच्या वृत्तवाहिनीवर दिलेल्या माहितीत, गाझातील संघर्षबंदी तसेच इथिओपियाकडून उभारण्यात येणार्‍या धरणाच्या मुद्यावर चर्चा झाल्याची माहिती दिली.

इजिप्त हा १९७९ साली इस्रायलबरोबर शांतीकरार करणारा पहिला अरब देश ठरला होता. त्यानंतर इजिप्तने इस्रायल व हमासमधील संघर्षात मध्यस्थ म्हणून सातत्याने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. गेल्या काही वर्षात इस्रायल व इजिप्तच्या नेत्यांमध्ये तसेच अधिकार्‍यांदरम्यान अनेक गोपनीय बैठका झाल्याची माहिती प्रसारमाध्यमांमधून समोर आली होती. मात्र दोन्ही देशांनी त्याला अधिकृतरित्या दुजोरा दिलेला नाही. २०१८ साली इस्रायलचे तत्कालिन पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू यांनी इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष सिसी यांची भेट घेतल्याचा दावाही करण्यात आला होता.

leave a reply