इस्रायलच्या सिरियावरील हल्ल्यांना सर्व शक्तीनिशी उत्तर दिले जाईल

- सिरियन परराष्ट्र मंत्रालयाचा इशारा

शक्तीनिशी उत्तरदमास्कस – ‘आपला भूभाग आणि जनते व सार्वभौमत्वाच्या सुरक्षेसाठी अधिकारांचा प्रयोग करताना सिरिया अजिबात मागे हटणार नाही. इस्रायलच्या हल्ल्यांना सर्व शक्तीनिशी उत्तर दिले जाईल’, असा इशारा सिरियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिला. तसेच आंतरराष्ट्रीय समुदायाने इस्रायलविरोधात कठोर भूमिका स्वीकारावी, अशी मागणी सिरियाने केली. या आठवड्यात इस्रायलने सिरियात सलग दोन हवाई हल्ले चढविले. त्यावर सिरियाची ही प्रतिक्रिया आली आहे.

गेल्या पाच दिवसात इस्रायलच्या हवाईदलाने दोन वेळा सिरियात हल्ले चढविल्याचा आरोप सिरियन सरकारने केला आहे. यापैकी अलेप्पोच्या अल-सफिरा येथील हवाई हल्ले रोखल्याचा दावा सिरियन लष्कराने केला. मात्र सिरियाचे दावे खोटे असून इस्रायलच्या या हवाई हल्ल्यात इथल्या इराणच्या लष्करी तळाचे नुकसान झाल्याचे सिरियन मानवाधिकार संघटना व स्थानिक देखील सांगत आहेत. या हल्ल्याला चोवीस तास उलटत नाही तोच, इस्रायली लढाऊ विमानांनी सिरियाच्या होम्स प्रांतात नवे हवाई हल्ले चढविले.

होम्सच्या अल-कुसार भागातील हवाई हल्ल्यात सिरियाचे मोठे नुकसान झाल्याचा दावा केला जातो. या हल्ल्यात येथील लष्करी तळातील साहित्याची मोठी हानी झाल्याची कबुली सिरियाच्या संरक्षण मंत्रालयाने दिली. या हल्ल्यावरूनही सिरियन सरकारचे दावे व स्थानिकांनी दिलेली माहिती परस्परविरोधी आहे. इराणच्या वृत्तवाहिनीने मात्र होम्स प्रांतात दोन हल्ले झाल्याची बातमी दिली. त्यामुळे सिरियाचे सरकार इस्रायलच्या हवाई हल्ल्यांची तीव्रता कमी करून आपली प्रतिष्ठा राखण्यासाठी धडपडत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे.

शक्तीनिशी उत्तरसिरियन परराष्ट्र मंत्रालयाने या हल्ल्यांवरून इस्रायलला पुन्हा एकदा धमकी दिली. ‘संयुक्त राष्ट्रसंघ आणि आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार स्वसंरक्षणाच्या अधिकारांचा वापर करून सिरिया इस्रायलच्या हल्ल्यांना प्रत्युत्तर देईल. इस्रायलने आपले हल्ले वेळीच थांबविले नाही तर त्याचे गंभीर परिणाम होतील’, असे सिरियन परराष्ट्र मंत्रालयाने बजावले आहे. त्याचबरोबर सिरियातील दहशतवाद्यांच्या सुरक्षेसाठी इस्रायल हे हल्ले चढवित असल्याचा आरोप सिरियन परराष्ट्र मंत्रालयाने केला.

इस्रायलच्या सिरियातील या हल्ल्यांवर रशिया आणि चीनने नाराजी व्यक्त केली होती. चीनचे परराष्ट्रमंत्री वँग यी यांनी गेल्या आठवड्यात सिरियाचा दौरा केला होता. या दौर्‍यात सिरियाच्या सार्वभौमत्वावरील हल्ले चुकीचे ठरवून चीनच्या परराष्ट्रमंत्र्यांनी इस्रायलवर टीका केली होती. त्याचबरोबर सिरियाबरोबरचे सहकार्य वाढविण्याची घोषणा चीनने केली.

दरम्यान, इस्रायलप्रमाणे अमेरिकेनेही सिरियात हवाई हल्ले चढविल्याचा दावा केला जातो. दोन दिवसांपूर्वी सिरियातील इराणसंलग्न ठिकाणांवर अमेरिकेने हे हल्ले चढविले होते, अशा बातम्या समोर आल्या आहेत.

leave a reply