इटलीच्या पंतप्रधानांचे चीनवर टीकास्त्र

लंडन – एकाधिकारशाही गाजविणारा चीन लोकशाहीवादी देशांनी स्वीकारलेल्या बहुपक्षीय नियमांची पर्वा करायला तयार नाही, असा शेरा इटलीचे पंतप्रधान मारिओ द्राघी यांनी मारला. तसेच चीनच्या ‘बीआरआय-बेल्ट अँड रोड इनिशिएटीव्ह’ प्रकल्पात सहभागी झालेला इटली आता याच्या कराराकडे अधिक बारकाईने पाहून त्यावर फेरविचार करणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा पंतप्रधान द्राघी यांनी केली.

इटलीलंडनमध्ये आयोजित करण्यात आलेल्या ‘जी7’च्या बैठकीत कोरोनाच्या उगमस्थानाचा तपास व चीनच्या आर्थिक वर्चस्ववादाचा मुद्दा ऐरणीवर होता. जी7च्या सदस्यदेशांनी यावर आक्रमक भूमिका घेऊन चीनवरील दडपण प्रचंड प्रमाणात वाढविले आहे. चीनच्या ‘बीआरआय’ प्रकल्पात सर्वात आधी सहभागी होणारा युरोपिय देश इटली होता. इटलीने चीनचे जोरदार समर्थन केले होते व चीनकडून 19.25 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक मिळविली होती. पण इटलीमध्ये कोरोनाची साथ फैलावल्यानंतर या देशाची चीनबाबतची भूमिका बदलली आहे.

सुरूवातीला कोरोनाचा विषाणू आपल्या देशातून नाही, तर इटलीतूनच सर्वत्र पसरला, असा कांगावा चीनने सुरू केला होता. याचा परिणाम इटलीवर झाला असून आता जी7 परिषदेत इटलीने चीनच्या विरोधात जहाल भूमिका स्वीकारली. जी7 परिषदेने चीनच्या बीआरआय प्रकल्पाला आव्हान देण्यासाठी ‘बी3डब्ल्यू’ प्रकल्पाची घोषणा करून यासाठी चार ट्रिलियन डॉलर्सची घोषणा केली आहे. त्यामुळे चीनच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला जगभरात आव्हान मिळेल व इटलीची बदललेली भूमिका याचे संकेत देत आहे.

‘एकाधिकारशाही गाजविणारा चीन लोकशाहीवादी देशांकडून स्वीकारण्यात आलेले बहुपक्षीय नियमांची पर्वा करीत नाही. सर्वच देशांनी सहकार्याला प्राधान्य द्यायला हवे खरे. त्याचवेळी आपल्याला सत्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही’, अशा शब्दात इटलीच्या पंतप्रधानांनी चीनवर ताशेरे ओढले. चीनच्या अशा कारवाया सुरू असताना, शांत राहणे म्हणजे चीनला साथ देण्यासारखेच ठरते, असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडेन म्हणाले होते. त्यांच्या दाव्याला इटलीच्या पंतप्रधानांनी दुजोरा दिला.
दरम्यान, कोरोनाच्या साथीमुळे निर्माण?झालेल्या भयंकर परिस्थितीला चीन जबाबदार असल्याच्या आरोपांना अधिकधिक बळ मिळत आहे. यामुळे जागतिक जनमत चीनच्या विरोधात गेले आहे व प्रमुख देशांच्या चीनबाबत बदलेल्या भूमिकेतून ही बाब अधोरेखित होत आहे. इटलीच्या पंतप्रधानांनी उघडपणे चीनवर केलेली टीका हेच दाखवून देत आहे.

leave a reply