‘आयटीबीपी ‘ छत्तीसगडमध्ये आठ हजार जवानांची कायमस्वरूपी तैनात करणार

माओवाद्यांविरोधातील मोहिमेला बळकटी देण्यासाठी निर्णय

रायपूर – इंडो- तिबेट सीमा पोलीस दलाने (आयटीबीपी) छत्तीसगडमध्ये आठ हजार जवानांना कायमस्वरूपी तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे. नुकतीच यासाठी केंद्र सरकारने मंजुरी दिली होती. त्यामुळे येथील माओवाद्यांविरोधातील मोहिमेला अधिक बळकटी देता येईल. जम्मू-काश्मीरमध्ये भारतीय लष्कराने राष्ट्रीय रायफलच्या जवानांना कायम स्वरूपी तैनात केले जाते. त्याच धर्तीवर छत्तीसगडमध्ये ‘आयटीबीपी’च्या जवानांची तैनाती होत आहे.

आतापर्यत आयटीबीपीच्या जवानांना तीन वर्षांसाठी तैनात करण्यात येत होते. दर तीन वर्षांनी आयटीबीपीचे नवीन जवान तैनात होत असल्याने या जवानांना प्रशिक्षण द्यावे लागत असे. येथील भौगोलिक प्ररीस्थिती आणि माओवाद्यांबद्दल नव्याने माहिती द्यावी लागत असे. पण कायमस्वरूपी तैनातीच्या निर्णयामुळे प्रत्येकवेळी जवानांना प्रशिक्षण देण्याची आवश्यकता भासणार नाही. तसेच जवानांना कायमस्वरूपी तैनात करण्यात येणार असल्याने माओवाद्यांविरोधातील मोहिमेत पकड अधिक घट्ट होण्यास मदत मिळेल. याचबरोबर गुप्तचरांचे जाळे विस्तारण्याच्या दृष्टीने मदत मिळेल असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

आयटीबीपी छत्तीसगडमध्ये आठ बटालियन (एका बटालियनमध्ये एक हजार जवान) तैनात करणार आहे. आयटीबीपीकडे प्रामुख्याने ३४८८ किलोमीटरच्या भारत-चीन नियंत्रण रेषेच्या सुरक्षेची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. मात्र मागिल काही वर्षांपासून माओवाद्यांविरोधातील मोहिमेसाठीही आयटीबीपीच्या जवानांना तैनात करण्यात आले आहे.

सध्या छत्तीसगडच्या वेगवेगळ्या विभागात सुरक्षादलाचे सुमारे ८० हजार जवान तैनात आहेत. जम्मू- काश्मीरमधून दहशतवादाचे पूर्ण उच्चाटन करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे, तसेच देशातून माओवाद्यांच्याही संपूर्ण उच्चाटनासाठी मोहीम राबविण्यात येत आहे. माओवाद्यांचा प्रभाव अजून कायम असलेल्या भागांमध्ये मोहीम अधिक तीव्र करण्याच्या दृष्टीने आयटीबीपीच्या जवानांच्या कायमस्वरूपी तैनातीकडे पहिले जात आहे.

leave a reply