जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला चढविण्याचे ‘जैश’चे भयंकर कारस्थान

नवी दिल्ली – ११ मे रोजी जम्मू-काश्मीरमधील भारतीय लष्कर तसेच निमलष्करी दलाच्या तळांवर दहशतवादी हल्ले चढविण्याचे भयंकर कारस्थान ‘जैश-ए-मोहम्मद’ने आखले आहे. पाकिस्तानी लष्कराचे मुख्यालय असलेल्या रावळपिंडी इथे या देशाची कुख्यात गुप्तचर संघटना आयएसआयचे अधिकारी व जैशच्या नेत्यांची यासंदर्भात बैठक पार पडली.भारतीय गुप्तचर विभागातील सूत्रांच्या हवाल्याने माध्यमांनी याबाबतचे वृत्त प्रसिद्ध केले आहे. त्याचवेळी ‘लष्कर-ए -तोयबा’ आणि ‘जैश’ या दहशतवादी संघटनांनी भारताच्या विरोधात हातमिळवणी केल्याच्या बातम्याही समोर येत आहेत.

जम्मू-काश्मीरच्या नियंत्रण रेषेवरून ‘जैश’च्या सुमारे पंचवीस ते तीस दहशतवाद्यांनी घुसखोरी करण्यात यश मिळवल्याचे वृत्त आहे. तसेच आणखी सुमारे सत्तर दहशतवादी पीओके मधून जम्मू-काश्मीरमध्ये घुसखोरीच्या तयारीत असल्याच्या बातम्या येत आहेत. त्यांना घुसखोरी करण्यासाठी वाव मिळावा याकरिता पाकिस्तानचे लष्कर नियंत्रण रेषेवर गोळीबार तसेच मॉर्टर्सचा मारा करीत असल्याचे वेळोवेळी स्पष्ट झाले होते. या पार्श्वभूमीवर जैशचे प्रमुख असलेल्या मौलाना मसूद अजहर याचा भाऊ मुफ्ती अब्दुल रोफ असगर याने रावळपिंडी येथे आयएसआयच्या अधिकाऱ्यांची भेट घेतल्याचे वृत्त आहे. मौलाना मसूद अझहर सध्या आजारी असून मुफ्ती अब्दुल रोफ असगर याच्याकडेच जैशचे नेतृत्व असल्याचे सांगितले जाते.

या बैठकीतच ११ मे रोजी जम्मू-काश्मीरमधील भारतीय लष्कर व निमलष्करी दलाच्या तळावर भीषण हल्ले चढविण्याचे भयंकर कारस्थान आखण्यात आले. भारताच्या गुप्तचर विभागाने याची माहिती मिळवली असून गुप्तचर विभागातील सूत्रांच्या हवाल्याने माध्यमांनी याबाबतचे वृत्त प्रसिद्ध केले आहे. गेल्यावर्षी जैशने पुलवामा येथे भीषण दहशतवादी हल्ला घडवून सीआरपीएफच्या ४० जवानांचा बळी घेतला होता. यानंतर खवळलेला भारताने पाकिस्तानच्या बालाकोट येथील जैशच्या तळावर हवाई हल्ला चढवून शेकडो दहशतवाद्यांना ठार केले होते. या हल्ल्याचा सूड घेण्यासाठी जैश आसुसलेली असल्याचे अनेकवार समोर आले होते.

११ मे रोजी जैशचे दहशतवादी आत्मघाती हल्ल्याद्वारे भारतीय लष्कर व निमलष्करी दलाच्या स्थळांना लक्ष्य करतील, ही गोपनीय माहिती मिळाल्यानंतर भारतीय सुरक्षा यंत्रणा हायअलर्ट वर असल्याची माहिती माध्यमांनी दिली आहे. याबरोबरच पाकिस्तानातून आलेल्या आणखी एका बातमीमुळे जैश व लष्कर-ए-तोयबाचे दहशतवादी भारताच्या विरोधात हातमिळवणी करीत असल्याचे उघड झाले आहे. भारतीय सुरक्षा दलाने जम्मू-काश्मीरमध्ये केलेल्या आक्रमक कारवाईमुळे या दोन्ही दहशतवादी संघटनांची क्षमता बर्‍याच प्रमाणात कमी झाली आहे. तसेच एप्रिल महिन्यात सुरक्षा दलांनी २८ दहशतवाद्यांना ठार केले होते. म्हणूनच या दोन्ही संघटनांना एकमेकांचे सहाय्य घ्यावे लागत असल्याचे दिसते. पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी संघटनांनी यापुढे भारतात घातपात घडविला तर पाकिस्तानला त्याची जबर किंमत चुकती करण्यास भाग पाडले जाईल , असा इशारा भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी दिला होता. संरक्षण दलप्रमुख जनरल बिपिन रावत, लष्कर प्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे यांनीही पाकिस्तानला सज्जड शब्दात परिणामांची जाणीव करून दिली आहे. तरीही पाकिस्तान दहशतवादाचा मार्ग सोडायला तयार नसल्याचे आयएसआयच्या साथीने जैशने आखलेल्या कारस्थानावरून उघड होत आहे.

leave a reply