वायुसेनेच्या तळावरील घातपाताला प्रत्युत्तर दिले जाईल

- संरक्षणमंत्री राजनाथ सिंग

कानपूर – जम्मूमधील वायुसेनेच्या तळावर ड्रोन द्वारे घडविण्यात आलेल्या स्फोटांना प्रत्युत्तर दिले जाईल. याबाबतचा निर्णय भारतीय लष्कर घेईल, असे संरक्षणमंत्री राजनाथ सिंग म्हणाले. ‘लश्कर-ए-तोयबा’ व ‘द रेझिस्टन्स फ्रंट-टीआरएफ’ पाकिस्तानपुरस्कृत दहशतवादी संघटना जम्मूमधील स्फोटामागे असल्याचे उघड होत आहे. त्यामुळे या घातपाताला प्रत्युत्तर देण्याचा संरक्षणमंत्र्यांनी दिलेला इशारा पाकिस्तानला उद्देशूनच असल्याचे समोर येत आहे. त्याचवेळी सीमेपलिकडून येणारे ड्रोन्स हुडकून ते नष्ट करणारी यंत्रणा लवकरच कार्यान्वित होईल, असे संरक्षणमंत्र्यांनी स्पष्ट केले. या आघाडीवर देश सुरक्षित असून भारतीय लष्कराकडे अशा हल्ल्यांना उत्तर देण्याचे सामर्थ्य आहे, अशी ग्वाही संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी देशवासियांना दिली.

वायुसेनेच्या तळावरील घातपाताला प्रत्युत्तर दिले जाईल - संरक्षणमंत्री राजनाथ सिंगकानपूरमध्ये एका कार्यक्रमात बोलताना संरक्षणमंत्र्यांनी जम्मूमधील वायुसेनेच्या तळावर ड्रोनद्वारे घडविण्यात आलेल्या स्फोटाची गंभीर दखल घेतल्याचे संकेत दिले. अशा हल्ल्यांना तोंड देण्याचे सामर्थ्य भारतीय लष्कराकडे आहे. पुढच्या काळात सीमेपलिकडून येणार्‍या ड्रोन्सवर कारवाई करण्यासाठी यंत्रणा लवकरच सक्रीय करण्यात येईल, अशी माहितीही संरक्षणमंत्र्यांनी दिली. मात्र जम्मूमधील वायुसनेच्या तळावर घातपात घडवून आणणार्‍या पाकिस्तानवर आणखी एक सर्जिकल स्ट्राईक करणार का, या प्रश्‍नाला संरक्षणमंत्र्यांनी सूचक शब्दात उत्तर दिले. भारतीय लष्कर पूर्णपणे सावध आहे आणि देशाच्या सीमा सुरक्षित आहेत. लष्कर देशाच्या सुरक्षेसमोरील कुठल्याही आव्हानाचा सामना करण्यासाठी सज्ज आहेत. ड्रोन हल्ल्यांना कधी व कसे प्रत्युत्तर द्यायचे त्याचा निर्णय पूर्णपणे लष्कराकडूनच घेतला जाईल, असे राजनाथ सिंग म्हणाले.

दरम्यान, वायुसेनेच्या तळावर ड्रोनद्वारे घडविण्यात आलेल्या स्फोटामागे ‘लश्कर-ए-तोयबा’ व ‘द रेझिस्टन्स फ्रंट-टीआरएफ’ या दहशतवादी संघटना असल्याचे स्पष्ट होऊ लागले आहे. यासाठी दीड किलो आरडीएक्स स्फोटके वापरण्यात आली होती. तसेच हे ड्रोन्स जीपीएस यंत्रणेद्वारे संचलित केले जात होते, अशी माहितीही उघड झाली आहे. त्यामुळे या घातपातामागील पाकिस्तानच्या सहभागाची खात्री सुरक्षा यंत्रणांना पटल्याचे संकेत मिळत आहेत. काही दिवसांपूर्वी केंद्रीय गृहराज्यमंत्री जी. किशन रेड्डी यांनी या घातपातामागे पाकिस्तानचा हात असू शकतो, असा संशय व्यक्त केला होता. जम्मू व काश्मीरचे पोलीस महासंचालक दिलबाग सिंग यांनीही ड्रोन्स रस्त्यावर तयार होऊ शकत नाही, असे सांगून या प्रकरणी पाकिस्तानवर आरोप केले होते.वायुसेनेच्या तळावरील घातपाताला प्रत्युत्तर दिले जाईल - संरक्षणमंत्री राजनाथ सिंग

भारतात घातपात माजविण्यासाठी जम्मू व काश्मीरच्या नियंत्रण रेषेबरोबरच पंजाबच्या सीमेवर पाकिस्तानने ड्रोन्सद्वारे स्फोटके व अमली पदार्थांची तस्करी केली होती, याकडे दिलबाग सिंग यांनी लक्ष वेधले आहे.

दरम्यान, भारत पाकिस्तानच्या विरोधात जम्मूमधील या घातपाताचे पुरावे जमा करीत असताना, पाकिस्तानने मात्र भारतावरच दहशतवादाचे आरोप लगावले आहेत. भारत दहशतवाद्यांना पैसे पुरवित असल्याचा आरोप करून सार्‍या जगासमोर ही बाब मांडण्यात येईल, असे पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरेशी यांनी म्हटले आहे. लाहोरमध्ये हफीज सईद या दहशतवादी नेत्याच्या घराजवळ झालेल्या बॉम्बस्फोटामागे भारत असल्याचा ठपका ठेवून पाकिस्तानकडून हे आरोप केले जात आहेत. मात्र या आरोपांमुळे पाकिस्तानसमोरील अडचणींमध्ये अधिक वाढ होण्याची शक्यता आहे.

leave a reply