जम्मू-काश्मीरमध्ये पुलवामासारख्या हल्ल्याचा कट उधळला

-सात किलो आरडीएक्स, १५ आयईडीसह शस्त्रसाठा जप्त | ‘अल बद्र’च्या तीन दहशतवाद्यांना अटक

हल्ल्याचा कटजम्मू – पुलवामा हल्ल्याला दोन वर्ष पूर्ण होत असताना जम्मू-काश्मीरमध्ये आणखी एक भीषण हल्ल्याचा कट उधळण्यात आला आहे. जम्मू-काश्मीरमधील बस स्थानक, बाजार, धार्मिक स्थळे आणि सुरक्षादलांना लक्ष्य करून हल्ले घडविण्यात येणार होते. मात्र याआधीच या हल्ल्याचे कारस्थान उधळले गेले. मोठ्या प्रमाणावर स्फोटके आणि शस्त्रसाठा जप्त करण्यात आला असून ‘अल बद्र तंजिम’च्या तीन दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे. त्यांना सीमेपलीकडून आदेश मिळत होते, अशी माहिती जम्मू-काश्मीरचे पोलीस महानिरिक्षक मुकेश सिंग यांनी दिली.

Advertisement

दोन वर्षांपूर्वी पुलवामामध्ये सीआरपीएफ जवानांच्या ताफ्याला लक्ष्य करून मोठा दहशतवादी हल्ला घडविण्यात आला होता. यामध्ये ४० जवान शहीद झाले होते. देशात या शहीद जवानांना आदरांजली वाहिली जात असतानाच पाकिस्तानी दहशतवादी संघटना ‘अल बद्र’ याच दिवशी मोठे दहशतवादी हल्ले घडविण्याच्या तयारीत होती. मात्र १३ फेब्रुवारीला रात्रीच या कटात सहभागी एका प्रमुख दहशतवाद्याला स्फोटकांसह अटक करण्यात आली.

हल्ल्याचा कटअटक करण्यात आलेल्या ‘अल बद्र’च्या दहशतवाद्याचे नाव सुहेल असून त्याला जम्मू बसस्टँडच्या गजबजलेल्या भागातून सुरक्षा यंत्रणांनी ताब्यात घेण्यात आले. त्याच्याजवळ सात किलो आरडीएक्स सापडले. जम्मू बसस्थानक दहशतवाद्यांच्या निशाण्यावर होते. या गजबलेल्या भागात मोठी जिवीतहानी घडवून आणून जम्मू-काश्मीरमध्ये अशांतता माजविण्याची योजना होती. मात्र त्याआधीच सुहेल पकडला गेल्याने मोठा कट उधळला गेला. जम्मू बसस्थानक याआधीही दहशतवाद्यांचे लक्ष्य राहिले आहे. २०१९ सालात याच स्थानकात ग्रेनेड हल्ला करण्यात आला होता. यामध्ये एकाचा बळी गेला होता, तर काही जण जखमी झाले होते. याआधीही जम्मू स्थानकाला लक्ष्य करून हल्ले झाले आहेत.

सुहेलच्या चौकशीत झालेल्या खुलाशानंतर आणखी दोघांना अटक करण्यात आली. यातील एकाला चंदिगडमधून ताब्यात घेण्यात आले. जम्मू-काश्मीर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दहशतवाद्यांकडून ७ किलो आरडीएक्स, १५ छोटे आयईडी आणि ६ पिस्तूल जप्त करण्यात आली आहेत. आयईडी आणि पिस्तूल सांबामधील एका ठिकाणाहून जप्त करण्यात आली. ही पिस्तूल बिहारमधून आणण्यात आली होती. सुहेल हा पंजाबमध्ये नर्सिंगचे शिक्षण घेत होता. सुहेलला काही दिवसांपूर्वी सीमेपलीकडून ‘अल बद्र’च्या हस्तकाचा फोन आला होता आणि सीमेपलीकडून आलेल्या आदेशानुसार एकाचवेळी निरनिराळ्या ठिकाणी बॉम्बस्फोट घडविण्यात येणार होते. ‘अल बद्र’चे काही ओव्हरग्राउंड वर्कर यासाठी स्फोटके व शस्त्रसाठा जमा करीत होते. जम्मू बसस्थानकाबरोबर येथील एक धार्मिक स्थळ, लखदत्ता बाजार आणि जम्मू रेल्वेस्थानकालाही लक्ष्य करण्यात येणार होते. तसेच सुरक्षादलांच्या जवानांना लक्ष्य करण्याची योजना होती. दरम्यान, गेल्या काही दिवसात जम्मू-काश्मीरमध्ये मोठे हल्ले उधळण्यात आले आहेत. तसेच काही प्रमुख दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे. ६ फेब्रुवारीला ‘लश्कर-ए-मुश्तफा’चा कमांडर हिदायतुल्ला मलिक उर्फ हसनीन याला अटक करण्यात आली होती.

हसनीननेही मोठ्या हल्ल्याची योजना आखली होती. मात्र गेल्या महिन्यात ‘लश्कर-ए-मुश्तफा’ जाळेच उद्ध्वस्त करण्यात आले. तसेच मुश्तफालाही जम्मू शहराबाहेरील कुंजवानी भागातून दारुगोळा व शस्त्रांसह अटक करण्यात आली. तसेच दोन दिवसांपूर्वीच ‘द रेझिस्टन्स फ्रन्ट’च्या (टीआरएफ) झहूर अहमद राथेरला अटक करण्यात आली. गेल्यावर्षी तीन राजकीय कार्यकर्त्यांच्या हत्येत त्याचा सहभाग होता.

leave a reply