चीनबाहेर पडणार्‍या जपानच्या कंपन्यांना ॲबे सरकारचे अर्थसहाय्य

टोकिओ – कोरोनाव्हायरसमुळे चीनमधील उत्पादन ठप्प झालेल्या आणि या देशातून बाहेर पडण्याच्या विचारात असलेल्या आपल्या कंपन्यांना विशेष आर्थिक सहाय्य पुरविण्याची घोषणा जपानच्या ॲबे सरकारने केली आहे. जपानमध्ये किंवा चीनवगळता इतर देशांमध्ये कारखाना टाकण्याची तयारी असलेल्या कंपन्यांसाठी २.२ अब्ज डॉलर्सचे सहाय्य पुरविले जाणार असल्याचे ॲबे सरकारने स्पष्ट केले. जपानचा हा निर्णय चीनसाठी धक्का देणारा ठरू शकतो.

गेल्या अडीच महिन्यांपासून कोरोनाव्हायरसची साथ आल्यानंतर चीनमधील उद्योगधंदे लॉकडाउनमुळे बंद पडले आहेत. या लॉकडाउनचा फटका चीनमध्ये मोठी गुंतवणूक केलेल्या जपानच्या कंपन्यांना बसला आहे. जपानच्या ऑटो, इलेक्ट्रॉनिक्स तसेच इतर क्षेत्रातील कंपन्यांनी चीनमध्ये मोठे कारखाने टाकले होते. पण कोरोनाव्हायरसमुळे या कंपन्यांमधील उत्पादन बंद पडले असून या कंपन्यांनी चीनमधून बाहेर पडण्याची तयारी सुरू केली आहे.

फेब्रुवारी महिन्यात ‘टोकिओ शोको रिसर्च लिमिटेड’ या अभ्यासगटाने केलेल्या सर्वेक्षणानुसार, चीनमध्ये गुंतवणूक असलेल्या २६०० कंपन्यांपैकी ३७ टक्के कंपन्यांनी चीनमधून बाहेर पडून दुसर्‍या देशात कारखाना टाकण्यासाठी हालचाल सुरु केली होती. यातील काही कंपन्यांनी जपान सरकारकडे सहाय्याची मागणी केली होती. यावर जपानच्या सरकारने हा निर्णय घेतल्याचे दिसत आहे.

दोन दिवसांपूर्वी जपानचे पंतप्रधान ॲबे शिंजो यांनी या साथीचा फैलाव रोखण्यासाठी ‘स्टेट ऑफ इमर्जन्सी’ घोषित केली होती. त्याचबरोबर या साथीच्या संकटावर मात करण्यासाठी ९९० अब्ज डॉलर्सच्या (१०८ ट्रिलियन येन) पॅकेजची घोषणा केली होती. आता ॲबे सरकारने चीनमधून बाहेर पडण्यासाठी उत्सुक असलेल्या जपानच्या कंपन्यांना अतिरिक्त २.२ अब्ज डॉलर्स (२४३.५ अब्ज येन) इतकी तरतूद जाहीर केली आहे. सरकारच्या संकेतस्थळावर ही माहिती देण्यात आली आहे.

चीनमधून बाहेर पडून जपानमध्ये कारखाना टाकण्यास तयार असलेल्या कंपन्यांना ॲबे सरकार तब्बल दोन अब्ज डॉलर्सचे (२२० अब्ज येन) अर्थसहाय्य पुरविणार आहे. तर चीनमधून बाहेर पडून जपान वगळता इतर देशांमध्ये कारखाना टाकण्यासाठी तयार असलेल्या कंपन्यांना अॅबे सरकारकडून वीस कोटी डॉलर्सचे (२३.५ अब्ज येन) सहाय्य पुरविले जाईल.

वेगळ्या शब्दात जपान आपल्या कंपन्यांना चीनमधून बाहेर पडण्यासाठी प्रोत्साहन देत आहे. आजवर चीनचा कट्टर व्यापारी प्रतिस्पर्धी असलेल्या जपानने आतापर्यंत अशा स्वरूपाचा आक्रमक निर्णय घेतला नव्हता. पण आता परिस्थिती बदलली असून कोरोनाव्हायरसच्या साथीला जबाबदार असलेल्या चीनच्या विरोधात वातावरण तापले आहे. जवळपास सर्वच देशांमधून चीनच्या विरोधात सूर उमटू लागले आहेत. याचा परिणाम सर्वच प्रमुख देशांच्या चीनबरोबरील व्यापारी सहकार्यावर होत असल्याचे दिसत आहे. या पार्श्वभूमीवर जपानच्या ॲबे सरकारने घेतलेल्या निर्णयाचे फार मोठे आर्थिक व राजकीय परिणाम संभवतात. पुढच्या काळात इतर देशांकडूनही अशा स्वरूपाचे निर्णय घेतले जाऊ शकतात.

अमेरिकेबरोबरील व्यापारयुद्धामुळे चीनच्या अर्थव्यवस्थेची दैना उडाली होती. कोरोनाव्हायरसच्या साथीमुळे चीनमधील उत्पादन ठप्प पडले असून यामुळे चीन कितीतरी वर्षे मागे पडल्याचे बोलले जात आहे. अशा परिस्थितीत, जपानसारख्या प्रमुख व्यापारी देशाने चीनबाबत घेतलेला निर्णय चीनच्या अर्थव्यवस्थेवरील दडपण अधिकच वाढविणारा ठरतो. नजिकच्या काळात चिनी अर्थव्यवस्थेला असे हादरे बसत राहतील, हे स्पष्टपणे दिसू लागले आहे.

leave a reply