‘इस्ट चायना सी’मध्ये चीनला रोखण्यासाठी जपानच्या हालचाली

टोकियो – चीनकडून गेल्या काही महिन्यात इस्ट चायना सी मध्ये सुरू असलेल्या वाढत्या कारवाया रोखण्यासाठी जपानने निर्णायक हालचाली सुरू केल्या आहेत त्याचाच एक भाग म्हणून सेंकाकू बेटांचा समूह असलेल्या भागाचे नाव बदलण्यात आले आहे. १ऑक्टोबरपासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार असून प्रशासकीय सुविधेसाठी हे नाव बदलण्यात आल्याचा खुलासा जपानकडून करण्यात आला आहे. जपानच्या या निर्णयाविरोधात चीनकडून तीव्र प्रतिक्रिया उमटली असून नाव बदलण्याची बाब चीनच्या प्रादेशिक सार्वभौमत्वाला आव्हान असल्याचे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने बजावले.

East-China-Sea-Japanकोरोना साथीच्या पार्श्‍वभूमीवर चीनच्या सत्ताधारी कम्युनिस्ट राजवटीकडून आपल्या विस्तारवादी महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी जोरदार धडपड सुरू आहे. त्यासाठी विविध भागांमध्ये लष्करी तैनाती वाढवितानाच वादग्रस्त भागांमध्ये घुसखोरीचे प्रयत्नही चीनकडून सुरू आहेत. जपाननजीक असलेल्या ‘इस्ट चायना सी’ क्षेत्रात चीनकडून सातत्याने युद्धनौका, लढाऊ विमाने, पाणबुड्या व गस्ती नौकांच्या सहाय्याने घुसखोरी सुरू आहे. गेल्याच आठवड्यात जपानच्या ‘ओशिमा आयलंड’ जवळ चीनची प्रगत पाणबुडी धोकादायकरित्या वावरत असल्याचे आढळले होते.

गेल्या दोन महिन्यांच्या कालावधीत चीनच्या गस्ती नौका तसेच लढाऊ विमानेही ‘इस्ट चायना सी‘ क्षेत्रातील सेंकाकू बेटांजवळ सातत्याने घुसखोरीचे प्रयत्न करीत आहेत. चीनच्या या कारवाया रोखण्यासाठी जपानने आपली प्रगत हेलिकॉप्टरवाहू युद्धनौका ‘कागो’ या क्षेत्रात तैनात केली आहे. त्यापाठोपाठ जपानने आपल्या संरक्षण तळांवर ‘पॅट्रिऑट मिसाईल डिफेन्स’ ही प्रगत हवाईसुरक्षा यंत्रणाही सज्ज ठेवली आहे. आता चीनने हक्क सांगितलेल्या बेटांवरील आपला दावा बळकट करण्यासाठी जपानने सदर भागाचे नाव बदलल्याचे जाहीर केले आहे.

जपानच्या ‘इशिगाकी सिटी कौन्सिल’कडून याची घोषणा करण्यात आली. त्यानुसार पूर्वी ‘तोनोशिरो’ या नावाने ओळखण्यात येणारा भाग यापुढे ‘तोनोशिरो सेंकाकू’ या नावाने ओळखण्यात येणार आहे. सेंकाकू हे जपानी नाव असून जुन्या नावात त्याची भर पडल्याने या क्षेत्रावरील जपानचा जावा अधिकच भक्कम झाल्याचे मानले जाते. जपानच्या या निर्णयावर चीनकडून आक्रमक प्रतिक्रिया उमटली आहे.

East-China-Sea‘इस्ट चायना सी मधील बेटे व त्या भोवतालचा भाग हा चीनचा अविभाज्य हिस्सा आहे. या सार्वभौम क्षेत्राचे संरक्षण करण्याचे अधिकार चीनकडे आहेत. सदर भागाचे नाव बदलण्याचा निर्णय हे चीनच्या प्रादेशिक सार्वभौमत्वाला दिलेले आव्हान ठरते. जपानकडून नाव बदलण्यासाठी घेण्यात आलेला निर्णय पूर्णपणे बेकायदेशीर आहे. या निर्णयामुळे सदर बेटे चीनच्या मालकीची आहेत हे वास्तव बदलले जाऊ शकत नाही’, असा टोला चीनच्या परराष्ट्र विभागाच्या प्रवक्त्यांनी लगावला.

इस्ट चायना सीमधील ‘सेंकाकू’ बेटांवरून जपान व चीनमध्ये पूर्वापार वाद सुरू आहे. सध्या आंतरराष्ट्रीय समुदाय कोरोना साथीविरोधात संघर्ष करीत असतानाही चीनच्या आक्रमक कारवाया थांबलेल्या नाहीत. चीनकडून या क्षेत्रावर ताबा मिळवण्याचे इरादे उधळण्यासाठी जपानने विविध पातळ्यांवर हालचाली सुरू केल्या असून बेटांचा समावेश असलेल्या भागाचे नाव बदलणे त्यातीलच एक महत्त्वाचा टप्पा ठरतो.

leave a reply