चीनबरोबरील सीमावादात भारताला जपानचा संपूर्ण पाठिंबा

नवी दिल्ली – भारत-चीन सीमावादात जपानने भारताला पूर्ण पाठिंबा जाहीर केला. हा वाद सोडवण्यासाठी भारताने घेतलेल्या पुढाकाराचे जपानने स्वागत केले. तर लडाखच्या सीमेवरील स्थिती बदलण्यासाठी चीनने केलेल्या एकतर्फी कारवाईवर जपानने टीका केली. याआधी अमेरिका, फ्रान्स, ऑस्ट्रेलिया या देशांनी या वादात भारताला पाठिंबा दिला असून रशियानेही आपण भारताच्या मागे उभे राहणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. त्यामुळे आंतरराष्ट्रीय समुदाय भारताच्या मागे असल्याचा सुस्पष्ट संदेश चीनला मिळाला आहे. भारतीय पंतप्रधानांच्या लडाखच्या दौऱ्यानंतर जपानकडून आलेली ही प्रतिक्रिया औचित्यपूर्ण ठरते.

सीमावादात

भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव हर्ष श्रिंगला यांच्याबरोबर झालेल्या चर्चेत जपानचे भारतातील राजदूत सतोषी सुझुकी यांनी चीन बरोबरील सीमावादात भारताच्या भूमिकेचे समर्थन केले. ‘प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या सुरक्षेसाठी भारताने घेतलेली भूमिका योग्यच होती. या वादावर शांततेने तोडगा निघावा, अशी जपानची इच्छा आहे. पण प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ स्थिती बदलण्यासाठी केल्या जाणाऱ्या एकतर्फी कारवायांना जपानचा विरोधच असेल असे सांगून सुझुकी यांनी इथल्या चीनच्या कारवायांना विरोध केला.

गलवान व्हॅलीत झालेल्या संघर्षात भारतीय सैनिकांनी दाखविलेल्या शौर्याची जपानच्या राजदुतांनी प्रशंसा केली. त्यानंतर या आठवड्याच्या सुरुवातीला हिंदी महासागर क्षेत्रात भारत आणि जपानच्या नौदलात विशेष सराव पार पडला होता. त्याला काही दिवस उलटत नाहीत तोच जपानच्या राजदूतांनी लडाखमधील परिस्थितीबाबत भारताचे समर्थन केले. त्याचबरोबर चीनच्या विस्तारवादी हालचालींवरही जपानच्या राजदूतांनी टीका केली. याआधीही जपानने चीनबरोबरील सीमावादात भारताला समर्थन दिले होते.चीनच्या साम्राज्यवादी धोरणाच्या विरोधात भारत व जपान हे आशियातील प्रमुख लोकशाहीवादी देश एकत्र आले असून या देशांचे सहकार्य आपल्या विरोधातच असल्याचा आरोप चीनने वेळोवेळी केला होता. पण भारत आणि जपानमधील सहकार्य विधायक व इंडो पॅसिफिक क्षेत्रात स्थैर्य आणि सुरक्षा कायम राखण्यासाठी असल्याचे उभय देशांनी वेळोवेळी स्पष्ट केले होते.

leave a reply