चीनच्या विनाशिकेच्या विरोधात जपान-तैवानची संयुक्त गस्त

संयुक्त गस्ततैपेई – मियाकोचे आखात आणि सेंकाकूच्या सागरी क्षेत्रातून प्रवास करणार्‍या चीनच्या विनाशिकेच्या विरोधात जपान आणि तैवानच्या विनाशिकांनी संयुक्त गस्त घातल्याची माहिती समोर आली आहे. जपान व तैवानने या संयुक्त गस्तीबाबत खुलासा करण्याचे टाळले आहे. पण देशाच्या सुरक्षेसाठी चीनविरोधातील गस्त सुरू राहणार असून यासाठी काही देशांबरोबर सहकार्य केले असल्याचे तैवानच्या संरक्षणमंत्र्यांनी जाहीर केले. पण संबंधित देशाची माहिती उघड करण्यासाठी ही उचित वेळ नसल्याचे तैवानचे संरक्षणमंत्री म्हणाले.

गेल्या आठवड्यात चीनच्या नौदलाने आपल्या विमानवाहू युद्धनौकेसह मोठा सराव केला होता. त्याचबरोबर जपान, तैवान आणि फिलिपाईन्सच्या सागरी क्षेत्रात गस्तही घातली होती. यापैकी पश्‍चिम पॅसिफिक महासागर क्षेत्रातून प्रवास करणार्‍या चीनच्या ‘टाईप ०५४ए’ अर्थात ‘बिंझोउ’ या विनाशिकेने तैवान आणि जपानच्या सागरी क्षेत्राजवळून प्रवास केला होता. जपानच्या संरक्षण मंत्रालयाने चीनच्या बिंझोउ विनाशिकेच्या या गस्तीची माहिती दिली होती.

सेंकाकू आणि ओकिनावा बेटांमधील मियाकोच्या आखातातून चीनच्या विनाशिकेने प्रवास केल्याचे जपानच्या संरक्षण मंत्रालयाने जाहीर केले होते. बिंझोउवर नजर ठेवण्यासाठी जपानने ‘अबुकूमा’ श्रेणीतील विनाशिका आणि दोन गस्तीजहाजेही रवाना केल्या होत्या. त्याचबरोबर जपानने ‘कावासाकी पी-१’ व ‘पी-३ ओरियन’ ही दोन टेहळणी विमानेही तैनात केली होती. पण सागरी वाहतूकीवर नजर ठेवणार्‍या संकेतस्थळाने प्रसिद्ध केलेल्या सॅटेलाईट फोटोग्राफनुसार, चीनच्या विनाशिकेवर पाळत संयुक्त गस्तठेवण्यासाठी जपानबरोबर तैवानच्या विनाशिकाही सहभागी झाल्याचे उघड झाले आहे.

बिंझोउ विनाशिकेच्या मागून साधारण दोन किलोमीटर अंतरावरुन जपानची विनाशिका प्रवास करीत होती. तर जपानी विनाशिकेच्या समांतर रेषेत पाच किलोमीटर अंतरावर तैवानची ‘कि लूंग’ श्रेणीतील विनाशिका प्रवास करीत होती. चीनच्या विनाशिकेविरोधात जपान आणि तैवानची ही पहिली संयुक्त गस्त असल्याचे तैवानी दैनिकाने म्हटले आहे. पण तैवानच्या संरक्षण मंत्रालयाने चिनी विनाशिकेविरोधातील या संयुक्त गस्तीबाबत बोलण्याचे टाळले.

चीनच्या विनाशिकेने तैवानच्या किलूंग आणि इतर शहरांच्या जवळून केलेल्या गस्तीबाबत आपल्या देशाच्या लष्कराला पूर्ण माहिती असल्याचे तैवान संरक्षणमंत्री चियू कुओ-चेंग यांनी म्हटले आहे. ‘आपल्या सागरी किंवा हवाई क्षेत्राजवळून गस्त घालणार्‍या चीनच्या प्रत्येक गस्तीवर तैवानची नजर असेल. चीनच्या या आक्रमक गस्तीला उत्तर देण्यासाठी तैवान देखील युद्धनौका आणि विमाने रवाना करील’, अशी घोषणा संरक्षणमंत्री चेंग यांनी दिली. चीनच्या या आक्रमकतेच्या विरोधात तैवानने जपानशी सहकार्य केले आहे का, प्रश्‍नाला थेट उत्तर देण्याचे संरक्षणमंत्री चेंग यांनी टाळले.

‘देशाच्या सुरक्षेसाठी जेव्हा गरज असेल तेव्हा अशाप्रकारे गस्त केली जाईल. कुठल्याही देशाबरोबरचे विशेष सहकार्य म्हणून याकडे पाहता येणार नाही व त्या देशाचे नाव जाहीर करण्याची ही उचित वेळ नाही’, असे संरक्षणमंत्री चेंग म्हणाले. जपानने देखील तैवानबरोबरच्या या संयुक्त गस्तीबाबत प्रतिक्रिया दिलेली नाही. काही दिवसांपूर्वी अमेरिकेच्या दौर्‍यावर असताना जपानचे पंतप्रधान योशिहिदे शुगा यांनी तैवानच्या सुरक्षेचा प्रश्‍न उपस्थित करून चीनला हादरा दिला होता. त्यानंतर काही दिवसात जपान आणि तैवानच्या विनाशिकांच्या संयुक्त गस्तीची बातमी प्रसिद्ध झाली आहे.

leave a reply