तैवानच्या सुरक्षेसाठी जपान इशिगाकी बेटावर क्षेपणास्त्रे तैनात करणार

टोकिओ/तैपेई/बीजिंग – जपानचे संरक्षणमंत्री नोबुरो किशी यांनी, इशिगाकी आयलंडवर क्षेपणास्त्रे तैनात करण्यात येतील, असे संकेत दिले आहेत. क्षेपणास्त्रांसह सुमारे 600 जवान तैनात करण्यात येणार आहेत. त्याचवेळी योनागुनी आयलंडवर ‘इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर युनिट’ही तैनात करण्यात येणार असून संरक्षणमंत्री किशी यांनी काही महिन्यांपूर्वीच या बेटाला भेट दिली होती. इशिगाकी व योनागुनी ही दोन्ही बेटे तैवानपासून जवळ असून, जपानची नवी तैनाती तैवानच्या सुरक्षेसाठी असल्याचे मानले जाते.

गेल्या महिन्यात जपानच्या संरक्षण मंत्रालयाने, देशापुढील सुरक्षाविषयक आव्हाने व संरक्षणसज्जता यांचा उल्लेख असलेली श्‍वेतपत्रिका प्रसिद्ध केली होती. यात तैवानच्या सुरक्षेचा व स्थैर्याचा मुद्दा ठळकपणे मांडण्यात आला होता. ‘तैवानच्या सुरक्षेला आव्हान देणाऱ्या चीनच्या हालचाली धोकादायक असून, या क्षेत्रात स्थैर्य निर्माण करणे जपानची सुरक्षा व आंतरराष्ट्रीय स्थैर्यासाठी आवश्‍यक आहे’, या शब्दात जपानच्या संरक्षण मंत्रालयाने तैवानच्या सुरक्षेचे महत्त्व स्पष्ट केले होते.

जपानच्या सत्ताधारी नेतृत्त्वाकडून गेल्या काही महिन्यात तैवानच्या सुरक्षेचा मुद्दा वारंवार उपस्थित करण्यात येत आहे. काही महिन्यांपूर्वी जपानने तैवानच्या सुरक्षेच्या मुद्यावर अमेरिकेबरोबर स्वतंत्र लष्करी सराव केल्याचे वृत्तही प्रसिद्ध झाले होते. या पार्श्‍वभूमीवर, जपानच्या संरक्षणमंत्र्यांनी तैवाननजिक असणाऱ्या क्षेत्रात जपानी क्षेपणास्त्रे व प्रगत संरक्षणयंत्रणा तैनात करण्याचे संकेत देणे महत्त्वाचे ठरते. जपानच्या निक्केई या वेबसाईटने दिलेल्या वृत्तानुसार, इशिगाकी आयलंड तैवानच्या सीमेपासून 300 किलोमीटर्सच्या अंतरावर आहे. या आयलंडवर ‘सरफेस टू एअर गायडेड मिसाईल सिस्टिम’ तैनात करण्यात येणार असल्याचे संरक्षणमंत्री किशी यांनी म्हंटले आहे. या क्षेपणास्त्रांबरोबर 500 ते 600 जवानही तैनात होणार असून मार्च 2023पर्यंत तैनाती पूर्ण होईल, असे सांगण्यात येते. जमिनीवरून जहाजांवर मारा करणाऱ्या क्षेपणास्त्रांच्या तैनातीवरही विचार सुरू असल्याची माहिती जपानी सूत्रांनी दिली.

याव्यतिरिक्त तैवानपासून अवघ्या 110 किलोमीटर्स अंतरावर असणाऱ्या योनागुनी आयलंडवर ‘इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर युनिट’ तैनात करण्याचेही संकेत देण्यात येत आहेत. एप्रिल महिन्यात संरक्षणमंत्री किशी यांनी या बेटाला भेटही दिली होती. या बेटावरून तैवानची हद्द नुसत्या डोळ्यांनीही दिसू शकते, असे म्हंटले जाते. चीनकडून तैवाननजिकच्या क्षेत्रात सुरू असणाऱ्या कारवाया व वाढती संरक्षण तैनाती यांचा धोका लक्षात घेऊन जपानने दोन बेटांवर संरक्षण तैनातीचा निर्णय घेतल्याचे मानले जाते. ही तैनाती तैवानच्या सुरक्षेबरोबरच ईस्ट चायना सीमधील जपानच्या ‘सेन्काकू आयलंड’साठीही महत्त्वाची ठरते, असे जपानी अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येते.
तैवानच्या सुरक्षा व स्थैर्यासाठी पावले उचलणाऱ्या जपानने त्यासाठी राजनैतिक पातळीवरही प्रयत्न सुरू केले आहेत. जपानच्या सत्ताधारी पक्षाने तैवानच्या सत्ताधारी पक्षाबरोबर ‘टू प्लस टू’ बैठक घेण्याची तयारी सुरू केली आहे. दोन्ही बाजूच्या सूत्रांनी याची प्राथमिक तयारी सुरू असून बैठक पुढील काही महिन्यात होऊ शकते, असे म्हटले आहे. जपानकडून तैवानला मिळणाऱ्या या समर्थनावर चीनकडून तिखट प्रतिक्रिया उमटली आहे.

‘तैवानचा मुद्दा हा चीन-जपान राजकीय संबंधांसाठी चिंतेचा विषय आहे. त्यामुळे जपानने त्यांचे शब्द व कृती याबाबतीत अधिक सावधगिरी बाळगावी. तैवानबाबत कोणतेही पाऊल उचलताना इतिहासात जपानच्या राजवटीने चिनी जनतेवर केलेले अत्याचार विसरण्याची चूक करु नका. जपानकडून ज्या हालचाली सुरू आहेत, त्याबद्दल त्यांनी फेरविचार करावा. तैवानच्या स्वातंत्र्यासाठी प्रयत्न करणाऱ्या गटांना चुकीचे संदेश देऊ नये. चीनच्या अंतर्गत कारभारात हस्तक्षेप करण्याचा प्रयत्नही करु नका’, असे परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या हुआ चुनयिंग यांनी बजावले आहे.

leave a reply