जेरूसलेम इस्रायलच्या ताब्यात जाऊ देणार नाही

- अल कायदाचा प्रमुख अयमन अल जवाहिरी

इस्रायलच्या ताब्यातवॉशिंग्टन – ‘जेरूसलेम इस्रायलच्या ताब्यात जाऊ देणार नाही’, अशी धमकी अल कायदाचा प्रमुख अयमन अल जवाहिरी याने दिली. अल कायदाचा प्रमुख जवाहिरी हयात नसल्याचा दावा अमेरिका व पाकिस्तानने याआधी करण्यात आला होता. पण अल कायदाने जवाहिरीचा नवा व्हिडिओ प्रसिद्ध करून अमेरिका व पाकिस्तानचे दावे खोडून काढले. तालिबानच्या राजवटीत अल कायदा अफगाणिस्तानात पुन्हा प्रबळ बनेल, असे इशारे लष्करी अधिकारी देत आहेत. अशा परिस्थितीत जवाहिरी या व्हिडिओद्वारे समोर आला आहे.

अल कायदाचा प्रमुख ओसामा बिन लादेननंतर या संघटनेची सूत्रे हाती असलेला अयमन अल जवाहिरी याचा आजाराने मृत्यू झाल्याच्या बातम्या अमेरिका व पाकिस्तानी माध्यमांमध्ये गेल्या वर्षी प्रसिद्ध झाल्या होत्या. यामुळे अल कायदा संपल्याचे दावे केले जात होते. पण शनिवारी अमेरिकेवरील ९/११च्या दहशतवादी हल्ल्याला २० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने अल कायदाने जवाहिरीचा नवा व्हिडिओ प्रसिद्ध केला.

साधारण एक तासाच्या या व्हिडिओमध्ये जवाहिरीने इस्रायलला धमकावले. जेरूसलेमवरील इस्रायलचा दावा अजिबात मान्य नसल्याचे जवाहिरीने म्हटले आहे. त्याचबरोबर अमेरिका आणि इस्रायलबरोबर सहकार्य वाढविणार्‍या सौदी अरेबिया, युएई आणि इतर अरब मित्रदेशांनाही जवाहिरीने ‘ज्यूधार्जिणे अरब देश’ म्हणून लक्ष्य केले.

अल कायदाने अमेरिकेवर चढविलेल्या ९/११च्या हल्ल्याला दोन दशके पूर्ण झाल्याच्या निमित्ताने अल कायदाने जवाहिरीचा जुना व्हिडिओ प्रसिद्ध केल्याचा दावा केला जातो. त्याचबरोबर या संपूर्ण व्हिडिओमध्ये जवाहिरीने अफगाणिस्तानातील तालिबानच्या राजवटीचा उल्लेख केलेला नाही, ही बाब लक्षणीय ठरते, याकडेही माध्यमांनी सर्वांचे लक्ष वेधले आहे.

पण या व्हिडिओमध्ये जवाहिरीने जानेवारी महिन्यात सिरियातील रशियाच्या लष्करी तळावर अल कायदाने चढविलेल्या हल्ल्याचा उल्लेख आहे, ही बाब लक्षणीय ठरते असे लष्करी विश्‍लेषक सांगत आहेत. जवाहिरी अजूनही जिवंत असल्याचे यातून स्पष्ट होते, असे या विश्‍लेषकांचे म्हणणे आहे.

leave a reply