अफगाणिस्तानात तालिबानच्या राजवटीनंतर ‘जेएमबी’ पुन्हा डोके वर काढण्याची शक्यता

कोलकाता – अफगाणिस्तानात पुन्हा तालिबानी राजवट आली आहे. याबरोबर दक्षिण आशियासमोर सुरक्षेच्या दृष्टीने मोठी आव्हाने उभी राहण्याची शक्यता आहे. भारत आणि बांगलादेशला ‘जमात-उल-मुजाहिद्दीन बांगलादेश’ या (जेएमबी) दहशतवादी संघटनेचा धोका असून तालिबानच्या अफगाणिस्तानातील राजवटीबरोबर ही संघटना पुन्हा डोके वर काढण्याची शक्यता आहे, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे.

अफगाणिस्तानात तालिबानच्या राजवटीनंतर ‘जेएमबी’ पुन्हा डोके वर काढण्याची शक्यताअफगाणिस्तानात तालिबान एकेक प्रांत ताब्यात घेत पुढे सरकत असताना गेल्या महिन्यात पूर्व कोलकातामध्ये ‘जेएमबी’च्या तीन दहशतवाद्यांना अटक करण्यात आली होती. यामुळे सुरक्षा यंत्रणा सावध झाल्या होत्या. भारताबरोबर बांगलादेशच्या सुरक्षा यंत्रणांनाही हा इशारा ठरतो. ‘जेएमबी’चा उदय हा गेल्या शतकातील अखेरच्या दशकात तालिबानच्या उदयातूनच झाल्याचे असे ज्येष्ठ संरक्षण विश्‍लेषक, माजी आयपीएस अधिकारी शंतनू मुखर्जी यांनी लक्षात आणून दिले. त्यामुळे भारत आणि बांगलादेशला चिंता करण्याची आवश्‍यकता असून अफगाणिस्तानात तालिबानच्या कब्जा झाल्यानंतर पुढील आव्हानांचा सामना करण्यासाठी या दोन्ही देशांनी सज्ज रहायला हवे, असेही मुखर्जी म्हणाले.

अफगाणिस्तानात याआधी तालिबानने ताबा घेतला होता, त्यांनतर 2000 साली ‘जेएमबी’ची स्थापना झाली. ‘जेएमबी’ स्थापना करणारे कट्टरतावादी हे बांगलादेशातून अफगाणिस्तानात गेले होते. 1990 च्या दशकात मोठ्या प्रमाणावर तालिबानने बांगलादेशातून दहशतवाद्यांची भरती केली होती. त्यावेळी ‘अमरा सबो होबो तालिबान, बांगला होबो अफगाणिस्तान’ असा नारा देण्यात आला होता. याचा अर्थ आम्ही सर्व तालिबानमध्ये भरती होत असून बांगलादेश आता अफगाणिस्तान होईल असा होतो, असे बांगलादेशचे भारतातील माजी उच्चायुक्त तारिक करीम यांनी म्हटले आहे.

पुढच्या काळात बांगलादेशात ‘जेएमबी’चा जोर वाढला. बांगलादेशात दहशतवादी कारवाया व कट्टरतावाद्यांचा प्रभाव वाढला. केवळ बांगलादेशात ‘जेएमबी’च्या कारवाया मर्यादीत राहिल्या नाहीत, तर भारतातही मोठ्या प्रमाणावर कारवाया झाल्या. 2007 साली ‘जेएमबी’चा संस्थापक शेख अब्दुल रहमान याला बांगलादेशात फाशी देण्यात आली. त्यानंतर या संघटनेची सर्व सूत्रे सल्लाउद्दीन अहमद याच्याकडे आली. हा सल्लाउद्दीन अहमद अजून पकडला गेला नसून तो भारत-बांगलादेशच्या सीमेवर कुठेतरी लपल्याचे म्हटले जाते, असेही करीम यांनी अधोरेखित केले.

माजी भारतीय राजनैतिक अधिकारी राजीव डोगरा यांनीही तालिबानच्या अफगाणिस्तानातील सरशीनंतर कट्टरतावादी संघटनांना बळ मिळण्याची भीती व्यक्त केली आहे. 2016 साली बांगलादेशची राजधानी ढाकामध्ये झालेल्या ‘जेएमबी’ने अतिसुरक्षित भागात केलेल्या दहशतवादी हल्ल्यात 22 जणांचा बळी गेला होता. त्यानंतर बांगलादेशात ‘जेएमबी’विरोधात मोठी कारवाई हाती घेण्यात आली. त्यानंतर या संघटनेचे कित्येक सदस्य भारतात पळून आले. यातील कित्येक जणांना नंतर अटक करण्यात यश आले. मात्र अजूनही कित्येक जण भारतात लपून बसले असल्याची शक्यता असल्याचे डोगरा यांनी म्हटले आहे.

leave a reply