भारत आणि ब्रिटनच्या संरक्षणदलांचा संयुक्त युद्धसराव

नवी दिल्ली – अमेरिका आणि रशियाच्या पाठोपाठ भारताच्या संरक्षणदलांबरोबर संयुक्त युद्धसराव करणारा ब्रिटन तिसरा देश ठरला. अरबी सागरातील कोकणाच्या क्षेत्रात सुरू असलेल्या ‘कोंकण शक्ती’ नावाच्या या युद्धसरावात दोन्ही देशांचे नौदल, लष्कर आणि वायुसेनांनी सहभाग घेतला आहे. काही दिवसांपूर्वीच बंगालच्या उपसागरात भारत, अमेरिका, जपान व ऑस्ट्रेलियाच्या नौदलाचा संयुक्त सराव पार पडला होता. त्यानंतर भारताचा ब्रिटनबरोबरील हा युद्धसराव लक्षवेधी ठरतो. या युद्धसरावांद्वारे इंडो-पॅसिफिक क्षेत्रात वर्चस्व गाजविण्याची फाजिल महत्त्वाकांक्षा बाळगणार्‍या चीनला याद्वारे संदेश देण्यात येत आहे.

भारत आणि ब्रिटनच्या संरक्षणदलांचा संयुक्त युद्धसराव‘खोल समुद्रात वावरण्याची क्षमता व एकाहून अधिक विमानवाहू युद्धनौका असलेल्या जगभरातील काही मोजक्या देशांमध्ये भारत आणि ब्रिटनचा समावेश आहे. अशा परिस्थितीत ब्रिटनच्या विमानवाहू युद्धनौकेचा ताफा भारतीय नौदलाबरोबर युद्धसराव करीत आहे, ही बाब उभय देशांमधील सामरिक सहकार्य व्यापक बनत असल्याचा दाखला देते. नियमावर आधारलेली आंतरराष्ट्रीय व्यवस्था आणि मुक्त, खुला व्यापार तसेच खोल सागरी क्षेत्राचे स्वातंत्र्य यासाठी दोन्ही देशांची बांधिलकी या युद्धसरावातून स्पष्ट होत आहे’, असे ब्रिटनचे नौदलप्रमुख ऍडमिरल टोनी रडाकिन यांनी म्हटले आहे.

ब्रिटनच्या नौदलप्रमुखांनी काढलेले हे उद्गार लक्ष वेधून घेणारे ठरतात. इंडो-पॅसिफिक क्षेत्रात नियमावर आधारलेल्या व्यवस्था तसेच या क्षेत्रातील खुल्या व मुक्त व्यापारी वाहतुकीला चीनपासून फार मोठा धोका असल्याचे जवळपास सर्वच जबाबदार देशांनी मान्य केले आहे. अमेरिका, जपान व ऑस्ट्रेलियाने तर याविरोधात क्वाडची उभारणी करून चीनला वेसण घालण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. त्याचवेळी ऑकस अर्थात ऑस्ट्रेलिया, ब्रिटन व अमेरिकेने लष्करी संघटन उभे करून चीनच्या इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील वर्चस्ववादी धोरणांना थेट आव्हान दिले आहे. फ्रान्स व इतर युरोपिय देश देखील चीनच्या इंडो-पॅसिफिकमधील कारवायांकड धोका म्हणूनच पाहत आहेत. अशा परिस्थितीत ब्रिटन देखील चीनपासून असलेल्या या धोक्याविरोधात भारताबरोबर सामरिक सहकार्य दृढ करीत आहे, ही फार मोठी बाब ठरते.

भारत आणि ब्रिटनच्या संरक्षणदलांचा संयुक्त युद्धसरावभारतातील ब्रिटनच्या उच्चायुक्तालयाने दोन्ही देशांच्या तिन्ही संरक्षणदलांमध्ये पार पडलेला हा आजवरचा सर्वात महत्त्वाकंक्षी युद्धसराव असल्याचे म्हटले आहे. उभय देशांमधील संरक्षणविषयक द्विपक्षीय सहकार्य अधिकच दृढ करण्याच्या दिशेने टाकण्यात आलेले हे महत्त्वाचे पाऊल ठरते. यामुळे इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील दोन्ही देशांच्या सामरिक सहकार्याला नवे बळ मिळेल, असा विश्‍वास ब्रिटनच्या उच्चायुक्तालयाने व्यक्त केला आहे.

दरम्यान, ब्रिटनच्या नौदलासोबत या युद्धसरावात नेदरलँडच्या नौदलाच्या विनाशिकाही सहभागी झाल्या आहेत. इंडो-पॅसिफिक क्षेत्राचे महत्त्व प्रचंड प्रमाणात वाढलेले असताना, चीन या सागरी क्षेत्रावर आपले नियंत्रण प्रस्थापित करण्यासाठी धडपडत आहे. हिंदी महासागर व त्या पलिकडच्याही क्षेत्रात संपूर्ण सुरक्षा प्रदान करू शकणारा देश म्हणून भारताचे महत्त्व यामुळे अधिकच वाढले आहे.

यामुळे जगभरातील प्रमुख देशांचे नौदल भारतीय नौदलाबरोबर द्विपक्षीय तसेच बहुपक्षीय युद्धसरावांचे आयोजन करून संपर्क व समन्वय अधिकच वाढवित असल्याचे दिसते. याचा फार मोठा लाभ भारतीय नौदलाला मिळत आहे. या संयुक्त युद्धसरावांमुळे भारतीय नौदलाची क्षमता व सामर्थ्य नव्याने अधोरेखित होत असून याने चीनच्या अस्वस्थतेत अधिकाधिक भर पडत चालली आहे.

leave a reply