संरक्षणदलांच्या संयुक्त आघाडीचे महत्त्व वाढले आहे – अ‍ॅडमिरल करमबिर सिंग

पूणे – ‘युद्धाचे स्वरुप बदलत चालले आहे. भूमी, जल, आकाश व अवकाश आणि सायबर क्षेत्रात शत्रूचा सामना एकाच वेळी करण्याची क्षमता विकसित करणे अनिवार्य बनले आहे. याच कारणामुळे देशाच्या संरक्षणदलांच्या संयुक्त आघाडीची याआधी नव्हती इतकी आवश्यकता समोर आलेली आहे’, असे नौदलप्रमुख अ‍ॅडमिरल करमबिर सिंग यांनी म्हटले आहे. पूणे येथील नॅशनल डिफेन्स अकॅडमीमध्ये 140 व्या पासिंग आऊट परेडच्या कार्यक्रमात नौदलप्रमुखांनी हा संदेश दिला.

करमबिर सिंगभारताने संरक्षणदलप्रमुखपदाची निर्मिती केली असून जनरल बिपीन रावत देशाचे पहिले संरक्षणदलप्रमुख बनले आहेत. जगभरातील युद्धतंत्रात फार मोठे बदल झाले आहेत. पारंपरिक युद्धाबरोबरच अपारंपरिक युद्धतंत्राचे कौशल्य संपादन करण्यावाचून पर्याय राहिलेला नाही, असे देशाचे आजी-माजी लष्करी अधिकारी वारंवार सांगत आहेत. जमीन, आकाश व सागरी क्षेत्रातील युद्धाबरोबरच आत्ताच्या काळात सायबर तसेच अवकाश क्षेत्रातील युद्ध छेडली जाऊ शकतात. त्याचे परिणाम कदाचित पारंपरिक युद्धापेक्षाही भयंकर ठरतील, असा इशारा संरक्षणदलांच्या वरिष्ठ अधिकार्‍यांकडून दिला जात आहे.

एखादा सायबर हल्ला देखील देशाला जेरीस आणण्यासाठी पुरेसा ठरू शकतो. याची काही उदाहरणे समोर आलेली आहेत. त्यातच चीन व पाकिस्तानसारख्या घातकी देशांचा शेजार भारताला लाभलेला आहे. त्यामुळे या आघाडीवर दुर्लक्ष करणे भारताला परडणारे नाही, याची जाणीव संरक्षणदलांच्या अधिकार्‍यांकडून देशाला सातत्याने करून दिली जात आहे. नौदलप्रमुखांनी नॅशनल डिफेन्स अकॅडमीमध्ये संबोधित करताना याकडे निर्देश केला.

संरक्षणदलांच्या संयुक्त आघाडीचे महत्त्व पूर्वी कधीही नव्हते, इतक्या प्रमाणात वाढले आहे, असे अ‍ॅडमिरल करमबिर सिंग यावेळी म्हणाले. बदलत्या काळातील युद्धतंत्रात झालेले बदल लक्षात घेऊन या दिशेने पावले टाकणे भाग आहे, याचीही जाणीव नौदलप्रमुखांनी करून दिली. यावेळी नौदलप्रमुखांनी कॅडेटस्सोबत ‘पुश-अप्स’ मारून सर्वांचा जोश व उत्साह द्विगुणित केला.

दरम्यान, संरक्षणदलप्रमुख जनरल बिपीन रावत, लष्करप्रमुख जनरल मनोज मुकूंद नरवणे, वायुसेनाप्रमुख एअर चीफ मार्शल आरकेएस भदौरिया आणि आता नौदलप्रमुख अ‍ॅडमिरल करमबिर सिंग या सर्वांनी संरक्षणदलांच्या संयुक्त आघाडीची आवश्यकता मांडून या दिशेने वेगाने पावले टाकली जात असल्याचे वेळोवेळी स्पष्ट केले होते.

विशेषतः लडाखच्या एलएसीवर भारताचा चीनबरोबर तणाव निर्माण झालेला असताना, लष्कराबरोबरच भारतीय वायुसेनेने समन्वय दाखवून केलेल्या हालचाली चीनच्या चिंता वाढविणार्‍या होत्या. तसेच लडाखच्या एलएसीवरील पँगाँग सरोवरासाठी नौदलाने अतिजलद गस्तीनौका धाडून चीनवरील दबाव वाढविला होता. त्यामुळे लडाखच्या एलएसीवर एकाच वेळी भारतीय लष्कर, वायुसेना व नौदलाची संयुक्त आघाडी पहायला मिळाली होती.

leave a reply