जॉर्डन-हमास इस्रायलच्या विरोधात एकजूट करतील

- तुर्कीच्या मुखपत्राचा दावा

अंकारा – जॉर्डनमधील राजे अब्दुल्लाह दुसरे यांची राजवट आणि गाझापट्टीतील हमास यांच्यातील सहकार्य भक्कम होईल, असे संकेत मिळू लागले आहेत. इस्रायलच्या विरोधात जॉर्डन आणि हमास एकत्र येतील, असा दावा तुर्कीच्या मुखपत्राने केला. गेल्या महिन्यात इस्रायल आणि हमासमध्ये पेटलेल्या 11 दिवसांच्या संघर्षात जॉर्डनने स्वीकारलेल्या भूमिकेचा हवाला देऊन तुर्कीच्या मुखपत्राने हा दावा केला आहे.

जॉर्डन-हमास इस्रायलच्या विरोधात एकजूट करतील - तुर्कीच्या मुखपत्राचा दावापॅलेस्टिनींचे नियंत्रण असलेल्या वेस्ट बँक आणि जॉर्डनची सीमा जोडलेली आहे. याशिवाय जॉर्डनमध्ये आश्रय घेतलेल्या विस्थापित पॅलेस्टिनींची संख्या वीस लाखांच्या आसपास आहे. गेल्या महिन्यात हमासबरोबरचा संघर्ष पेटल्यानंतर जॉर्डनमध्ये पॅलेस्टिनी व पॅलेस्टिनी समर्थक जॉर्डनच्या जनतेने इस्रायलविरोधात निदर्शने केली होती. शेकडो निदर्शकांनी जॉर्डनच्या सीमेजवळ धडक देऊन इस्रायलमध्ये घुसखोरीचा प्रयत्न केला होता.

जॉर्डनचे राजे अब्दुल्लाह दुसरे यांनी देखील इस्रायली सुरक्षा यंत्रणेने जेरूसलेम, वेस्ट बँकमधील पॅलेस्टिनींवर केलेल्या कारवाईचा तसेच गाझातील हमास या दहशतवादी संघटनेवर चढविलेल्या हल्ल्यांवर चिंता व्यक्त केली होती. याआधी जॉर्डनने हमासच्या इस्रायलविरोधी कारवायांचे समर्थन केले नव्हते. पण गेल्या महिन्यात जेरूसलेम व शेख जराह येथील संघर्षात हमासच्या समर्थकांनी मोठी भूमिका बजावल्यानंतर जॉर्डनचा हमासकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलल्याचा दावा जॉर्डेनियन विश्‍लेषक अहमद सईद नोफाल यांनी केला.

तर एप्रिल महिन्यात जॉर्डनमध्ये राजे अब्दुल्लाह दुसरे यांच्याविरोधात प्रिन्स हमझाह यांच्या अपयशी ठरलेल्या बंडखोरीला इस्रायलची फूस असल्याची शक्यता अमेरिकी वर्तमानपत्राने वर्तविली होती. यामुळे देखील जॉर्डन आणि इस्रायलमध्ये तणाव निर्माण झाल्याचे या वर्तमानपत्राने म्हटले होते. तसे झाले तर त्याचा फार मोठा परिणाम या क्षेत्रावर होऊ शकतो. इराणबरोबरच जॉर्डनसारख्या प्रबळ देशाचे सहाय्य मिळाल्यास हमासची ताकद प्रचंड प्रमाणात वाढेल आणि त्याचा वापर हमास इस्रायलच्या विरोधात करू शकेल.

leave a reply