पाकिस्तानी लष्करावर टीका करणार्‍या पत्रकारावर हल्ला

इस्लामाबाद – पाकिस्तानचे लष्कर तसेच कुख्यात गुप्तचर संघटना ‘आयएसआय’वर टीका करणारे पाकिस्तानी पत्रकार ‘अबसार आलम’ यांच्यावर मंगळवारी हल्ला झाला. या हल्ल्यात आलम जखमी झाले आहेत. आलम यांच्यावरील हा हल्ला म्हणजे सुरक्षा यंत्रणेविरोधात आवाज उठविणार्‍या पाकिस्तानातील माध्यमांसाठी इशारा असल्याचा दावा केला जातो.

‘पाकिस्तान इलेक्ट्रॉनिक मिडिया रेग्युलटरी अथॉरिटी’चे माजी संचालक आलम यांच्या निवासस्थानाजवळ हा हल्ला झाला. राजधानी इस्लामाबादमधील ‘एफ-११’ भागात हल्लेखोरांनी आलम यांच्यावर गोळीबार केला. या हल्ल्याची चौकशी सुरू असल्याची माहिती स्थानिक पोलीस यंत्रणेने दिली. आलम यांनी कुणावरही संशय व्यक्त करण्याचे टाळले. पण या हल्ल्यामागे पाकिस्तानचे लष्कर आणि आयएसआय असण्याची शक्यता वर्तविण्यात येते.

या हल्ल्याच्या दोन दिवस आधी आलम यांनी सोशल मीडियावर टाकलेल्या पोस्टमध्ये ‘आयएसआय’चे प्रमुख लेफ्टनंट जनरल फईझ हमीद यांच्यावर आरोप केला होता. २०१७ साली आयएसआयच्या प्रमुखांनी आपल्यावर नवाझ शरीफ यांच्या सरकारविरोधात पत्रकारिता करण्यासाठी दबाव टाकला होता, असे आलम यांनी लिहिले होते. या पोस्टमुळे आलम यांच्यावर हल्ला झाल्याचा दावा केला जातो.

२०१७ साली तत्कालिन पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्याविरोधात देशभरात मोठी निदर्शने झाली होती. पाकिस्तानी लष्कर आणि आयएसआयने ही निदर्शने भडकवल्याचा गंभीर आरोप केला जातो. यासाठी लष्कराने पाकिस्तानातील कट्टरपंथियांना हाताशी घेतल्याचे व्हिडिओ देखील समोर आले होते. पाकिस्तानी लष्कर आणि आयएसआयवर टीका करणार्‍या पत्रकारांवर याआधीही हल्ले झाले आहेत. २०१४ साली हमीद मिर या प्रसिद्ध पाकिस्तानी पत्रकारावर गोळीबार झाला होता. मिर यांच्या कुटुंबियांनी यासाठी आयएसआयवर आरोप केला होता.

गेल्या आठवड्याभरापासून पाकिस्तानात सरकारच्या विरोधात उसळलेल्या दंगलीचे विश्‍लेषण करण्यावरही पाकिस्तानी माध्यमांवर बंदी टाकली होती. याबाबत फक्त सरकारची भूमिका मांडण्याची सूचना माध्यमांना मिळाल्याचे या देशाचे पत्रकार उघडपणे सांगत होते. पाकिस्तानातील सोशल मीडियावरही एका दिवसासाठी बंदी टाकण्यात आली होती.

दरम्यान, रिपोर्टर्स विदआऊट बॉर्डर्स या संघटनेने जगभरात पत्रकारांना मिळत असलेल्या स्वातंत्र्याबाबतचा अहवाल प्रसिद्ध केला आहे. जगभरातील १८० देशांमध्ये पाकिस्तान १४५व्या तर चीन १७७व्या स्थानावर आहे.

leave a reply