नव्या ‘रॅन्समवेअर सायबरहल्ल्या’ची व्याप्ती अभूतपूर्व

- ‘एफबीआय’चा इशारा

वॉशिंग्टन – अमेरिकेतील ‘कसेया’ या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपनीवर झालेल्या सायबरहल्ल्याची व्याप्ती अभूतपूर्व असल्याचा इशारा प्रमुख तपासयंत्रणा ‘फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन’ने (एफबीआय) दिला आहे. गेल्या आठवड्यात ‘कसेया’वर ‘रॅन्समवेअर’ प्रकारातील सायबरहल्ला करण्यात आला असून त्यामागे ‘रेव्हिल’ या हॅकर्सच्या गटाचा हात असल्याचा दावा करण्यात येत आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी अमेरिकी गुप्तचर यंत्रणांना सदर हल्ल्याच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. बायडेन व रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्यात झालेल्या भेटीनंतर काही आठवड्यातच नवा सायबरहल्ला झाल्याने ही घटना लक्ष वेधून घेणारी ठरली आहे.

नव्या ‘रॅन्समवेअर सायबरहल्ल्या’ची व्याप्ती अभूतपूर्व - ‘एफबीआय’चा इशारागेल्या आठवड्यात माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपनी ‘कसेया’च्या ‘व्हीएसए’ या सॉफ्टवेअरला लक्ष्य करण्यात आले. हे सॉफ्टवेअर जगभरातील जवळपास 40 हजार छोट्यामोठ्या कंपन्यांना सेवा पुरविते. यातील बहुतांश कंपन्यांना ‘रॅन्समवेअर’चा फटका बसल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या दोन दिवसात विविध माध्यमांमधून देण्यात आलेल्या माहितीनुसार, किमान एक हजार कंपन्यांच्या संगणक यंत्रणा ठप्प झाल्या आहेत. स्वीडनमधील ‘सुपरमार्केट चेन’ असणार्‍या ‘स्वीडिश कूप’ या कंपनीचाही त्यात समावेश असून सर्व दुकाने बंद करणे भाग पडल्याचे निवेदन कंपनीकडून देण्यात आले आहे.

सायबरहल्ला उघड झाल्यानंतर तीन दिवस उलटल्यानंतरही हल्ल्याची पूर्ण व्याप्ती समोर आली नसल्याचे सांगण्यात येत आहे. अमेरिकी यंत्रणा ‘एफबीआय’ने दिलेला इशारा याच गोष्टीकडे निर्देश करणारा ठरतो. ‘हल्ल्याची व्याप्ती इतकी मोठी आहे की एफबीआय प्रत्येक कंपनीशी संपर्क साधू शकत नाही. हल्ला झाल्याचे लक्षात आलेल्या कंपन्यांनी त्यासंदर्भातील माहिती कळविल्यास हल्ल्याची खरी व्याप्ती व धोक्याची जाणीव होईल’, असे ‘एफबीआय’ने बजावले आहे.

नव्या ‘रॅन्समवेअर सायबरहल्ल्या’ची व्याप्ती अभूतपूर्व - ‘एफबीआय’चा इशारा‘कसेया’वर हल्ला करणारा ‘रेव्हिल’ हा गट रशियाशी संबंधित असल्याचा दावा करण्यात येत आहे. मात्र याप्रकरणी अमेरिकेने कोणतीही माहिती रशियाला दिलेली नसल्याचे रशियन प्रवक्त्यांकडून सांगण्यात आले. काही माध्यमांनी, हॅकर्सच्या गटांनी विविध कंपन्यांकडे सुमारे सात कोटी डॉलर्सच्या खंडणीची मागणी केल्याचे वृत्त दिले आहे. मात्र त्याला दुजोरा मिळालेला नाही. यापूर्वी ‘रेव्हिल’ने अमेरिकेतील ‘जेबीएस’ कंपनीवर सायबरहल्ला करून सुमारे एक कोटी डॉलर्सहून अधिक खंडणी वसूल केली होती, असे सांगण्यात येते.

अमेरिकेत गेल्या तीन महिन्यात उघड झालेला हा तिसरा मोठा ‘रॅन्समवेअर सायबरहल्ला’ ठरला आहे. यापूर्वी ‘कोलोनिअल पाईपलाईन’ व ‘जेबीएस’ यांच्यावर मोठे सायबरहल्ले झाले होते. या हल्ल्यांनंतर ‘एफबीआय’चे प्रमुख ख्रिस्तोफर रे यांनी, अमेरिकेत झालेला 9/11चा दहशतवादी हल्ला व आता अमेरिकेवर होणारे सायबरहल्ले यांच्यामुळे राष्ट्रीय सुरक्षेसाठी निर्माण झालेली आव्हाने जवळपास सारखीच आहेत, असे बजावले होते.

leave a reply