उघूरवंशियांचा नाही, काश्मीरचा मुुद्दा महत्त्वाचा – पाकिस्तानच्या पंतप्रधानांचा दावा

इस्लामाबाद – चीनकडून अनन्वित अत्याचार होत असलेल्या उघूरवंशिय इस्लामधर्मियांचा मुद्दा तितकासा महत्त्वाचा ठरत नाही, असे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी म्हटले आहे. त्यापेक्षा काश्मीरचा प्रश्‍न आपल्याला अधिक महत्त्वाचा वाटतो, त्याकडे आंतरराष्ट्रीय समुदायाने लक्ष द्यावे, असे आवाहन इम्रान खान यांनी केले. त्याचवेळी अफगाणिस्तानात गृहयुद्ध पेट घेईल, अशी चिंता पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी व्यक्त केली आहे.

चीन हा पाकिस्तानचा निकटतम मित्रदेश आहे आणि अत्यंत अवघड परिस्थितीत चीनने पाकिस्तानला सहाय्य केले होते, अशा शब्दात पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी चीनचे आभार मानले. एका न्यूज वेबसाईटला मुलाखत देताना इम्रान खान यांनी चीनची ही प्रशंसा करीत असताना, मुलाखतकाराने त्यांना अडचणीत टाकणारे प्रश्‍न केले. जगभरात इस्लामधर्मियांवर अत्याचार होत असल्याचे सांगून त्यावर सडकून टीका करणारे पाकिस्तानचे पंतप्रधान चीनच्या उघूरवंशिय इस्लामधर्मियांवर होणार्‍या अत्याचारांवर का बोलत नाहीत, असा सवाल या मुलाखतकाराने केला.

त्याला पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. याबाबत आम्ही चीनशी सर्वांसमोर चर्चा करू इच्छित नाही. याबाबत जे काही बोलणे होते, ते पडद्याआडच ठेवण्याची आमची इच्छा आहे, असे इम्रान?खान म्हणाले. त्याचवेळी उघूरवंशियांसाठी छळछावण्या तयार करून त्यांच्यावर चीन अत्याचार करीत आहे, हेच आपल्याला मान्य नसल्याचे पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी सांगून टाकले. इतकेच नाही तर उघूरवंशियांच्या प्रश्‍नाला?अवास्तव महत्त्व दिले जात आहे, त्यापेक्षा काश्मीर व पॅलेस्टाईनचा प्रश्‍न अधिक महत्त्वाचा ठरतो, असा हास्यास्पद दावा इम्रान?खान यांनी केला.

यावर चकीत झालेल्या मुलाखतकाराने चीनच्या उघूरवंशियांवरील अत्याचाराचे सबळ पुरावे जगासमोर आलेले आहेत, याची जाणीव पाकिस्तानच्या पंतप्रधानांना करून दिली. तरीही इम्रान?खान यांनी त्याला प्रतिसाद दिलेला नाही. यामुळे इम्रान?खान यांनी आणखी एकवार आपली विश्‍वासार्हता गमावल्याचे दिसत आहे. याआधीही उघूरवंशियांवरील अत्याचारांची आपल्याला माहितीच नसल्याचे दावे इम्रान?खान यांनी केले होते. त्यानंतर त्यांच्यावर जोरदार टीका झाली होती. पाकिस्तानातीलच काही विश्‍लेषकांनी यावरून इम्रान खान यांना धारेवर धरले होते.

दरम्यान, अफगाणिस्तानातील अमेरिकेच्या सैन्यमाघारीनंतर, या देशात गृहयुद्ध पेट घेईल, अशी चिंता या मुलाखतीत इम्रान?खान यांनी व्यक्त केली. अमेरिका अफगाणिस्तानात राजकीय तोडगा न काढता सैन्य माघारी घेत आहे. अफगाणिस्तानात सर्वपक्षीय सरकार येणे हीच या समस्येवरील उपाययोजना ठरते. तसे न करता अमेरिका अफगाणिस्तानातून सैन्य मागे घेत आहे, यामुळे गृहयुद्ध भडकण्याचा धोका वाढल्याचा दावा पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी केला.

आपण तालिबानचे प्रतिनिधी नाहीत, असे या मुलाखतीत इम्रान खान यांनी आवर्जुन सांगितले. पण अफगाणिस्तान तालिबानच्या हाती पडल्यानंतर रक्तपात झाला तर त्याची सर्वाधिक झळ पाकिस्तानलाच बसेल, अशी चिंता इम्रान?खान यांनी व्यक्त केली. मात्र काहीही झाले तरी पाकिस्तान अमेरिकेला अफगाणिस्तानातील कारवाईसाठी लष्करी तळ पुरविणार नाही, अशी महत्त्वपूर्ण घोषणा इम्रान खान यांनी केली. पण त्यांच्याकडून ही घोषणा केली जात असताना, अमेरिकेची विमाने पाकिस्तानच्या हवाई हद्दीचा वापर करून अफगाणिस्तानात तालिबानवर हल्ले चढवित असल्याचे उघड झाले आहे.

leave a reply