तालिबानवर विजय मिळेपर्यंत लढत रहा

- अफगाणिस्तानातील प्रभावी नेते अब्दुल रशिद दोस्तम

विजय मिळेपर्यंतकाबुल – ‘तालिबानसमोर शरणांगती पत्करण्यापेक्षा विजय मिळेपर्यंत लढत रहा. तालिबानने ताब्यात घेतलेल्या प्रत्येक घराची लांडग्यासारखी तपासणी करा. बंदुकीची एकही गोळी फुकट घालवू नका. प्रत्येक गोळीने तालिबान्यांना टिपलेच पाहिजे’, असे आदेश अफगाणिस्तानचे माजी उपराष्ट्राध्यक्ष आणि प्रभावी टोळीप्रमुख अब्दुल राशिद दोस्तम यांनी दिले. तालिबानचे कट्टर विरोधक म्हणून ओळखले जाणारे दोस्तूम संघर्षात परतल्यामुळे अफगाणी लष्कर व इतर टोळ्यांचे मनोधैर्य वाढल्याचा दावा केला जातो. तालिबानने अफगाणिस्तानातील जिल्ह्यांचा ताबा घेण्यास सुरुवात केल्यापासून दोस्तम आपल्या खाजगी लष्करासह तालिबानविरोधी संघर्षात सहभागी झाले होते. जानेवारी महिन्यात फरयाब प्रांतातील काराम्काल जिल्ह्यात पेटलेल्या संघर्षात दोस्तम यांच्या नेतृत्वाखाली अफगाणी सुरक्षा यंत्रणेने १२ तासात ताबा मिळविला होता. तालिबानचे कट्टर शत्रू असलेल्या दोस्तम यांच्यावर जून महिन्यात विषप्रयोगही झाला होता.

अफगाणिस्तानच्या शत्रूंनी हा विषप्रयोग केल्याचा आरोप त्यांची मुलगी ‘राहिला दोस्तम’ यांनी केला होता. त्यानंतर दोस्तम यांच्या तुर्कीमध्ये उपचार सुरू होते. पण दोन दिवसांपूर्वीच दोस्तम अफगाणिस्तानात परतले असून त्यांनी राष्ट्राध्यक्ष गनी यांची भेट घेतली. त्यानंतर अफगाणी जनता, सशस्त्र टोळ्या व लष्कराला संबोधित करताना दोस्तम यांनी तालिबानविरोधी संघर्षात एकजुटीचे आवाहन केले. दोस्तम हे रशिया, इराण व भारताचे मित्र मानले जातात. गेल्या वर्षी दोस्तम यांनी भारताचा दौरा करून परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांची भेट घेतली होती.

leave a reply