इराणच्या वरिष्ठ लष्करी अधिकार्‍याचे इस्रायलच्या मोसादने अपहरण केले

- इस्रायलच्या पंतप्रधानांनीच माहिती दिली

अपहरण केलेजेरूसलेम – गेल्या महिन्यात इस्रायली गुप्तचर यंत्रणा ‘मोसाद’ने इराणच्या लष्करातील जनरल पदावरील अधिकार्‍याचे अपहरण केले होते. मोसादने ही धाडसी कारवाई पार पाडल्याचे इस्रायलचे पंतप्रधान नफ्ताली बेनेट यांनी जाहीर केले. तीन दशकांपूर्वी बेपत्ता झालेल्या इस्रायली वैमानिकाबाबतची माहिती मिळविण्यासाठी इराणी अधिकार्‍याला उचलल्याची माहिती पंतप्रधान बेनेट यांनी दिली.

१९८६ साली लेबेनॉनमधील हवाई हल्ल्यांवेळी इस्रायलचे लढाऊ विमान दक्षिण लेबेनॉनमध्ये कोसळले होते. इस्रायलच्या लष्कराने तातडीने कारवाई करून मुख्य वैमानिकाची सुटका केली. पण लेफ्टनंट कर्नल रॉन अराद याचे ‘अमाल’ या लेबेनीज कट्टरपंथी संघटनेने अपहरण केले. त्यानंतर अमालच्या कट्टरपंथियांनी लेफ्टनंट कर्नल अरादला इराणच्या हवाली केले. पुढील दोन वर्षे अराद इराणमध्ये कैद होते.

१९८८ साली इराणने अराद यांना पुन्हा लेबेनॉनमध्ये आणले. त्यानंतर अरादच्या सुटकेसाठी इस्रायल आणि लेबेनीज यंत्रणांमध्ये वाटाघाटी सुरू झाल्या. पण अरादच्या मोबदल्यात लेबेनीज कट्टरपंथियांनी दहशतवाद्यांच्या सुटकेची मागणी केल्यानंतर इस्रायलने त्याला नकार देऊन या वाटाघाटीतून माघार घेतली होती. पुढील काही महिन्यात लेफ्टनंट कर्नल अराद यांचा मृत्यू झाल्याचा दावा केला जातो. त्यांचा मृतदेह इस्रायलला मिळाला नाही.

लेफ्टनंट कर्नल अरादबाबतचे सत्य जाणून घेण्यासाठी इस्रायलने याआधी प्रयत्न केले होते. पण गेल्या महिन्यात इस्रायली गुप्तचर यंत्रणा ‘मोसाद’ने थेट इराणच्या लष्करातील जनरल पदावरील अधिकार्‍याचे अपहरण करून ही माहिती मिळविण्याचा प्रयत्न केला. याबाबत अधिक तपशील उघड करता येणार नसल्याचे पंतप्रधान बेनेट म्हणाले. पण लंडनस्थित अरबी वर्तमानपत्राने मोसादच्या या कारवाईबाबत काही दावे केले आहेत.

सिरियातून इराणी अधिकार्‍याचे अपहरण केल्यानंतर मोसादने आफ्रिकेतील कुठल्यातरी देशात या अधिकार्‍याची कसून चौकशी केली. व त्यानंतर मोसादने इराणी जनरलची सुटका केल्याचे या वर्तमानपत्राने म्हटले आहे. तर आखातातील अरबी वृत्तसंस्थेने मोसादच्या आणखी एका कारवाईची माहिती दिली. मोसादच्या एजंट्सनी लेबेनॉनच्या उत्तरेकडील नाबी शित गावातील रॉन अराद यांचे थडगे उकरून काढले व हाडांच्या अवशेषातील डीएनएचे नमून घेतले. मोसादचे प्रमुख डेव्हिड बार्नी यांनी माध्यमांमध्ये आलेल्या या माहितीवर प्रतिक्रिया देण्याचे टाळले. पण गेल्या महिन्यातील मोहीम अतिशय धाडसी होती, असे बार्नी म्हणाले. तसेच आम्ही या मोहिमेत अपयशी ठरलो, असे बार्नी यांनी एका बैठकीत सांगितले. तर इस्रायली पंतप्रधानांच्या कार्यालयाने मोहीम यशस्वी ठरल्याचा दावा केला. या मोहिमेतून मोठी उद्दिष्ट्ये साधता आली, असे इस्रायली पंतप्रधानांच्या कार्यालयाने स्पष्ट केले.

मोसाद ही जगभरात गोपनीय कारवायांसाठी प्रख्यात आहे. गेल्या वर्षी इराणची राजधानी तेहरानजवळ मुख्य अणुशास्त्रज्ञ मोहसिन फखरीझादेह यांची हत्या मोसादनेच घडविल्याचा आरोप इराणने केला होता. त्याचबरोबर इराणच्या अणुप्रकल्पांमधील संशयास्पद स्फोट मोसादनेच घडवून आणले होते. तर याआधी मोसादचे माजी प्रमुख योसी कोहेन यांनी इराणमध्ये घुसून अणुकार्यक्रमासंबंधीचे हजारो दस्तावेज व साहित्य हस्तगत केल्याच्या बातम्याही प्रसिद्ध झाल्या होत्या. त्यामुळे मोसादच्या कारवाया या नेहमीच इराणला आव्हान देणार्‍या ठरल्या आहेत. अशा परिस्थितीत इराणच्या वरिष्ठ लष्करी अधिकार्‍याच्या अपहरणाची कबुली देऊन इस्रायली पंतप्रधानांनी इराणला आणखी एक इशारा दिल्याचे दिसते आहे.

इस्रायलकडून इराणवर छुप्या कारवाईचा इशारा
‘इराणच्या अणुकार्यक्रमासह या देशाचे लष्करी सामर्थ्य नष्ट करण्याच्या मोहिमा यापुढे सुरूच राहतील. कुठल्याही क्षणी, कुठल्याही ठिकाणी इस्रायल कारवाई करील’, असा इशारा इस्रायलचे संरक्षणदलप्रमुख लेफ्टनंट जनरल अविव कोशावी यांनी दिला.

याआधीही इस्रायलच्या संरक्षणदलप्रमुखांनी इराणवर हल्ले चढविण्यासाठी तयार राहण्याचे आदेश आपल्या लष्कराला दिले होते. लेफ्टनंट जनरल कोशावी यांच्याप्रमाणे इस्रायलच्या लष्करी गुप्तचर यंत्रणेचे प्रमुख मेजर जनरल तमिर हेमन यांनीही इराणला धमकावले आहे. इराणी राजवट सध्या स्थीर दिसत असली तरी येत्या काळात ही राजवट कोसळेल, असा इशारा हेमन यांनी दिला आहे.

leave a reply