अफगाणिस्तानच्या राजदूतांच्या मुलीचे पाकिस्तानात अपहरण व छळ – काही तासांनी सुटका केली

अपहरणइस्लामाबाद/काबुल – पाकिस्तानमधील अफगाणी राजदूत नजिबुल्लाह अलीखिल यांच्या मुलीचे अपहरण करून तिचा क्रूरपणे छळ करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अफगाणिस्तान सरकारने या कृत्याची तीव्र शब्दात निंदा केली असून, पाकिस्तानमधील अफगाणी अधिकारी व कुटुंबियांच्या सुरक्षेवर चिंता व्यक्त केली आहे. तालिबानच्या मुद्यावर अफगाणिस्तानवर दबाव टाकण्यासाठी हे कृत्य करण्यात आले असावे, असा दावा विश्‍लेषक करीत आहेत.

शुक्रवारी दुपारी अडीचच्या सुमारास अफगाणी राजदूत नजिबुल्लाह अलीखिल यांची मुलगी सिलसिला अखिल बेपत्ता झाल्याचे समोर आले. 26 वर्षीय सिलसिला अलीखिल सुपरमार्केटमधून घरी येत असताना ही घटना घडल्याचे सांगण्यात येते. काही तासांनी अज्ञात व्यक्तींकडून सिलसिलाची सुटका करण्यात आली. मात्र सुटका झालेल्या सिलसिलाला तात्काळ रुग्णालयात दाखल करावे लागले.

पाकिस्तानी अपहरणकर्त्यांनी अफगाणी राजदूतांच्या मुलीला अत्यंत क्रूर वागणूक देऊन तिचा भयंकर छळ केल्याचे समोर आले आहे. तिच्या अंगावर अनेक ठिकाणी जखमा झाल्याच्या खुणाही आढळल्या आहेत. अफगाणिस्तानच्या सरकारने या घटनेची निर्भत्सना करून पाकिस्तानच्या सरकारकडे याचा निषेध नोंदविला. अपहरणाचे कृत्य अत्यंत निंदनीय घटना असून, अफगाणी राजनैतिक अधिकारी व कुटुंबियांच्या सुरक्षेवर प्रश्‍नचिन्ह उभे राहिले आहे, अशा शब्दात अफगाण सरकारने पाकिस्तानला सुनावले आहे.

अपहरणपाकिस्तान सरकारने अपहरणकर्त्यांचा तात्काळ शोध घ्यावा. अफगाणी दूतावास व इतर कार्यालयांच्या सुरक्षेसाठी तातडीने पावले उचलण्यात यावीत, अशी मागणी अफगाणिस्तानच्या सरकारने केली आहे. परदेशी राजनैतिक अधिकार्‍यांचे अपहरण तसेच कुटुंबियांना त्रास देण्याच्या घटना पाकिस्तानात सातत्याने घडत आहेत. यापूर्वी भारतीय राजनैतिक अधिकार्‍यांना अनेकदा अशा घटनांना सामोरे जावे लागले होता. अशा भ्याड कारवायांना पाकिस्तानच्या सरकार व लष्कराचीच फूस असल्याचे मानले जाते.

सध्या तालिबानच्या मुद्यावरून अफगाणिस्तान व पाकिस्तानमध्ये प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. उझबेकिस्तानच्या ताश्कंद येथे पार पडलेल्या बैठकीत अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अश्रफ गनी यांनी पाकिस्तानातून दहा हजार दहशतवाद्यांनी अफगाणिस्तानात घुसखोरी केल्याचा आरोप केला. इतकेच नाही तर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या उपस्थितीतच, राष्ट्राध्यक्ष अश्रफ गनी यांनी दहशतवाद्यांना लगाम घालण्यात पाकिस्तानचे सरकार अपयशी ठरल्याचा ठपका ठेवला.

यानंतर इस्लामाबादमधून अफगाणिस्तानच्या राजदूतांच्या मुलीचे अपहरण झाले, ही लक्षवेधी बाब ठरते. पाकिस्तान या प्रकरणी सारवासारव करण्याचा प्रयत्न करीत आहे खरा. पण याचे भयंकर परिणाम पाकिस्तानला भोगावे लागतील, अशी चिंता पाकिस्तानचे पत्रकार व्यक्त करीत आहेत. यामुळे आधीच बदनाम असलेल्या पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय स्तरावर अधिकच बदनामी होईल, असा भीती या देशातील पत्रकारांना वाटू लागली आहे.

leave a reply