एलएसीवरील लष्कराच्या विशेष पथकाला दहा हजार सैनिकांची कुमक मिळणार

नवी दिल्ली – लडाखच्या एलएसीवरील तणाव कमी करण्यासाठी भारत व चीनमधील चर्चेची ११ वी फेरी सुरू झाली आहे. याच्या आधी चीनने भारताच्या एलएसीपासून जवळ बांधकाम सुरू केल्याच्या बातम्या आल्या होत्या. केवळ लडाखच नाही तर अरुणाचल प्रदेशजवळील एलएसीवर चीन मोठ्या प्रमाणात बांधकाम करीत असून तिबेटमध्ये जय्यत लष्करी तयारी करीत असल्याचे स्पष्ट झाले होते. यावर भारताची करडी नजर रोखलेली आहे, असे संरक्षण मंत्रालयाने म्हटले होेते. त्या पार्श्‍वभूमीवर चीनबरोबरील चर्चेची ही ११ वी फेरी सुरू असतानाच भारतीय लष्कराच्या ‘१७ माऊंटन स्ट्राईक कॉर्प्स’ला आणखी दहा हजार सैनिक मिळणार असल्याची बातमी आली आहे.

भारत व चीनमधील एलएसीच्या संरक्षणाची जबाबदारी असलेल्या ‘१७ माऊंटन स्ट्राईक कॉर्प्स’ला आणखी दहा हजार सैनिक पुरविण्याचा निर्णय अत्यंत महत्त्वाचा ठरतो. चीनबरोबर युद्ध पेटलेच तर, चीनवर हल्ला चढविण्याची क्षमता ‘१७ माऊंटन स्ट्राईक कॉर्प्स’कडे आहे. म्हणूनच या पथकाचे बळ वाढवून भारत चीनच्या युद्धखोरीला त्याच भाषेत प्रत्युत्तर देत आहे. यामुळे एलएसीची सुरक्षा अधिक सुनिश्‍चित होईल. कारण अधिक संख्येने सैनिक उपलब्ध झाल्याने एलएसीवरील लष्कराच्या हालचाली वाढतील आणि त्याच प्रमाणात चीनला रोखण्याची क्षमताही वाढू शकेल. गेल्या वर्षी गलवानच्या खोर्‍यात चिनी जवानांनी केलेल्या हल्ल्यानंतर, भारताला यासंदर्भात निर्णय घ्यावा लागल्याचे दिसत आहे.

दरम्यान, शुक्रवारपासून लडाखच्या एलएसीवरील चुशूल येथे भारत व चीनच्या वरिष्ठ लष्करी अधिकार्‍यांची चर्चा सुरू झाली. या चर्चेत लेफ्टनंट जनरल पीजेके मेनन भारताचे प्रतिनिधित्त्व करीत आहेत. सदर चर्चेत भारताकडून लडाखच्या एलएसीवरील गोग्रा, हॉट स्पिंग्र आणि डेप्सांग येथून चीनच्या जवानांनी माघार घ्यावी, अशी मागणी केली जात आहे. तसेच लडाखच्या एलएसीवर २०२० सालच्या एप्रिल महिन्यातील स्थिती प्रस्थापित व्हावी, असे भारत सातत्याने बजावत आला आहे. त्याखेरीज दोन्ही देशांमध्ये सौहार्द प्रस्थापित होणार नाही, अशी भारताची स्पष्ट भूमिका आहे.

भारताबरोबर सलोख्याचे संबंध व सहकार्य अपेक्षित असेल तर त्यासाठी सीमेवर सौहार्द राखणे आवश्यक आहे. सीमेवर तणाव असेल तर भारताचे सहकार्य गृहित धरता येणार नाही, असे भारताच्या परराष्ट्रमंत्र्यांनी चीनला स्पष्टपणे बजावले होते. मात्र चीन सीमावाद बाजूला ठेवून भारताने चीनशी व्यापारी सहकार्य कायम ठेवावे, अशा फाजिल मागण्या करीत आहे. त्याचवेळी एलएसीवर लष्करी हालचाली वाढवून चीन भारतावर कुरघोडी करण्याचे प्रयत्न सोडून द्यायला तयार नाही. विशेषतः लडाखच्या एलएसीवरील तणावामुळे भारत चीनसारख्या बलाढ्य देशाची पर्वा न करता टक्कर देऊ शकतो, याची जाणीव सार्‍या जगाला झालेली आहे. त्याचवेळी लडाखच्या हिवाळ्यात चीनचे जवान कुडकुडत होते, ही बाब देखील जगासमोर लपून राहिली नव्हती. यामुळे चीन भारताला लष्करी आघाडीवर धक्का देऊन आपली प्रतिष्ठा परत मिळविण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचे दिसत आहे.

यामुळेच लडाखच्या एलएसीवरून सध्या चीनने माघार घेतली, तरी चीनचे लष्कर पुन्हा एलएसीवर कुरापती काढल्यावाचून राहणार नाही, असे माजी लष्करी अधिकारी बजावत आहेत. याचे संकेत चिनी लष्कराच्या हालचालींवरून मिळत आहेत. त्याचवेळी ‘१७ माऊंटन स्ट्राईक कॉर्प्स’साठी आणखी दहा हजार सैनिकांचे बळ पुरवून भारतानेही चीनला उत्तर देताना कुठल्याही प्रकारची कसर राहणार नाही, याची तरतूद केल्याचे दिसत आहे. याच्या एक दिवस आधी भारतीय वायुसेनेची क्षेपणास्त्रसज्ज रफायल विमाने एलएसीवर उड्डाण करीत असल्याचे फोटोग्राफ्स प्रसिद्ध करण्यात आले होते. चीन आपल्या लष्करी सामर्थ्याचा दाखला देऊन भारताला झुकवू शकणार नाही, असा संदेश याद्वारे भारताने दिला आहे.

leave a reply