जम्मू-काश्मीरमध्ये चकमकीत मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्यासह तीन ठार

नवी दिल्ली – जम्मू-काश्मीरमध्ये अलिकडेच झालेल्या दोन नगरसेवकांच्या हत्या, तसेच पोलिसांच्या हत्येसह कित्येक दहशतवादी हल्ल्यात सहभागी असलेला ‘लश्कर-ए-तोयबा’चा मोस्ट वॉन्टेड दहशतवादी मुदासिर पंडीतला चकमकीत ठार करण्यात आले आहे. त्याच्यावर दहा लाखाचे इनामही होते. या चकमकीत आणखी दोन दहशतवादी ठार झाले असून एका पाकिस्तानी दहशतवाद्याचा समावेश आहे. त्याचवेळी फेब्रुवारी महिन्यात भारत आणि पकिस्तानमध्ये झालेल्या संघर्षबंदी करारानंतर सीमा भागात गोळीबाराच्या घटना घडल्या नसल्या तरी भारतात दहशतवाद्यांच्या घुसखोरीसाठी सतत प्रयत्न होत आहेत. गुप्तचर यंत्रणेनुसार हिजबुलचे दहशतवादी सीमेजवळ दिसले आहेत व येत्या काही दिवसात हे दहशतवादी घुसखोरीचा प्रयत्न करू शकतात, अशी शक्यता व्यक्त केली जाते.

जम्मू-काश्मीरमध्ये चकमकीत मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्यासह तीन ठारजम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षादल दहशतवाद्याचे संपूर्ण उच्चाटन करण्यासाठी सतत मोहिम राबवत असून दहशतवाद्यांना सहाय्य करणार्‍यांचे नेटवर्कही उद्ध्वस्त केले जात आहे. तसेच दहशतवाद्यांना हवालामार्फत मिळणार्‍या पैशाचे मार्गही नष्ट केले जात आहे. अमली पदार्थांची तस्करी रोखून दहशतवाद्यांसाठी होणारा पैशाचा पुरवठा थांबविण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. दोनच दिवसांपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये ४५ कोटी रुपयांचा अमली पदार्थांसह मोठा शस्त्रसाठा पकडण्यात आला होता.

सोमवारीही सुरक्षादलांना मोठे यश मिळाले. लोकप्रतिनिधी व सुरक्षादलांवर हल्ले करून दहशत माजविण्याचा प्रयत्न दहशतवाद्यांकडून केला जात आहे. अलिकडेच निरनिराळ्या घटनांमध्ये दोन नगरसेवकांच्या हत्या दहशतवाद्यांनी केल्या होत्या. तसेच १२ जून रोजी एका पोलीस पथकावर हल्ला करण्यात आला होता. तीन पोलीस यामध्ये शहीद झाले होते. तसेच आणखी काही घटनांमध्ये दोन नागरिकांच्या हत्या करण्यात आल्या होत्या. या हत्यांचा सूत्रधार असलेला मुदासिर पंडीतला सोमवारी सुरक्षादलांनी चकमकीत ठार केले.

मुदासिर आणखीही काही दहशतवादी हल्ल्यांमध्ये सहभागी होता. १२ जूनच्या घटनेनंतर मुदासिरनेच हल्ला केल्याची माहिती सुरक्षादलांना मिळाली होती. तेव्हापासून त्याचा कसून शोध घेतला जात होता. बारामुल्लातील सोपोरमध्ये गुंड ब्राथ भागात मुदासिर लपल्याची माहिती सुरक्षादलांना मिळाली होती. त्यानंतर रविवारी रात्री उशीर ऑपरेशन हाती घेण्यात आले होते. या चकमकीत अब्दुल्ला असर हा पाकिस्तानी दहशतवादीही ठार झाला. तसेच खुर्शिद नावाचा आणखी एका दहशतवाद्याला चकमकीत ठार करण्यात आले.

leave a reply