इराक व सिरियाप्रमाणे अमेरिकेला पुन्हा अफगाणिस्तानात सैनिक तैनात करावे लागतील

- सिनेटर लिंडसे ग्रॅहम यांचा इशारा

इराक व सिरियाप्रमाणेवॉशिंग्टन – ‘तालिबानने अफगाणिस्तानचा ताबा घेतल्यानंतर दहशतवादाचा धोका मोठ्या प्रमाणात वाढला आहे. येणार्‍या काळात अफगाणिस्तान कट्टरपंथिय गटांसाठी तसेच अल कायदाच्या दहशतवाद्यांसाठी आश्रयस्थान ठरु शकते. त्यामुळे इराक व सिरियाप्रमाणे अफगाणिस्तानातही अमेरिकेला पुन्हा लष्करी तैनाती करावी लागेल’, असा इशारा रिपब्लिकन पक्षाचे वरिष्ठ सिनेटर लिंडसे ग्रॅहम यांनी दिला. अफगाणिस्तानच्या मुद्यावर अमेरिकेकडे फारसे पर्याय उपलब्ध नसल्याचा दावाही ग्रॅहम यांनी केला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी घिसाडघाई करून अफगाणिस्तानातून सैन्य माघारी घेतल्याचा आरोप सिनेटर ग्रॅहम यांनी केला असून बायडेन यांच्याविरोधात अविश्‍वास ठराव आणण्याचे संकेतही दिले आहेत.

अमेरिकेचे संरक्षणदलप्रमुख जनरल मार्क मिले यांनी नुकताच, अमेरिकेच्या सुरक्षेसाठी पुन्हा अफगाणिस्तानात हवाईहल्ले चढवावे लागतील, असा इशारा दिला होता. यावेळी त्यांनी तालिबानला सरकारची जबाबदारी सांभाळता येणार नाही व देशात गृहयुद्ध भडकेल, असेही बजावले होते. सिनेटर ग्रॅहम यांनीही आपल्या वक्तव्यातून याच मुद्याकडे लक्ष वेधले आहे.

इराक व सिरियाप्रमाणे‘अमेरिकेने पंजशीरमधील बंडखोर गटांना सहाय्य पुरवायला हवे. तालिबानला अफगाणिस्तानची जबाबदारी सांभाळता येणार नाही. अफगाणी जनता त्यांचा द्वेष करते. जर तालिबानविरोधात बंड होत आहे, असे दिसले तर आपल्यासमोर पर्याय असणार नाही. आयएससुद्धा तालिबानच्या मागे लागेल आणि पुढील वर्षापर्यंत देशभरात अंदाधुंदी माजलेली दिसेल. परदेशी हितसंबंधांवर हल्ले चढविण्यासाठी ही स्थिती पोषक ठरु शकते’, असे सिनेटर ग्रॅहम यांनी ‘बीबीसी’ला दिलेल्या मुलाखतीत बजावले.

अफगाणिस्तानमधील दहशतवादाच्या धोक्याकडे लक्ष वेधतानाच इराकमध्येही दहशतवादाच्या धोक्यामुळेच अमेरिकेने पुन्हा लष्कर तैनात केले होते, याची आठवणही ग्रॅहम यांनी करून दिली. इराकमध्ये सध्या अमेरिकेचे पाच हजार जवान तैनात असल्याचा दावाही ग्रॅहम यांनी केला. राष्ट्राध्यक्ष बायडेन यांच्यावर टीकास्त्र सोडताना त्यांनी अफगाणिस्तान मुद्यावर देण्यात आलेल्या सल्ल्यांकडे दुर्लक्ष केले, असा आरोपही त्यांनी केला. अफगाणिस्तानमधील अमेरिकेच्या माघारीमुळे निर्माण झालेल्या स्थितीमुळे कदाचित पुन्हा ९/११ सारखा हल्ला होऊ शकतो, असा दावाही त्यांनी यापूर्वी केला होता. अमेरिकेचा सहकारी देश असणार्‍या ब्रिटननेही ‘आयएस’विरोधातील कारवाईसाठी पुन्हा अफगाणिस्तानात जाण्याची वेळ येऊ शकते, असे संकेत दिले आहेत.

leave a reply