युरोपियन नेत्यांविरोधात अमेरिका-डेन्मार्कने केलेली हेरगिरी गंभीर व अस्वीकारार्ह घटना

- राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांनी बजावले

पॅरिस/वॉशिंग्टन/कोपनहेगन – अमेरिका व डेन्मार्कने युरोपियन नेत्यांवर केलेली हेरगिरी ही अत्यंत गंभीर व अस्वीकारार्ह घटना असल्याचे फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांनी बजावले आहे. जर्मनी, नॉवे व स्वीडन या देशांनीही मॅक्रॉन यांचे वक्तव्य उचलून धरले असून सखोल चौकशीची मागणी केली.

युरोपियन नेत्यांविरोधात अमेरिका-डेन्मार्कने केलेली हेरगिरी गंभीर व अस्वीकारार्ह घटना - राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांनी बजावलेअमेरिकेच्या ‘नॅशनल सिक्युरिटी एजन्सी’ने (एनएसए) डेन्मार्कची गुप्तचर यंत्रणा ‘डिफेन्स इंटेलिजन्स सर्व्हिस’च्या सहाय्याने जर्मनी, फ्रान्स, नॉर्वे व स्वीडनमधील नेत्यांवर हेरगिरी केली होती. डेन्मार्कच्या ‘डॅनिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन’ या सरकारी रेडिओ व टीव्ही चॅनलने यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केले आहे.

यापूर्वी 2013 साली ‘एनएसए’मध्ये कार्यरत एडवर्ड स्नोडेन या संगणकतज्ज्ञाने, अमेरिकी यंत्रणांकडून जगभरात करण्यात येणार्‍या टेहळणी व हेरगिरीसंबंधात गोपनीय कागदपत्रे प्रसिद्ध करून खळबळ उडविली होती.

डेन्मार्कच्या ‘डॅनिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, अमेरिकेच्या ‘एनएसए’ने डेन्मार्कची गुप्तचर यंत्रणा ‘डिफेन्स इंटेलिजन्स सर्व्हिस’च्या सहाय्याने युरोपियन नेत्यांवर हेरगिरी केली. 2012 ते 2014 या कालावधीत ‘ऑपरेशन डनहॅमर’ नावाच्या मोहिमेअंतर्गत ही कारवाई करण्यात आली. यात जर्मनीच्या चॅन्सेलर अँजेला मर्केल यांच्यासह फ्रान्स, नॉर्वे व स्वीडनच्या प्रमुख नेत्यांचे फोन टॅप करण्यात आले. या नेत्यांच्या मोबाईलमधील संदेशांवरही अमेरिकी यंत्रणेचे नजर होती.युरोपियन नेत्यांविरोधात अमेरिका-डेन्मार्कने केलेली हेरगिरी गंभीर व अस्वीकारार्ह घटना - राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांनी बजावले

या हेरगिरीसाठी अमेरिका व डेन्मार्कच्या यंत्रणांनी ‘अंडरसी केबल नेटवर्क’चा वापर केल्याचेही उघड झाले आहे. अमेरिकी यंत्रणेने या हेरगिरीसाठी ‘एक्सकीस्कोअर’ नावाचे सॉफ्टवेअर विकसित केल्याची माहितीही ‘डॅनिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन’ने दिली आहे.

‘एनएसए’ तसेच डेन्मार्कच्या ‘डिफेन्स इंटेलिजन्स सर्व्हिस’ने यावर काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र डेन्मार्कच्या संरक्षणमंत्री ट्राईन ब्रॅम्सन यांनी, सहकारी देशांवर केलेली टेहळणी अस्वीकारार्ह असल्याचे वक्तव्य केले आहे.

युरोपियन नेत्यांविरोधात अमेरिका-डेन्मार्कने केलेली हेरगिरी गंभीर व अस्वीकारार्ह घटना - राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांनी बजावलेअमेरिका व डेन्मार्कने टेहळणी केलेल्या युरोपिय देशांकडून या प्रकरणावर तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे. ‘मित्रदेश आणि युरोपातील भागीदार देशांमध्ये अशा प्रकारची घटना घडणे कधीही स्वीकारार्ह ठरणार नाही. ही बाब अत्यंत गंभीर आहे’, अशा शब्दात फ्रेंच राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांनी नाराजी व्यक्त केली.

जर्मनीच्या चॅन्सेलर मर्केल यांनी मॅक्रॉन यांच्या वक्तव्याचे समर्थन करीत चौकशीची मागणी केली आहे. स्वीडन व नॉर्वेच्या संरक्षणमंत्र्यांनीही चौकशीच्या मागणीला पाठिंबा दिला. तर डेन्मार्कमध्ये उघड झालेले प्रकरण हे हिमनगाचे टोक असल्याची प्रतिक्रिया रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिली आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन या महिन्यात युरोपचा दौरा करणार आहेत. त्यापूर्वी समोर आलेल्या या प्रकरणाचे पडसाद बायडेन यांच्या दौर्‍यात उमटतील, असे विश्‍लेषकांचे म्हणणे आहे.

leave a reply