ट्रम्प यांचे कोरोनाबाबतचे दावे अमान्य करून चूक केली – अमेरिकेच्या उदारमतवादी पत्रकारांची कबुली

वॉशिंग्टन – चायनिज व्हायरस, वुहान व्हायरस अशारितीने कोरोनाचा उल्लेख करून अमेरिकेचे तत्कालिन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या साथीसाठी चीनला जबाबदार धरले होते. मात्र ट्रम्प यांना पराकोटीचा विरोध करणार्‍या अमेरिकन माध्यमांमधील उदारमतवादी गटाने, त्यांच्या या दाव्यांची खिल्ली उडविली होती. पण आता कोरोनाबाबत ट्रम्प यांनी केलेले दावे अमान्य करून आपण फार मोठी चूक केली, याची कबुली उदारमतवादी गटाच्या पत्रकारांना द्यावी लागत आहे. केवळ ट्रम्प यांनी आरोप केला होता, म्हणून आम्ही त्याच्या विरोधात भूमिका स्वीकारल्याचे या पत्रकारांनी मान्य केले. असा कबुलीजबाब देणार्‍यांमध्ये अमेरिकेतील आघाडीच्या वर्तमानपत्रांचा व वृत्तवाहिन्यांच्या ख्यातनाम पत्रकारांचा समावेश आहे.

अमान्यकोरोनाबाबत ट्रम्प यांनी केलेले आरोप आपण पूर्वग्रहदूषित भूमिकेतून पाहिले. याबाबतचे सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न केला नाही, हे मान्य करणार्‍या उदारमतवादी पत्रकार व माध्यमांवर आता टीका सुरू झाली आहे. तुमच्या विचारसरणीच्या आहारी जाऊन तुम्ही वाचकांचा विश्‍वासघात केला, अशी जळजळीत टीका तटस्थ पत्रकारांनी केली आहे. इतकेच नाही तर काय चुकीचे आणि काय योग्य, ते ठरविण्याचा अधिकार तुम्हाला कुणी दिला? असा प्रश्‍न करून पत्रकाराची भूमिका केवळ सत्य मांडण्याचीच असली पाहिजे, या पत्रकारितेच्या मुलभूत सिद्धांताची आठवण या पत्रकारांनी करून दिली. आता कोरोनाबाबत धक्कादायक माहिती जगासमोर आल्यामुळे उघडे पडलेले हे पत्रकार आपली चूक कबूल करीत आहेत. पण त्याला फारसा अर्थ राहिलेला नाही, ते आता आपली कातडी वाचवित आहेत, असा टोला अमेरिकी स्तंभलेखक जोश रॉगिन यांनी सोशल मीडियावर लगावला आहे.

ट्रम्प यांच्या विरोधात भूमिका स्वीकारणार्‍या वृत्तवाहिन्यांच्या पत्रकारांनी आता आपली फजिती झाल्याचे मान्य केले. यामुळे कोरोनाच्या साथीचा अमेरिकेच्या माध्यमसृष्टीतही मोठा परिणाम दिसू लागल्याचे समोर येत आहे. केवळ अमेरिकेच नाही तर कोरोनाबाबत समोर येत असलेल्या माहितीमुळे पुढच्या काळात इतर देशांमध्येही फार मोठ्या उलथापालथी होऊ शकतात. कोरोनाची साथ रोखण्यात आपल्या देशाचे सरकार व आरोग्ययंत्रणा पूर्णपणे अपयशी ठरल्याचा ठपका अगदी विकसित देशांमध्येही होत आहे. पण ही भयंकर साथ म्हणजे चीनने छेडलेले जैविक युद्ध असल्याचे समोर येऊ लागल्यानंतर, या अपयशाकडे वेगळ्या दृष्टीने पाहिले जाऊ शकते. ही साथ म्हणजे आपल्या देशाविरोधात छेडलेले जैविक युद्ध होते, याची जाणीव झाल्यानंतर, याकडे साथ म्हणून पाहणार्‍यांची भूमिका पूर्णपणे बदलू शकते.

यामुळे सध्या अमेरिकेतील माध्यमे व पत्रकार जशी आपल्या चुकीची कबुली देत आहेत, तशाच स्वरुपाच्या घडामोडी इतर देशांमध्येही पहायला मिळू शकतील. त्याचवेळी कोरोनाद्वारे जैविक युद्ध छेडल्याचा आरोप होत असलेल्या चीनला यासाठी जबाबदार धरण्याची मागणी अधिकच आक्रमक होऊ शकते. एकट्या अमेरिकेत कोरोनाच्या साथीने सहा लाखाहून अधिक बळी घेतले आहेत. तरीही अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडेन या साथीला जबाबदार असलेल्या चीनविरोधात कठोर कारवाई करण्याचे कर्तव्य पार पाडत नसल्याची खंत विख्यात विश्‍लेषक गॉर्डन चँग यांनी नुकतीच व्यक्त केली होती.

leave a reply