महाराष्ट्रात चोवीस तासात कोरोनाने ५०० जणांचा बळी

- महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, दिल्लीत सव्वा लाख नव्या रुग्णांची नोंद

नवी दिल्ली/मुंबई – देशात कोरोनाचे संक्रमण कमी होण्याचे नाव घेत नसून रविवारच्या सकाळपर्यंतच्या चोवीस तासात एक लाख ६१ हजार नव्या रुग्णांची नांेंद झाली, तसेच सुमारे दीड हजार जणांचा या साथीने बळी गेला. रविवारी संध्याकाळी विविध राज्यांकडून कोरोना रुग्णांबाबत जाहीर झालेली माहिती पाहता सोमवारी आणखी नवा उच्चांक स्थापीत होण्याची शक्यता आहे. रविवारी महाराष्ट्रात ५०३ जणांचा बळी गेला असून ६८ हजार ६३१ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. उत्तर प्रदेशमध्येही एका दिवसात आढळलेल्या कोरोनाच्या नव्या रुग्णांच्या संख्येने उच्चांक गाठला आहे.?उत्तर प्रदेशात चोवीस तासात ३० हजार ५९६ रुग्णांची नांेंद झाली, तर १२९ जण दगावले. तसेच दिल्लीत १६१ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला, तसेच सुमारे २५ हजार नवे रुग्ण सापडले.

देेशात कोरोनाच्या नव्या लाटेचा उद्रेक झाला आहे. अजूनही या लाटेने शिखर गाठले नसल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. लसीकरण वाढविण्याबरोबर नियमांचे काटेकोर पालन हाच ही साथ थोपविण्यासाठी प्रभावी उपाय असून वारंवार नागरिकांना सुरक्षित अंतर ठेवण्याचे व मास्क लावण्याचे आवाहन करण्यात येत आहे. डबल म्युटेशन कोरोना विषाणूमुळे ही साथ अतिशय वेगाने पसरत असल्याचा दावा केला जातो. यामुळे सध्या सर्वाधिक रुग्ण आढळत असलेल्या महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, दिल्ली, छत्तीसगड, कर्नाटक, केरळ या राज्यात परिस्थिती बिकट बनत चालली असून बेड जवळजवळ भरले आहेत. यावर उपाय म्हणून नवे कोविड सेंटर्स सुरू करण्यात येत आहेत. तसेच खाजगी रुग्णालयांमधीलही ८० टक्के बेड कोरोनासाठी राखीव ठेवण्याच्या सूचना काही राज्यांनी दिल्या आहेत. तसेच रेल्वे डब्यांचा वापरही पुन्हा कोविड सेंटर्स म्हणून सुरू झाला आहे. यासाठी असे कोचेस विविध राज्यांमध्ये रेल्वेने तैनात केले आहेत.

काही राज्यांना ऑक्सिजनची कमतरता जाणवत आहे. यासाठी पंतप्रधान नरेंेद्र मोदी यांनीही काही सूचना केल्या आहेत. याशिवाय काही बडे उद्योजकही ऑक्सिजन पुरवठ्यासाठी समोर आले आहेत. टाटा स्टिलकडून दररोज ३०० टन ऑक्सिजन वैद्यकीय कारणांसाठी पुरविला जाणार आहे. याशिवाय सेलनेही ३३ हजार टन लिक्वीड मेडीकल ऑक्सिजनच्या पुरविठ्याची घोषणा केली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीकडूनही महाराष्ट्राला १०० टन ऑक्सिजन पुरविला जाणार आहे. आर्सेलरमित्तल निप्पॉन स्टिल कंपनीनेही २०० टन ऑक्सिजन गुजरातला पुरविण्याचा निर्णय घेतला आहे. याखेरीज ज्या राज्यांमध्ये ऑक्सिजन पुरविठ्याची आवश्यकता असेल, तेथे रेल्वेद्वारे ऑक्सिजनची वाहतूक केली जाईल. यासाठी ऑक्सिजन एक्स्प्रेस सुरू करण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे.

leave a reply