महाराष्ट्रात कोरोनाने चोवीस तासात ८३२ जण दगावले

नवी दिल्ली/मुंबई – महाराष्ट्रात कोरोनाचे नवे रुग्ण सापडण्याचे प्रमाण स्थिर झाले असले, तरी दरदिवशी या साथीने बळी जाणार्‍यांची संख्या वाढली आहे. रविवारी महाराष्ट्रात ८३२ जण कोरोनाने दगावले, तर ६६ हजार नव्या रुग्णांची नोंद झाली. शनिवारी देशभरात २७६७ जणांचा बळी गेला होता, ३ लाख ४९ हजार नवे रुग्ण आढळले होते.

Advertisement

देशात कोरोनाच्या साथीने भीषण रुप धारण केले आहे. यामध्ये ७४ टक्के रुग्ण आणि मृत्यु हे दहा राज्यांमध्ये होत आहेत. यामध्ये महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, कर्नाटक, केरळ, छत्तीसगड, तमिळनाडू, राजस्थान, पश्‍चिम बंगाल आणि गुजरातचा समावेश आहे. यामध्ये महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश या देशातील दोन सर्वात मोठ्या राज्यांमध्ये सर्वाधिक रुग्ण आढळत आहेत. महाराष्ट्रात गेल्या आठवडाभरापासून ६६ ते ६८ हजार नव्या रुग्णांची दर दिवशी नोंद होत आहे. मात्र दरदिवशी या साथीने जाणारे बळी मात्र ४०० वरून वाढून ८०० च्या पुढे गेले आहेत. रविवारी महाराष्ट्रात ८३२ जण दगावले आहेत, तसेच ६६ हजार १९१ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.

नागपूरात ८७ जणांचा कोरोनाने बळी गेला. तर ७७७१ नवे रुग्ण आढळले. मुंबईत ५५४२ नव्या रुग्णांची नोंद झाली. एप्रिल महिन्यात मुंबईत आढळलेले कोरोनाची सर्वात कमी रुग्ण संख्या आहे. मात्र चोवीस तासात मुंबईत ६४ जणांना या साथीमुळे प्राण गमवावे लागले आहेत. नाशिकमध्येही ५६७५ नव्या रुग्णांची नोंद झाली असून ३९ जणांचा बळी गेला आहे.

दरम्यान देशात कोरोनावरील रुग्णांवर उपचारासाठी बेडची कमतरता जाणवत आहे. तसेच ऑक्सिजनचाही काही राज्यांमध्ये तुटवडा आहे. मात्र वायुसेना आणि रेल्वेद्वारे या राज्यांमध्ये ऑक्सिजन पुरवठा करण्याचा प्रयत्न केला जात आहे. याशिवाय रविवारी पीएम केअर फंडातून ५५१ ऑक्सिजन प्रकल्प स्थापन करण्यात येणार आहेत. याआधीही जानेवारी महिन्यात विविध राज्यात २०० कोटी रुपयांचे १६२ प्रकल्प पीएम केअर फंडातून मंजुर करण्यात आले होते.

तसेच भारतात ऑक्सिजनच्या वाढलेल्या मागणीमुळे निर्माण झालेली स्थिती पाहतान जभगरातून मदतीचा हात पुढे करण्यात आला आहे. तसेच भारतातील खाजगी कंपन्या आणि सरकारकडूनही मोठ्या प्रमाणावर ऑक्सिजन व ऑक्सिजन संबंधीत उकरणाची मागणी नोंदविण्यात आली आहे. पुढील दोन दिवसात ६०० ऑक्सिजन कॉन्सेट्रेटर्स हवाई मार्गाने आणण्यात येणार आहेत. ब्रिटन ४९५ ऑक्सिजन कॉन्सेट्रेटर्स आणि १२० व्हेंटीलेटर मदत म्हणून भारतात पाठवित आहे. तसेच सौदी अरेबिया ८० मेट्रीक टन लिक्वीड ऑक्सिजन भारतात पाठवत आहे.

महाराष्ट्रासह ११ राज्यांची मोफत लसीकरणाची घोषणा

१८ ते ४५ वयोगटातील नागरिकांसाठी १ मेपासून लसीकरण सुरू होत आहे. मात्र या वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाची जबाबदारी केंद्र सरकारने राज्यांकडे सोपविली आहे. केंद्र सरकार ४५ वर्षावरील नागरिकांचा मोफत लसीकरणाचा कार्यक्रम सुरूच ठेवणार आहे. तर नव्या धोरणानुसार राज्यांना १८ ते ४५ वर्ष वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणासाठी आवश्यक लसी या थेट लस उत्पादक कंपन्यांकडून खरेदी करायच्या आहेत. लस उत्पादक कंपन्या या ५० टक्के लसी केंद्र सरकारला पुरविणार असून ५० टक्के लस राज्य सरकारांना व खाजगी रुग्णालयांना विकणार आहेत.

यानंतर आतापर्यंत ११ राज्यांकडून १८ वर्षांवरील नागरिकांसाठी मोफत लसीकरणाची घोषणा करण्यात आली आहे. रविवारी महाराष्ट्र सरकारकडून मोफत लसीकरण करण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले. तर याआधी उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार, दिल्ली, छत्तीसगड, पंजाब, केरळ, आसाम, झारखंड, गोवा, आणि सिक्कीम या राज्य सरकारांनी मोफत लसीकरणाची घोषणा केली आहे.

leave a reply